मागील भागात आपण पाहिले की हर्ष आणि नेत्राच्या लग्नासाठी सगळेच जण हॉलवर पोहोचतात. आता पाहुयात पुढे...
थोड्याच वेळात मेहंदीचा कार्यक्रम सुरू होणार होता. सगळी तयारीदेखील झाली होती. हर्ष आणि नेत्राच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी हर्षिताने तिची एक मैत्रीण जी की प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट होती तिला बोलावले होते. इतर लेडीजच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी आणखी पाच सहा मुली होत्या.
मेहंदी म्हटलं की सगळ्याच बायका खूपच उत्साही असतात नेहमी. त्यात घरातील लग्न म्हटले की प्रत्येकीला अगदी हातभरुन मेहंदी काढायची असते.
तिकडे नेत्राची मेहंदी सुरू झाली. सगळे मनापासून एंजॉय करत होते. सगळ्या बायका मेहंदी काढण्यात मग्न झाल्या.
राज आणि हर्षिता मात्र नेत्रा आणि हर्षची टांग खेचण्याची जणू संधीच शोधत होते.
"आज खरं कळेल, नक्की कोणाचं कोणावर जास्त प्रेम आहे." मुद्दाम राज बोलला.
"अर्थातच नेत्राचे दादावर जास्त प्रेम आहे. तिचीच मेहंदी जास्त रंगणार, बघच तू राज दादा. ह्या खडूसच्या हातावर कसली मेहंदी रंगते!" हर्षकडे पाहून मुद्दाम तोंड वाकडे करत खुनशी सुरात हर्षिता बोलली.
"हो का! तुझ्या लॉजिकमध्ये तथ्य असेल तर तू म्हणते तसे होईल. पण काही पॉइंट नाही बघ तुझ्या बोलण्यात. एवढी शिकून देखील अडाणी आहेस गं बाई तू." हर्षिताच्या बोलण्याचे हर्षलाही हसू आले.
अधूनमधून नेत्रा आणि हर्षची नजरानजर होत होती. चेहऱ्यावरील स्मित आपसूकच मग फुलत होते. दोघेही आनंदाचा हा प्रत्येक क्षण भरभरून जगत होते. दोघांच्याही आयुष्यातील हा आनंद कॅमेऱ्यात देखील कैद केला जात होता.
सगळ्यांची मजा मस्ती, गमती जमती सुरू होत्या. पुरुष मंडळी गप्पांमध्ये रंगले होते. त्यातच राज आणि हर्षिताने थोडा विरंगुळा म्हणून एक गेम प्लॅन केला.
"अटेन्शन गाईज. तसंही आता हा मेहंदी प्रोग्राम अजून बराच वेळ सुरू राहणार आहे मग तोपर्यंत कोणी बोअर व्हायला नको म्हणून आपण अंताक्षरी खेळूयात. लेडीज विरुद्ध जेंट्स अशा टीम असतील. तर मग सगळे रेडी?"
"ये तुम्ही तरुण लोकं खेळा बाई, आम्ही तुम्हाला ते चिअर अप का काय म्हणतात ते करतो." मध्येच आजी बोलली.
"असं नाही आ आजी. तू तर आमच्या पेक्षाही तरुण आहेस. मग बाहेर काढ की तुझ्या पोतडीतून जुन्या गाण्यांचा खजाना. मला खात्री आहे तू एकटी भारी पडशील सर्वांना." हर्षिताने आजीला प्रोत्साहन दिले. तसा आजीचा उत्साह देखील वाढला.
थोड्याच वेळात अगदी सर्वजण आनंदाने अंताक्षरीमध्ये रमून गेले. फूल टू धम्माल सुरू होती सर्वांची. एकीकडे मेहंदी तर दुसरीकडे अंताक्षरी बरोबरच ज्याला भूक लागेल तसे जेवण देखील सुरुच होते. सर्व व्यवस्था अगदी चोख होती. दिमतीला तेवढी माणसे होती. इनामदारांचे नाव इतके मोठे होते की चुकूनही कोणी नाव ठेवायला जागाच उरली नव्हती.
नेत्राची आई आणि मामा तर लग्नाचा हा सर्व थाट पाहून अवाकच झाले. त्यांच्या पिढीत अजून कोणाचेही असे लग्न स्वप्नात देखील त्यांनी पाहिले नव्हते. अहो लग्न कसले! हा तर फक्त मेहंदी प्रोग्रॅम. साध्या मेहंदी कार्यक्रमाचा एव्हढा थाट तर प्रत्यक्ष लग्न कसे असेल, याचा अंदाज नेत्राच्या माहेरच्यांना एव्हाना आला होता.
'कार्टी पुढे जाऊन असं नशीब काढेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. आमच्याच नशिबी असे भिकेचे डोहाळे कसे? ते देवच जाणे.' प्रमिला ताईंना लेकीचे सुख काही बघवत नव्हते.
त्यात निलम काकी अजूनही आहे त्याच विचारात अडकली होती.
'हिची लायकी तरी आहे का इनामदारांच्या घरची सून होण्याची! देव कोणाचे नशीब कधी बदलवेल याचा काही नेम नाही. पण मीही बघते किती दिवस हिचा थाट टिकतो ते. जरी सून झालीस इनामदारांची, तरी तुला तुझ्या लाययकीतच ठेवते की नाही बघच तू. हा शब्द आहे ह्या निलम इनामदारचा.' निलम काकी मनातच बोलली.
बघता बघता तिकडे हर्ष आणि नेत्राची मेहंदी पूर्ण झाली. त्यानंतर दोघांचेही फोटोसेशन उत्तमरीत्या पार पडले. हातावर मेहंदी असल्यामुळे हर्षिता आणि राजने दोघांनाही खाऊ पिऊ घातले. एकंदरीतच या मेहंदी समारंभाने लग्न सोहळ्याला चार चांद तर लागलेच पण त्याहीपेक्षा नेत्रा आणि हर्षच्या लग्न सोहळ्याचा शुभारंभ खासच झाला.
फायनली नेत्राच्या हातावर हर्षच्या नावाची मेहंदी लागली. दुसऱ्या दिवशी कोणाची मेहंदी जास्त रंगली हे पाहण्यासाठी सर्वांमध्ये चुरस लागली.
"मी म्हटलं होतं ना...नेत्राचीच मेहंदी जास्त रंगणार. याचा अर्थ ब्रो...नेत्राचे तुझ्यावर तुझ्यापेक्षाही थोडे जास्त प्रेम आहे बरं का!" हर्षिता मुद्दाम तिच्या दादाची खेचत होती.
"ये हर्षु अगं तसे काही नाही गं. तू नको ना सारखं सारखं असं बोलूस." नेत्रा म्हणाली.
"का गं बाई...आतापासूनच होणाऱ्या नवऱ्याची बाजू घ्यायला लागली ही पोरगी. पण हे भारीये...दोघेही अगदी मेड फॉर इच ऑदर आहात. तुमच्या या क्यूट जोडीला कोणाचीही दृष्ट न लागो." हर्षिता म्हणाली.
हर्षिताच्या बोलण्यावर नेत्राने लाजून नजर खाली झुकवली.
हर्ष आणि नेत्राला मात्र एकमेकांसोबत खूप काही बोलायचे होते, पण समोरासमोर असूनही दोघांनाही बोलता काही यायचे नाही. क्षणभरही कोणी त्यांना एकटे सोडत नव्हते. असे असले तरीही आता नजरेची भाषा नजरेला समजत होती. मनातील भावना शब्दांविनाही आपसूकच एकमेकांपर्यंत पोहचत होत्या. नकळत होणाऱ्या स्पर्शाने प्रेमपालवी आणखीच बहरत होती.
मेहंदीचा कार्यक्रम तर उत्तमरीत्या पार पडला. दुसऱ्या दिवशी होता संगीत प्रोग्रॅम. छान आवरुन सगळेजण रेडी झाले. सर्वांची नजर नेत्रावरच खिळली. अबोली रंगाच्या सुंदर अशा वन पिस मध्ये नेत्राचे रुप अधिकच खुलून दिसत होते. त्यातच आता हातावरील मेहंदीचीदेखील भर पडली होती.
कोणाचेही लक्ष नाही हे पाहून हर्षने दुरुनच हातवारे करून 'खूप छान दिसत आहेस' असा इशारा केला. तसे नेत्राच्या चेहऱ्यावर लाजेची लाली ओसंडून वाहू लागली. ह्याच सुखासाठी तर प्रत्येक स्त्री आसुसलेली असते. प्रियकराचे प्रेमाचे दोन शब्दही पुरेसे असतात आयुष्यात उभे राहण्यासाठी. इथे तर हर्ष पावला पावलावर नेत्राची साथ देत होता. तिच्या आनंदासाठी धडपडत होता. आणखी मग काय हवे तिला.
सर्वांनी मिळून संगीत प्रोग्रॅम मनसोक्त एन्जॉय केला. हा दिवस देखील अत्यंत आनंदात गेला. प्रत्येक आनंदी क्षणाची आठवण कॅमेऱ्यात कैद करण्यात आली. इनामदारांच्या लेकाच्या लग्नाची चर्चा एव्हाना पंचक्रोशीत पसरली होती.
असा हा अनोखा विवाह सोहळा पाहून सर्वाच्या डोळ्याचे पारणे फिटले हेही तितकेच खरे.
रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करत हर्ष आणि नेत्राच्या प्रेमाच्या गप्पांना उधाण आले. लग्नाच्या आधीचा प्रत्येक सोनेरी क्षण दोघेही हृदयाच्या कप्प्यात अलगद बंदिस्त करत होते.
दुसऱ्या दिवशी हळदीच्या कार्यक्रमासाठी तयार होऊन नेत्रा जेव्हा सर्वांच्या समोर आली तेव्हा मात्र हर्षच काय तर निलम काकी आणि प्रमिला ताई देखील अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहिल्या. आता नात्यातील इतर पाहुणेरावळे देखील इनामदारांच्या लेकाला आणि होणाऱ्या सुनेला आशीर्वाद देण्यासाठी तिकडे पोहोचले.
हातभर मेहंदी, हळदीसाठी नेसलेली हिरव्या रंगाची साडी आणि हातातील हिरवा चुडा नेत्राच्या सौंदर्यात कमालीची भर घालत होता. खरंच साडीत स्रीचे रुप नेहमीपेक्षा थोडे जास्तच खुलते ते काही खोटे नाही. हर्ष आणि नेत्राचा जोडा अगदी लाखात एक शोभून दिसत होता. त्यामुळे सर्वजण अगदी भरभरून कौतुक करत होते दोघांचेही.
नयना ताईंनी सर्वात आधी नेत्रा आणि हर्षची दृष्ट काढली. आज हर्ष तर आपल्या होणाऱ्या बायकोवर पुरता फिदा झाला होता. नेत्राचे सौंदर्य शक्य तितके नजरेच्या कप्प्यात तो साठवून घेत होता.
हळदीच्या कार्यक्रमाचे फोटोसेशन तर कमालीचे झाले. फोटोच्या निमित्ताने आज पुन्हा हर्ष आणि नेत्रा इतके जवळ आले. एकमेकांच्या नजरेला नजर देण्याचीही त्यांची हिंमत होत नव्हती. मनातील भावना चेहऱ्यावरुन अगदी ओसंडून वाहत होत्या. भावनांचे पाश मर्यादेची सारी बंधने तोडू पाहत होते. भावनांना आवरणे नि मनाला सावरणे दोघांनाही आता कठीण होऊन बसले होते. परंतु, परिस्थितीचे भान राखत भावनांना आवर घालणेही तितकेच गरजेचे होते.
नव्या उत्साहात आणि आनंदात मग हळदीचा कार्यक्रम पार पडला. अखेर या दोन अनोळखी दिशा एक होण्यासाठी आता फक्त एका रात्रीचीच दुरी होती.
फायनली तो सोनेरी दिवस उजाडला. ज्या दिवसाची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत होता. अखेर सारे अडथळे पार करून नेत्रा आणि हर्षचा थाटामाटात विवाहसोहळा मोठ्या आनंदात आणि उत्साही वातावरणात पार पडला. अखेर दोन अनोळखी दिशा एक होवून पुढील प्रवासासाठी सज्ज झाल्या.
म्हणतात ना, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात ते काही खोटे नाही. एका अनोळखी वळणावर हर्ष आणि नेत्रा एकमेकांना भेटले. दोघांनी स्वप्नातही तेव्हा विचार केला नसेल पुढे जाऊन दोघेही आयुष्यभरासाठी असे एक होतील. सर्वांचा आशीर्वाद घेऊन या अनोळखी दिशा जन्मभरासाठी मग एक झाल्या.
क्रमशः
नेत्रा आणि हर्षचे लग्न तर झाले पण अजूनही नेत्रावर अत्याचार करणारा गुन्हेगार मात्र मोकाट फिरत होता. आता काय होणार पुढे? आतातरी नेत्राला न्याय मिळेल का? जाणून घ्या पुढील भागात.
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा