मागील भागात आपण पाहिले की नेत्रा आणि हर्ष दोघेही हनिमून टूरवर जातात. आता पाहुयात पुढे...
"हर्ष उठ ना..."
"थांब ग दोन मिनिट." अंगावरील ब्लँकेट तोंडावर ओढत हर्ष बोलला.
"अरे वाजले बघ किती?" पुन्हा त्याच्या तोंडावरील ब्लँकेट ओढत नेत्रा बोलली.
"वाजू दे की मग. आपल्याला कुठे ऑफिसला जायचं आहे."
"हो का. झालं...आजचाच दिवस उद्या रात्री निघायचं आहे. लक्षात आहे की नाही?"
"यार.. नको ना आठवण करून देऊस त्याच त्याच गोष्टीची. कसे गेले हे वीस दिवस काही समजलंच नाही गं. असं वाटतंय आता कालच तर आलोय आपण आणि लगेच जायचं पण." बेडवर आडवा झालेला हर्ष उठून बसत म्हणाला.
"मग काय इकडेच सेटल व्हायचा विचार आहे की काय आता?" हसतच नेत्राने प्रश्न केला.
"सेटल नाही गं, पण गेल्यावर आता कामावर फोकस करावा लागेल. एकमेकांसाठी असा निवांत वेळ थोडीच ना आपण देऊ शकणार आहोत." नेत्राचा हात हातात घेत हर्ष बोलला.
"अरे पण काहीही झाले तरी आपण एकमेकांच्या समोरासमोर असणार हे पुरेसे नाही का आपल्यासाठी? आहे त्या परिस्थितीतही आनंद शोधला की सगळं कसं अगदी सोप्पं होऊन जातं बघ."
"ते तर आहेच. पण छोटछोट्या गोष्टीतही खरंच किती आनंद आणि सुख मानतेस गं तू नेत्रा. आता जवळपास महिना होत आला आपल्या लग्नाला पण अजूनही कुठला हट्ट नाही की काही नाही. किती समजूतदार आहेस गं तू आणि विशेष म्हणजे सदा हसतमुख." नेत्राचे कौतुक करताना हर्ष थकत नव्हता.
"माणसाला परीस्थिती घडवत असते रे. चांगले आणि वाईट अनुभव खूप अनुभवले. गरजेपेक्षा जास्त अपेक्षा कधीच नव्हत्या. हीच सवय जणू आजतागायत कायम आहे आणि हसण्याचे म्हणशील तर तूच आहेस माझ्या आनंदी, हसऱ्या चेहऱ्यामागचे खरे टॉनिक. तुझी प्रेमाची मिठी खूप ऊर्जा देवून जाते." बोलता बोलता नेत्रा हर्षच्या मिठीत शिरण्यापासून स्वतःला नाही थांबवू शकली.
"आता काय विचार आहे. उठू की नको?" नेत्राभोवतीची मिठी घट्ट करत हर्ष म्हणाला.
"गप रे. काहीही काय? पण तुझ्या मिठीत काहीतरी जादू आहे हे नक्की. काय ते माहीत नाही. एकदा मिठीत शिरलं की साऱ्या जगाचा विसर पडतो." गेल्या वीस दिवसातील प्रत्येक क्षण आठवून नेत्राच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली."
हर्षने आपले ओठ अलगद नेत्राच्या कपाळावर टेकवले. तोही क्षणभर जुन्या आठवणींत रममाण झाला.
"बायको,बायको... लव यू!" दोघांनीही मिठीची पकड आणखीच घट्ट केली. समाधानाचे हास्य दोघांच्याही चेहऱ्यावर होते.
"बरं उठ आता पटकन् आणि आवरुन घे." नेत्रा म्हणाली.
"तू सोडशील तर मी उठू शकेल ना!" गालातल्या गालात हसत हर्ष बोलला.
लाजतच नेत्रा हर्षच्या मिठीतून अलगद मागे सरकली.
"सॉरी माझ्या लक्षातच नाही आले ते." नजर खाली झुकवत नेत्रा बोलली.
"सॉरी माझ्या लक्षातच नाही आले ते." नजर खाली झुकवत नेत्रा बोलली.
"लव यू बायको. अशीच नेहमी हसत राहा. लाजल्यावर खूप गोड दिसतेस तू." प्रेमाने हर्ष बोलला.
नेत्राला मात्र काय बोलावे काहीच समजेना. ती आणखीच लाजली. काहीही झाले तरी हर्षच्या नजरेचा ती सामना करूच शकत नव्हती.
"अरे किती लाजतेस! काही खरं नाही बाबा तुझं."
"गप रे तू उठ बरं आणि आधी आंघोळीला जा. तू समोर असला की माझे काहीच काम होणार नाही. असं लाजण्यातच माझा दिवस जायचा. आधीच आज बॅगा भरायच्या आहेत. तू आवरुन घे पटकन्."
हर्ष आंघोळीला गेला पण नेत्रा मात्र स्वतःच्याच नशिबाचा विचार करत जागेवरच बसून राहिली.
'देवा इतक्या वर्षांपासून जो त्रास मी सहन केला त्याचे इतके गोड फळ तू मला देशील असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. आयुष्यात एवढे प्रेम मला याआधी कधीच मिळाले नव्हते जे की अवघ्या सात महिन्यात मिळाले. आई-बाबा, आजी-आजोबा, हर्षिता, राज भाऊजी, महेश काका आणि हर्ष या सगळ्यांच्या प्रेमात मी अगदी न्हाऊन निघाले आहे. देवा ह्या माझ्या माणसांना आणि माझ्या सुखी संसाराला कोणाचीही दृष्ट न लागो. हा आनंद, हे प्रेम माझ्याकडून आता कधीच हिरावून घेवू नकोस देवा.' मनोमन नेत्राने देवाकडे प्रार्थना केली.
दुसऱ्या दिवशी रात्रीच्या फ्लाईटने नेत्रा आणि हर्ष घरी परतणार होते. शेवटचे दोन दिवस दोघांनीही खूप एन्जॉय केले आणि सोबतीतला प्रत्येक क्षण हृदयात अगदी कायमस्वरूपी बंदिस्त केला.
खूप साऱ्या प्रेमाच्या आठवणी घेवून दोघेही घरी परतले. आता खऱ्या अर्थाने दोघांच्याही संसाराला सुरुवात होणार होती. घरी परतताच एक आनंदाची बातमी त्यांना मिळाली. नेत्राच्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली होती. अर्थातच माधवरावांना त्यांच्या पोलिस मित्राची खूप मदत झाली होती या साऱ्यांत. अजून गुन्हा जरी सिद्ध झाला नसला तरी त्याच्या विरुध्द आधीच इतके गुन्हे दाखल होते की तसेही त्याला सहजासहजी बेल मिळणे शक्यच नव्हते.
ही बातमी ऐकून नेत्रा आणि हर्षला खूपच आनंद झाला. निलम काकीला मात्र नेत्रावर झालेल्या अन्यायाबद्दल अगोदर काहीही माहिती नव्हते. आत्ता कुठे तिला काही गोष्टी समजत होत्या. तिला तर आता नेत्राला हिणवायला आयते कोलितच मिळाले होते. आधीच तिच्या मनात खूप काही साठले होते. ते कधी आणि कसे बाहेर पडेल याचा काही नेम नव्हता.
पुढच्या दोन दिवसांतच हर्षने ऑफिस जॉईन केले. घरातील सर्वांच्या आग्रहाखातर नेत्राही हर्षसोबत ऑफिसला जाऊ लागली. आता निलम काकीला थोडीच ना ही गोष्ट रुचणार होती. येता जाता नेत्राला एकटे गाठून 'तू कशी या घरासाठी लायक सून नाही,' हे ती वारंवार नेत्राला सूनवू लागली.
एक दिवस नयना ताईंनी निलमला स्पष्ट शब्दांत ताकीद दिली, "माझ्या लेकाला आणि सुनेला जर कुठल्याही प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर याद राख. मी आतापर्यंत खूप ऐकून घेतलं तुझं. पण आता नाही. सुपर्णा आणि हर्षमध्ये तूच वादाची ठिणगी टाकलीस, हे न समजण्या इतपत आम्ही मूर्ख तर नक्कीच नाही. आता नेत्राच्या वाटेत काटे पेरण्याचे काम ka अजिबात करु नकोस आणि आमच्या चांगुलपणाचा तर चुकूनही फायदा घेऊ नकोस. खूप महागात पडेल तुला ते. शेवटचं सांगतिये मी तुला. जरा तरी सुधर अन्यथा स्वतःच स्वत:च्या विनाशाचे कारण ठरशील."
नयना ताईंनी थोडे स्पष्ट आणि कडक शब्दांत निलम काकीला सुनावले. आज पहिल्यांदा नयना ताईंचे हे रूप निलम काकीने पाहिले होते. मनातून तिही घाबरली. निदान पुढचे काही दिवस तरी ती नेत्राचा पिच्छा पुरवणार नाही याची नयना ताईंना खात्री पटली.
नेत्रा आणि हर्ष दोघेही मिळून कंपनीची तसेच ऑफिसची जबाबदारीही उत्तमरीत्या पार पडत होते. एकंदरीतच आपल्या पाठीमागे आपली सून आणि मुलगा आपल्या वडीलोपर्जित बिझनेसची मनापासून काळजी घेतील याची आता माधवरावांना जणू खात्रीच पटली होती.
काही दिवसांतच नेत्रा घर आणि ऑफिसमध्ये छान रुळली. घरातील सर्वांचा तिला खूप छान सपोर्ट मिळत होता. नयना ताईंना तर सुनेला कुठे ठेवू अन् कुठे नको असेच होत होते.
पुढच्या सहा महिन्यांतच इनामदार टेक्सटाइलने बिझनेसमध्ये उत्तम प्रगती केली. माधवराव देखील आपल्या लेकावर आणि सुनेवर खूपच खुश होते. हर्षला मिळालेली नेत्राची साथ खूपच मोलाची ठरली.
मोठमोठ्या बिझनेस डील, मीटिंग्ज नेत्रा आणि हर्ष अगदी सफाईदारपणे हॅण्डल करत होते. अर्थातच माधवरावांचा गायडन्स आणि आशीर्वादही तितकेच कामी येत होते.
बघता बघता हर्ष आणि नेत्राच्या लग्नाला वर्ष कसे सरले ते दोघांनाही समजले नाही.
एकदा अशाच एका निवांत क्षणी नेत्रा खिडकीतून बाहेर कोसळणारा पाऊस पाहत होती. अचानक तिला त्या भयाण रात्रीची आठवण झाली. एक एक करत भूतकाळातील तो प्रत्येक क्षण आठवून ती सुन्न झाली. डोळ्यांत आसवांची दाटी झाली. क्षणभर वर्तमानाचा तिला विसर पडला. डोक्यात विचारांचे काहूर उठले होते.
"नेत्रा अगं अचानक एक मीटिंग आलीये पटकन प्रेझेंटेशन तयार कर ना मी तोपर्यंत बाकीच्या फाईल्स रेडी आहेत का ते एकदा बघून घेतो." घाईतच हर्ष नेत्राच्या केबिनमध्ये आला. सवयीप्रमाणे तिच्याकडे न पाहताच त्याने भराभर कामाची लिस्ट तिच्यासमोर मांडली. तिचे मात्र त्याच्याकडे थोडेही लक्ष नव्हते.
नेत्राचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा कुठे हर्षने तिच्याकडे पाहिले. बाहेर पडणारा पाऊस आणि नेत्राच्या डोळ्यातील आसवांचा पाऊस दोन्ही एकाच वेळी मुक्तपणे कोसळत होते. हर्षच्या बरोबर लक्षात आले की नेत्राच्या डोक्यात काय सुरू आहे.
"नेत्रा...भूतकाळातील त्या कटू आठवणींना मनात अजिबात थारा द्यायचा नाही. आता गुन्हेगार शिक्षा भोगत आहे की नाही मग झालेल्या गोष्टींवर विचार करण्यात काही तथ्य आहे का? मी नेहमी तुझ्या सोबत होतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहणार. याची तुला खात्री आहे ना?"
पाणावलेल्या डोळ्यांनीच नेत्राने होकारार्थी मान डोलावली आणि अलगद ती हर्षच्या मिठीत शिरली. हर्षने देखील तिच्याभोवतीची मिठी अधिकच घट्ट करत तिला विश्वासपूर्ण साथीची जणू हमी दिली. हर्षच्या जादुई झप्पीत नेत्राला साऱ्या जगाचा विसर पडला आणि क्षणात मग सारे काही विसरून ती पुढच्या कामाला लागली.
त्या दिवसानंतर नेत्राने मग मागे वळून कधी पाहिलेच नाही. हर्षच्या सांगण्यावरून सर्व कटू आठवणींना त्याच क्षणी तिने कायमस्वरूपी तिलांजली दिली. एक एक करत मग यशाची उंचच उंच शिखरे काबीज करत हर्ष आणि नेत्रा पुढेच जात राहिले.
खरंच, एकेकाळच्या या अनोळखी दिशा आता पूर्णपणे एकरूप होऊन एकमेकांच्या साथीने आयुष्यात पुढेच जात राहिल्या.
समाप्त..
(अनोळखी दिशा..ही पूर्णपणे काल्पनिक असलेली कथा फक्त आणि फक्त मनोरंजन या हेतूने लिहिण्यात आली आहे. एका मुलीवर झालेला शारीरिक अत्याचार आणि त्यातून तिने निवडलेला आत्महत्येचा मार्ग तिथून सुरू झालेली ही कथा अनेक वळणे घेत खूप दूरवर येवून पोहोचली. याचे एकच कारण ते म्हणजे तिला तिच्या जोडीदाराची लाभलेली उत्तम साथ. खरंच आयुष्यात असा जोडीदार असेल तर आयुष्य किती सुखकर होते याची प्रचिती या कथेतून येते. तसेच आयुष्य म्हणजे खेळ असतो सुख दुःखाचा. दुःख सोसल्यानंतर सुखाची पहाट ही येतेच आणि हेच या कथेतून चित्रित केले आहे.
कथा कशी वाटली? अभिप्राय द्यायला विसरु नका.)
कथा कशी वाटली? अभिप्राय द्यायला विसरु नका.)
धन्यवाद....
©® कविता वायकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा