अनोळखी दिशा पर्व २ (भाग ३६)

कथा अनोख्या प्रेमाची
मागील भागात आपण पाहिले की, नेत्राने जेव्हा प्रेमाचा त्याग करण्याची भाषा केली तेव्हा नकळतपणे हर्षु दुखावली गेली. हर्षने मग तिला आधार दिला. नेत्रा मात्र द्विधा मनःस्थितीत अडकली.

आता पाहुयात पुढे...

नयना ताईंची तब्बेत ठीक नसल्याने रात्रीच्या स्वयंपाकाची जबाबदारी नेत्रावर होती. नेत्रा किचनमध्ये तिचे काम करतच होती, तेवढ्यात तिथे नयना ताई आल्या.

"आई काही हवंय का तुम्हाला? मला सांगा मी देते ना."

"राहू देत, वरवरची काळजी दाखवण्याची काहीच गरज नाहीये. आतापर्यंत जेवढी काळजी घेतली तेवढी पुरेशी आहे." म्हणत नयना ताईंनी फिल्टर मधून पाण्याचा जग भरायला सुरुवात केली.

'हीच वेळ आहे, आई एकट्या आहेत तर स्पष्टच बोलून घ्यावं. एरव्ही निलम काकी सतत मागेपुढे फिरत असतात त्यांच्या.' नेत्राच्या मनात विचार आला आणि तिने नयना ताईंबरोबर बोलायला सुरुवात केली.

"आई, मला माफ करणारच नाहीत का तुम्ही? असं अजून किती दिवस राग धरून बसणार आहात? प्लीज नका ओ वागू असं. तुमच्या ह्या अशा तुटकपणे वागण्याचा खूप त्रास होतोय ओ मला." रडवेल्या सुरात नेत्रा बोलली.

"अच्छा! तुला होतो तो त्रास आणि मग माझं काय? इथे माझ्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तू एवढी मोठी गोष्ट लपवली माझ्यापासून. मग विचार कर मला किती त्रास होत असेल याचा? निदान तुला समजल्यावर मला कल्पना तरी द्यायला हवी होतीस ना तू."

"आई मलाही आता इतक्यातच समजलंय. मीही खूप समजावलं हर्षुला. पण त्यांचं खरंच खूप प्रेम आहे हो एकमेकांवर, हे मी जवळून पाहिलंय."

"म्हणून काय माझ्या लेकीचं परस्पर लग्न लावून मोकळी होणार आहेस का तू?"

"आई असं कुठे म्हणाले मी."

"नाही ना...मग माझ्याकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा करत असशील तर एक काम करावं लागेल तुला माझं."

"सांगा ना आई...काय करु?"

"हर्षुला समीर सोबत लग्न करण्यासाठी राजी करायचं आणि आदित्य विषयी तिच्या मनात घृणा निर्माण होईल असं काहीतरी करायचं."

"सॉरी आई...पण हे मी नाही करू शकत. असं करणं म्हणजे पाप आहे. जे मला तरी जमणार नाही."

"तुला एक संधी दिली होती नेत्रा... पण असं बोलून तू ती संधी गमावलीस हे ध्यानात ठेव आणि आता मी तुझ्याशी तेव्हाच चांगलं वागू शकेल जेव्हा हर्षु समीरसोबत लग्नाला तयार होईल."
एवढे बोलून नयना ताई रागातच तिथून निघून गेल्या.

"ही अशी कशी आईंची अट? ह्या नक्की त्याच आई आहेत ना ज्या घरातील सर्वांसाठी आदर्श आहेत." तोंडातल्या तोंडात नेत्रा पुटपुटली आणि विचार करतच ती तिच्या कामाला लागली.

जेव्हापासून घरात हर्षु आणि आदित्यच्या नात्याविषयी नयना ताईंना समजले होते तेव्हापासून घरातील वातावरणच अचानक बदलून गेले होते. आता हळूहळू आजी आजोबांच्या कानावर देखील काही गोष्टी पडत होत्या. हे सर्व प्रकरण अगदी विचारपूर्वक हाताळता आले असते, पण निलम काकीने नयना ताईंना सांगून घरातील सदस्यांमध्ये आपापसांत तेढ निर्माण केली होती. जो की तिचा उद्देशच होता.

नयना ताईंचा सर्व राग मात्र नेत्रा आणि हर्षवरच होता. त्यांना सगळे माहीत असूनही त्यांनी ही एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली. याचा प्रचंड राग आला होता नयना ताईंना.

न राहवून एक दिवस नयना ताईंनी समीरच्या आईला फोन केला.

"हॅलो माधवी ताई राज्याध्यक्ष बोलताय का?"

"हो बोलतिये आणि आपण?"

"अहो मी हर्षची आई, नयना इनामदार बोलतिये."

"नयना ताई... बोला की. आज कशी काय आठवण काढली आमची?"

"आठवण म्हणजे अगदी सहज. तुम्ही आमच्या घरी कार्यक्रमासाठी आलात आणि त्यानंतर पुन्हा आम्हाला विसरुनच गेलात की."

"नाही ओ ताई, असं काही नाही. आता थोड्याच दिवसांत कॉलेजच्या एक्झाम सुरू होतील त्यामुळे सिलॅबस कव्हर करण्यात आम्ही टीचर लोक बिझी आहोत आणि समीरकडून तुमच्या सर्वांची खुशाली वरचेवर समजत असतेच ना."

"अरे वा..हो का! बरं बाकी काय म्हणताय?"

"काही नाही बघा, सर्वकाही तुमच्याकडेच."

"समीरच्या लग्नाचा विचार वगैरे पक्का झाला की नाही?" हळूहळू नयना ताई मूळ विषयाकडे सरकत होत्या.

"तसा तो इतक्यात लग्नासाठी आणि मुली पाहण्यासाठी नाहीच म्हणत आहे पण तरीही पालक म्हणून आपल्याला शांत बसून थोडीच चालणार आहे. हातपाय तर हलवायलाच हवेत ना."

"अगदी बरोबर बोललात बघा माधवी ताई. आजकालची मुले करिअरला प्राधान्य देतात आणि लग्न या विषयापासून दूर पळतात आणि मग तो विषय बाजूलाच  पडतो. एकदा का लग्नाला उशीर झाला की पुढे मग सगळ्याच गोष्टींना लांबड लागत जाते."

"हे मात्र अगदी खरं आहे. म्हणूनच मीही समीरच्या मागे रोज लागत असते, तुला जेव्हा करायचं तेव्हा लग्न कर पण मुली पाहण्याचा कार्यक्रम आपल्याला लवकरच सुरू करायला हवा."

"मग तो काय म्हणतो?" उत्सुकतेपोटी नयना ताईंनी विचारले.

"तोंड पाडून म्हणतो, तुला हवं ते कर तू बाई, पण माझं डोकं नको खाऊ." असं म्हणून विषय बदलतो.

"पण तुम्हाला सून कशी हविये? म्हणजे तुमच्या अपेक्षा काय आहेत भावी सूनेबद्दलच्या?"

"माझ्या अपेक्षांचे काय हो...शेवटी मुलाची पसंती ती माझी पसंती आणि जास्त अपेक्षा ठेवून अपेक्षाभंग होण्यापेक्षा त्या न ठेवलेल्याच बऱ्या. त्याने पुन्हा आपल्यालाच त्रास होतो."
हसतच माधवी ताई बोलल्या.

"हो ते तर आहेच."

"अहो मी तर त्याला नेहमी म्हणत असते, तुला जशी हवी तशी मुलगी तू तुझी शोध किंवा मग एखादी मुलगी तुझ्या मनात असेल तर सांग आणि आजकाल कसं असतं ना नयना ताई मुलांच्या मनाविरुद्ध जाऊन उगीच त्यांच्यावर आपली मतं लादण्यात काही अर्थ नसतो. पुढे जाऊन त्याचा आपल्यालाच त्रास होतो."

"हो ते सगळं ठीक आहे, मुलांच्या निर्णयाचे आपण स्वागत केलेच पाहिजे पण मुलांनी घेतलेला निर्णय जर आपल्या मनाविरुद्ध असेल म्हणजे थोडक्यात त्यांच्या भविष्यात जे ते डिझर्व करतात ते त्यांना मिळणारच नाही हे आपल्याला माहीत असेल तर मग त्यांच्या निर्णयात आपण हस्तक्षेप करणं योग्य की अयोग्य?"

"कसं असतं ना नयना ताई, शेवटी ह्याबाबतीत प्रत्येकाचा दृष्टीकोन हा वेगळा असू शकतो. मी तर म्हणेल शेवटी त्यांचे आयुष्य आहे त्यांना ते त्यांच्या पद्धतीने जगू द्यावं आणि त्यांच्या निर्णयाचं म्हणाल तर आपण कशासाठी आहोत मग. योग्य अयोग्य आपण त्यांना समजावून सांगायचं. हा फक्त त्यांच्या दृष्टिकोनातून देखील विचार व्हायला हवा. कारण जनरेशन गॅपमुळे विचारांत तफावत असणार हे सत्य आपणही एक्सेप्ट केले पाहिजे."

माधवी ताई बोलत होत्या पण नयना ताईंना आपण याउलट वागत आहोत याची जाणीव होत होती.

"अगदीच. तुमचे विचार ऐकून खूपच छान वाटले."

पुढे काय बोलावे हे मात्र नयना ताईंना अजिबात सुचेना. क्षणभर त्या पूर्णपणे ब्लँक झाल्या.

"बाकी काय म्हणताय मग नयना ताई आणि तुम्ही सगळे केव्हा येताय आमच्या घरी?"

"बाकी सगळे मजेत आणि एखाद दिवशी प्लॅन करून तुमच्या घरी नक्की येऊ." नयना ताई बोलल्या.

एवढे बोलून, एकमेकींची खुशाली विचारून त्यांनी फोन ठेवला. बराच वेळ झाला तरी नयना ताईंचे विचार चक्र काही थांबायचे नावच घेईना.

' मी माझा निर्णय हर्षुवर लादून काही चूक तर करत नाही ना?'
एकसारखा हाच विचार नयना ताईंच्या मनात घोळत होता.

थोडक्यात काय तर ज्या कामासाठी त्यांनी माधवी ताईंना फोन केला होता ते काम काही झाले नाही. जे विचारायचे होते ते विचारायची त्यांची हिम्मतच झाली नाही.

"ताई...येऊ का?" तेवढयात निलमने नयना ताईंना विचारले.

"ये ना.."

"आता कसं वाटतंय ताई तुम्हाला?"

"आता ठीक आहे मी."

"काय ओ ताई, कसलं टेन्शन आहे का?"

"आता हे एवढं मोठं टेन्शन तू माझ्या डोक्याला दिलंय ना त्यापेक्षा आणखी वेगळं कोणतं टेन्शन असणार?" थोडं खोचकपणे नयना ताई बोलल्या.

"असं का ओ बोलता ताई...मी इतकी महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगितली तरी तुम्ही असं बोलता."

"मग काय करू निलम? तू जे काही मला सांगितलं ते जरी खरं असलं तरी त्यामगचा मला सांगण्याचा तुझा उद्देश कशावरून स्वच्छ होता."

"म्हणजे ताई मी मुद्दाम केलं असं तुम्हाला वाटतंय का?"

"का वाटू नये गं असं... कारण इतक्या वर्षात तू माझ्याशी इतकं चांगलं कधीच वागली नाहीस त्यामुळे तसं वाटणं स्वाभाविक नाही का?"

"भलाईचा जमाना खरंच राहिला नाही. जाऊ द्या, तुम्हाला पटो अगर न पटो पण मी अगदी स्वच्छ भावनेतून हे सगळं तुम्हाला सांगितलं होतं पण त्याचाही जर असा चुकीचा अर्थ घेतला जात असेल तर मग मी काहीच करू शकत नाही आणि हर्षुचे पुढे जाऊन नुकसान व्हावे असा माझा हेतू असता तर मी ही गोष्ट तुम्हाला कळू सुद्धा दिली नसती, उलट तिच्या आणि आदित्यच्या नात्याला सपोर्टच केला असता. हे नाते इथेच थांबावे असे मनापासून मला वाटत आहे म्हणून हा सगळा खटाटोप. बाकी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा तर ठेवा नाहीतर नका ठेवू." एवढे बोलून निलम निघून गेली.

पुन्हा एकदा निलम काकिने नयना ताईंना शब्दांच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.

'निलमचेही काही चूक नाही. हर्षुचे नुकसान व्हावे असे जर तिला वाटत असते तर तिने खरंचंच मला का सांगितले असते.'

कुठेतरी निलमचे म्हणणे नयना ताईंना जणू पटले होते.

क्रमशः

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all