Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-५८)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली गेली. कसे निभावतील ते हे नातं? जाणून घ्या या कथेत..
डिसेंबर -जानेवरी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-५८

मागील भागात:-

मध्य रात्रीच्या सुमारास तो डोळे मिटूनच मान नकारार्थी डोलवत पुटपुटला,"नाही फादर, मी काही चूक केली नाही. माझी काहीच चूक नाही."

आणि एकदम दचकून जागा झाला. बाजूला पाहिले तर दुर्गा त्या ठिकाणी नव्हती.

आता पुढे:-

श्याम घाबरून दुर्गाला आवाज देऊ लागला. पण तिचा प्रतिसाद आला नाही. तेव्हा घाईघाईने रूममध्ये पाहिले, पण दुर्गा कुठेच नव्हती.

श्यामच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने हळूच दरवाजा उघडला आणि रूमबाहेर आला.

बाहेरच्या अंगणात काॅटवर वैजयंती गाढ झोपली होती. 

तो तसाच पुढे आला तर अचानक त्याला अंधारात एक आकृती दिसली आणि त्याच्या अंगावर काटा आला. ती गुडघ्यावर डोकं टेकवून उदास बसली होती. तिला सुखरूप पाहून त्याला हायसे वाटले.

"दुर्गा, इथे काय करतेस? तू बाजूला दिसली नाही तर किती घाबरलो होतो मी." तो तिच्या जवळ येऊन बसत म्हणाला.

"मला झोप येत नव्हती म्हणून मी बाहेर आले. ते तू झोपला होतास म्हणून तुला उठवले नाही." ती दबक्या आवाजात म्हणाली.

"बरं, चल आत जाऊ. तुला छानशी गोष्ट सांगतो. म्हणजे तुला झोप लागेल." तो तिला उठवत म्हणाला.

"गोष्ट नको, गाणं म्हणशील, तरच येईन." ती फुगी चेहरा करत म्हणाली.

"गाणं?.." त्याने आश्चर्याने विचारले.

तिने हुंकार भरला.

"अगं पण आता जर मी गाणं म्हणालो तर सगळे उठतील ना." तो‌ हसत म्हणाला.

"हळू आवाजात म्हण." ती डोळे मिचकावत म्हणाली.

"बरं, चल." असे म्हणत तो तिला आत घेऊन आला. तिला बेडवर झोपवले. तो तिच्या उशाशी बसला आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून थोपटत गाऊ लागला..

सुरमई अँखियों में
नन्हाँ-मुन्ना एक सपना दे जा रे
सुरमई अँखियों में
नन्हाँ-मुन्ना एक सपना दे जा रे
निंदिया के उड़ते पाख़ी रे
अँखियों में आजा साथी रे

रा री रा रूम ओ रा री रूम
रा री रा रूम ओ रा री रूम
सुरमई अँखियों में
नन्हाँ-मुन्ना एक सपना दे जा रे

"आय एम साॅरी, श्याम. तुमच्या चांगुलपणाचा मी फायदा घेतेय." तिने डोळे मिटून त्याचं गाणं ऐकत मनोमन माफी मागितली.

काही वेळाने तिला झोप लागली.

अशातच काही महिने निघून गेले. श्याम आणि वैजयंती मनापासून तिची खूप काळजी घेत होते.

आता तिचे पोट बऱ्यापैकी दिसत होते.
एके दिवशी तो तिला सकाळी हाॅस्पिटलच्या आवारात फिरवत होता. चालता चालता तिचा पाय अडखळला. त्याने लगेच तिला सावरले आणि काळजीने म्हणाला,"अगं सावकाश!"

तेवढ्यात काही पेशंट अंगातील शर्ट काठीला लावून रांगेत येत श्यामच्या नावाचा घोष करत त्याच्याजवळ आले. त्यांचे म्होरके कर्नल सयाजी होते. ज्या काठीला ते बंदूक समजायचे त्याच काठीला त्यांनी टोपी अडकवली होती. ते सगळ्यात पुढे होते.

त्याने त्यांना थांबवत विचारले,"थांबा, हे सर्व काय आहे?"

"स्ट्राईक!" ते सावधान स्थितीत उभारत ठामपणे म्हणाले.

"स्ट्राईक! आणि ते कशासाठी?" त्याने कपाळावर आठ्या पाडत विचारले.

"हो, तुझ्या विरोधात आहे ही स्ट्राईक. ही टोपी त्याचा बावटा आहे." ते थोडे चढ्या आवाजात म्हणाले.

"माझ्या विरोधात का बरं?" श्यामने हात मागे बांधून विचारले.

"हि आधी आमच्यासोबत राहत होती. पण आता तू तिला तुझ्या घरी ठेवलेस. का बरं?" एक पेशंट तक्रारीच्या सुरात म्हणाला.

"अच्छा, मी हिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. आता ती माझी बायको झाली ना, म्हणून ती माझ्यासोबत राहते." श्यामने तिच्या खांद्यावर हात ठेवत सांगितले.

"अच्छा, मग आमच्याही गळ्यात मंगळसूत्र बांध, म्हणजे आम्ही ही तुझ्यासोबत तुझ्या घरी राहू." कर्नल सयाजी मान खाली झुकवून म्हणाले.

श्यामला हसू फुटले आणि दुर्गाही तोंडावर हात ठेवून गालात हसू लागली.

"ते शक्य नाही. ते सोडून दुसरे काय पण सांगा ते मी करेन." तो त्यांना म्हणाला.

"मग आम्हाला फिरवून आण, हिला जसे फिरवून आणलेस तसं." सयाजी म्हणाले.

"ती प्रेग्नंट आहे ना. म्हणून तिला फिरवत आहे आणि काल तिचे रूटीन चेकअप होतं, म्हणून तिकडे घेऊन गेलो होतो." तो त्यांना तिच्या पोटाकडे बोट दाखवत समजावून सांगत होता.

"मी पण प्रेग्नंट आहे. मग मला पण फिरवून आण." एक पेशंट ज्याला खूप मोठी ढेरी होती तो पोट पुढे करून गाल फुगवून म्हणाला.

आता तर श्यामला हसावं की रडावं तेच कळेना. त्याने कपाळावर हात मारून घेतला.

दुर्गा मात्र तोंड फिरवून हसत होती.

हा गोंधळ फादरांच्या कानांवर गेला. जे तिथेच जवळपास डाॅक्टरांशी चर्चा करत होते.

त्यांनी श्यामला बोलावले. श्याम बरोबर ती सगळी सेना तिथे आली.

"काय रे श्याम कसला गोंधळ चालू आहे?" फादरांनी सगळ्यांवर नजर टाकत विचारले.

श्याम हसत म्हणाला,"काल मी दुर्गाला डॉक्टरकडे चेकअपला घेऊन गेलो होतो ना, यांना वाटलं की आम्ही फिरायला गेलो होतो. म्हणून यांच्या पोटात दुखतंय. आता यांनाही फिरायचे आहे म्हणून असे स्ट्राइक करत आहेत."

"अच्छा, म्हणून ह्यांनी कालपासून ना औषध घेतली ना की जेवणं केलं." फादरांनी हसत विचारले.

सगळ्यांनी एकसाथ मान डोलावली.

"फादर, तुमची परवानगी असेल तर मी यांना एक चक्कर मारून आणू का?" श्यामने त्यांना विचारले.

क्रमशः

फादर देतील का श्यामला परवानगी?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all