डिसेंबर -जानेवरी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-२
मागील भागात :–
वैजयंती फादरशी हुज्जत घालत असते. हे श्यामला कळताच तो तिला समजावण्याचा प्रयत्न करतो; पण ती त्याच्यावरही रागावते.
आता पुढे :–
श्याम वैजयंतीला शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता; पण ती काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. रागाच्या भरात ती आल्या पावली निघून गेली.
जाता जाता, डोळे भरून आलेले, ती त्याला रडत म्हणाली,“लय मोठा झाला हाईस तू आता. स्वोताचा निर्णय स्वोता घ्यायला. राहा बाबा तू खूश आता. ही म्हतारी कधीच तुझ्या सुखाच्या आड येणार न्हाई. म्या कधीच पुन्यांदा इथं पाय बी ठेवणार न्हाय. तू बी कधी मला भेटाया येऊ नगोस. आलास तर याद राख.”
जवळजवळ ती त्याला धमकीच देत होती. जशी तावात आली होती, तशीच तावात निघूनही गेली.
श्याम तिला मनवण्यासाठी तिच्या मागे धावला. तेवढ्यात तिने मागे वळून एक जळजळीत कटाक्ष टाकला, हाताचा पंजा उगारला आणि काखेतील बोचकं सांभाळत झपझप पावले टाकत तेथून निघून गेली.
श्याम हताशपणे जाणाऱ्या तिच्याकडे पाहत राहिला.
ती निघून गेल्यावर तो फादरकडे आला. त्यांच्या समोर मान खाली घालत, अत्यंत नम्र सुरात म्हणाला, “फादर, आईच्या वतीने मी तुमची माफी मागतो.”
“तू का माफी मागतोस रे?” फादर शांतपणे म्हणाले. “आई आहे ती तुझी. तिची अवस्था मी समजू शकतो. मलाही तुझ्याकडून असं काही होईल, अशी अपेक्षा नव्हती. असो… पण तू तिला मनवण्याचा अजून थोडा प्रयत्न करायला हवा होतास. बिचारी रागाच्या भरात निघून गेली.”
“आता ती ऐकण्याच्या स्थितीत नाही, फादर,” श्याम भावूक होत म्हणाला. “पण ती स्वतःहूनच परत येईल. माझ्यावर जास्त वेळ राग धरू शकत नाही ती. मी ओळखतो तिला. माझ्यावर खूप प्रेम करते. राग निवळला की परत येणारच, खात्रीने सांगतो मी. तुम्ही काळजी करू नका.”
“हम्म…” फादर हलकेच हसले. “आई शेवटी लेकराकडे परत येणारच. कितीही रागावली तरी तिचं प्रेम कमी होत नाही. तू म्हणतोस, तर नक्की येईल ती..तुझ्या प्रेमाखातर. चल, तू तुझं काम कर. मी निघतो.” ते शांतपणे म्हणाले.
त्यांनी श्यामच्या खांद्यावर मायेने हात ठेवला.
श्यामने होकारार्थी मान डोलावली. फादर सुस्कारा टाकत, हात मागे बांधून निघून गेले.
श्यामही दीर्घ श्वास घेऊन आपल्या कामाला निघून गेला.
श्याम हा फादर फ्रान्सिस यांनी उभारलेल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये मानसिक आरोग्य सहाय्यक (मेंटल हेल्थ अटेंडंट) म्हणून काम करत होता.
चर्चच्या शेजारी मोठी सरकारी जमीन होती. एकदा चर्चबाहेर एक वेडसर माणूस त्यांना दिसला. तो काहीतरी बरळत होता, स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न करत होता. फादरांनी त्याला समजावलं. तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचं लक्षात येताच त्यांनी त्याला काही काळ स्वतःकडे ठेवून घेतलं. डॉक्टरांना बोलावून त्याच्यावर उपचार केले.
याच घटनेतून त्यांच्या मनात अशा लोकांसाठी एखादं हॉस्पिटल उभं करावं. एक प्रकारची समाजसेवाचा विचार त्यांच्या मनात रुजला. त्यांनी काही सामाजिक संघटनांना भेटी दिल्या. काही समाजसेवक पुढे आले. सर्वांच्या मदतीने ‘आभाळमाया’ हे हॉस्पिटल सुरू झालं.
श्यामने मेंटल हेल्थ अटेंडंट कोर्स पूर्ण केला होता. या हॉस्पिटलबद्दल कळताच तो इथे आला. फादरांनाही अशा तरुणाची गरज होती. त्यांनी त्याची मुलाखत घेतली आणि त्याला नियुक्त केलं.
तो मनापासून, निष्ठेने काम करत होता. थोड्याच दिवसांत तो फादर फ्रान्सिस यांचा विश्वासू बनला होता.
क्रमशः
श्यामने असं काय केलं, की त्याची आई त्याच्यावर इतकी का रागावली? परत येईल का ती?
जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा