Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-१०)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षितपणे लग्नाची गाठ बांधली गेली. श्याम आणि दुर्गा कसे निभावतील हे नाते, जाणून घ्या या कथेत..

डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-१०

मागील भागात:-

जाणाऱ्या त्या दोघांकडे पाहत श्याम स्वतःशी सुस्कारा टाकत म्हणाला,"हम्म, बरोबर आहे म्हणा, माझ्यापेक्षा फादर जास्त अनुभवी आहेत. त्यांच्या वीस वर्षांच्या सर्व्हिसपुढे माझी तीन वर्षांची सर्व्हिस कुठे लागायची?"

आता पुढे:-

श्याम त्या दोघांच्या मागे मागे आला. फादर तिला वाॅर्ड नं. ९ मध्ये घेऊन आले. जे की रिकामी होती. त्यांच्यासोबत दोन डाॅक्टर होते.

ती मुलगी इकडे तिकडे पाहत ओढणीशी खेळत होती.

फादर तिला शांतपणे म्हणाले," बाळ, तुझे नाव काय?"

त्यांच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं. ती तिच्याच विश्वात हरवल्यासारखी वाटतं होती.

त्यांनी पुन्हा एकदा मवाळ स्वरात तिला विचारले,"ए बाळा, तुझं नाव काय आहे?"

"नाव?..अम्म.. माहिती नाही?" ती इकडे तिकडे पाहत निरागस चेहरा करून डोकं खाजवत विचारले,"ते कोण ठेवतं?"

"आई-वडील नाव ठेवतात." फादरने सांगितले.

"अच्छा! मला तर आईवडील नाहीत." ती हातवारे करत ओठ तिरपे करून म्हणाली.

"ओह! मग तुला सांभाळणारे कोणी असेल ना, त्यांनी तुझे नाव ठेवले असेलच की?" फादर करूण आवाजात पुढे म्हणाले.

"नाही, माझे कुणीच नाही." ती निरागस चेहरा करत ओठ बाहेर काढून म्हणाली.

"असं कसं बाळा? तू जन्माला आलीस तेव्हा तुला वाढवणारे कोणी असेलच ना?" फादरने तिला विचारले.

"माझं कोणीच नाही. माझी मीच जन्मले, माझी मीच वाढले. ही ऽ ऽ ही.." ती वेडेवाकडे हात करत वेण्या ओढत म्हणाली.

फादरांनी एक सुस्कारा सोडला. भुवयावरती एक बोट खरवटत विचारले,"तुझे गाव कोणते जिथे तू राहत होती?"

"ए तू काय पोलीस आहेस काय? किती प्रश्न विचारतोस तू?" ती चिडत गाल फुगवून चढ्या आवाजात म्हणाली.

"ए पोरी, कसे बोलत आहेस तू त्यांच्याशी? जरा आवाज खाली करून रिस्पेस्टने बोल त्यांच्याशी, " ती फादरशी उद्धट बोलली हे श्यामला आवडले नाही. त्यामुळे तो चिडून तिला म्हणाला.

"श्याम, शांत हो, अरे तिला काहीच समजत नाही. तिची कंडिशन तर पाहा." फादर त्याला समजावत म्हणाले.

"हे कोण आहेत?" तिने हळू आवाजात डोकं खाजवत मान तिरकी करत फादरकडे बोट करत श्यामला विचारले.

"हे फादर आहेत." श्याम शांतपणे म्हणाला.

पण तिला समजलं नाही असे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते. तिने दोन्ही हात डोक्यावर ठेवून विचारले,"फादर?"

"ख्रिश्चन फादर!" तिच्या चेहऱ्यावरील भाव ओळखून श्यामने तिला सांगितले.

थोडावेळ पापण्यांची उघडझाप करत मान इकडून तिकडून वळवत तिने त्यांना पाहिले आणि "बाबा" म्हणत गळा काढला. दोन्ही हात कोपऱ्यापासून जोडून त्यांच्या पायाशी लोटांगण घातले.

तसे फादर यांना ऑकवर्ड वाटले. त्यांनी डॉक्टरांकडे आणि श्यामकडे एक नजर टाकली. त्यांनी काय समजायचे ते समजले.

डाॅक्टरांनी तिचे ऑबझर्व्हेशन केले. त्यांनी तिला तपासण्या प्रयत्न केला; पण त्यांच्या गळ्यातील स्टेथोस्कोप पाहून तिने त्यांना
जवळ येऊ दिले नाही. तेव्हा श्यामने डोळ्यांनी असू द्या नंतर पाहा असे खुणावले. फादरसोबत डाॅक्टरही निघून गेले.

श्याम तिला गोड बोलत त्या वाॅर्डमधून बाहेर पडला आणि पटकन बाहेरून दार लावून कडी कुलूप लावले.

"ए शुकशुक, मला का बंद करत आहेस? मी इथे नाही राहणार. ही रूम खूप छोटी आहे. ना बाथरूम आहे, ना बाथटब आहे, ना की स्विमिंग पूल! मग मी इथे कसे राहू?" ती इवलेसे तोंड करून म्हणाली.

दार लोखंडाच्या सळयांचे होते. त्या सळया हाताने घट्ट धरून त्यावर तिने डोकं टेकवले.

तो तिच्याकडे पाहत म्हणाला,"तू तर राजकुमारीच आहेस, बाई. श्रीमंताची लेक जणू. तिकडे पलिकडे एक दुसऱ्या किंगचा पॅलेस आहे. तू म्हणतेस ते सगळं काही आहे. उद्या सकाळी तुला तिकडे घेऊन जातो."

"खरंच ना!" तिने डोळ्यांत चमक आणत विचारले.

"हो, आज ॲडजस्ट करं हं." तो डोळ्यांची उघडझाप करत हसत तिला म्हणाला.

तिने ओठ बाहेर काढत मान वर खाली केली.

चावी बाहेरच्या बाजूला असलेल्या हॅंगरला अडकवले आणि गार्डला लक्ष द्यायला सांगून तो तिकडून निघून गेला.

क्रमशः

कोण आहे ती कसे कळेल?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
0

🎭 Series Post

View all