Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-१७)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी अनपेक्षित त्यांची लग्न गाठ बांधली.कसे निभावतील ते हे नातं? हे जाणून घ्या या कथेत..

डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-१७

मागील भागात:-

"हे घे," तो पाचशेच्या चार नोटा त्याच्या समोर करत म्हणाला,"हे तुझे मेडिकल एक्सपेन्स."

ओठ तिरपे करत त्याने पुन्हा त्यांच्यावर नजर टाकली आणि तो तेथून निघून गेला.

आता पुढे:-

नरेश आणि मंगेश दुर्गाला जबरदस्ती ओढत शाॅक देण्यासाठी घेऊन चालले होते. ती मागे रेटत होती. स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत "ए सोडा मला.." म्हणत धडपड करत पाय जमिनीवर ओढत होती. पण त्या दोघांना तिची दया येत नव्हती.

त्यांनी दोघांनी तिला शाॅक रूममध्ये आणले. तिला जबरदस्तीने बेडवर झोपवले. दोघांनी घट्ट धरल्याने तिला काहीच हालचाल करता येत नव्हती. ती ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात त्यांनी कापसाचा बोळा कोंबला आणि तिच्या कपाळाच्या दोन्ही बाजूंना शाॅकचे इलेक्ट्रोड्स लावले.

शाॅकची मशीन चालू केली. जसा त्या मशीनचा बटन दाबला गेला, दुर्गाच्या शरीरातून एक जोरदार कळ गेली. तिचे डोळे विस्फारले आणि शरीर जागीच ताठ झाले. तोंडातील बोळ्यामुळे तिचा आक्रोश फक्त एका दबलेल्या किंकाळीसारखा घुमत होता.

नरेश आणि मंगेशने तिचे हात-पाय निर्दयीपणे दाबून धरले होते, जेणेकरून ती बेडवरून खाली पडू नये. ती पाय बेडवर आपटत होती. हात गादीच्या कडेला घट्ट आवळून धरले होते.‌ कपाळावर वर घामाचे थेंब जमा झाले होते. तिची ती अवस्था पाहून ते दोघे विकृत हसत होते.

श्याम एका आयाला पेशंटच्या युनिफॉर्मबद्दल सांगत होता. तोच एक वाॅर्डबाॅय धापा टाकत तिथं आला आणि म्हणाला,"अरे श्याम, काल ज्या नवीन मुलीला ॲडमिट केले होते ना, तिने नरेशचे डोकं फोडले म्हणून नरेश आणि मंगेश तिला शिक्षा देण्यासाठी शाॅक रूममध्ये घेऊन गेलेत."

"काय!" त्याने घाबरून विचारले आणि क्षणाचाही विलंब न करता तो वाऱ्याच्या वेगाने त्या रूमच्या दिशेने निघाला. काही मिनिटांतच तिथे पोहोचला.

जोर जोराने दार ठोठावत तो ओरडला,"पटकन दार उघडा."

नरेश आणि मंगेश दोघेही दचकून एकमेकांकडे पाहू लागले.

नरेशने मंगेशला मशीन बंद करण्याची नजरेने खूण केली. त्याने मशीन बंद केली.

श्याम पुन्हा दार ठोठावत रागाने म्हणाला,"दार उघडा म्हणतोय ना, नऱ्या, मंग्या, पटकन दार उघडा."

नरेशने दार उघडले. श्याम पटकन आत आला.

"कोणाच्या परमिशनने तुम्ही हिला शाॅक ट्रिटमेंट दिलेत? काही अक्कल आहे नाही तुम्हाला?" त्याने रागाने त्यांना जाब विचारला.

"तिने माझे डोके फोडले. तिचे डोके ठिकाणावर आणणे गरजेचे होते. ती वेडी आहे तर .." नरेश तावातावाने बोलत होता तोच श्यामने एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकला.

"जस्ट शट् अप! आधी मेन स्विच ऑफ कर." तो जोरात ओरडला.

श्याम पुढे सरसावला. त्याने मशीनकडे पाहिलं, मग दुर्गाकडे. तिच्या डोळ्यांतली भीती त्याला चटका लावून गेली.

त्याने पुढे होऊन तिच्या कपाळाला लावलेले शाॅकचे इलेक्ट्रोड्स काढले. तिच्या तोंडातून बोळा काढला. ते काढताच ती धापा टाकत श्वास घेऊ लागली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होतं.

तिची अवस्था पाहून श्यामचे मन हेलावून गेले. त्यांना रागात पाहून तिला दोन्ही हातावर उचलून तिच्या वाॅर्डमध्ये आणले आणि बेडवर झोपवले. तिच्या अंगावर पांघरूण ओढले आणि तेथून बाहेर पडला.

जेव्हा फादरांना हे सर्व कळले. तेव्हा त्यांनी नरेश आणि मंगेश यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांना खूप सुनावले.

"इथले पेशंटच्या वागण्याने आपण अपसेट होतो हे खरे आहे. पण त्यांना शाॅक ट्रिटमेंट द्यायला डाॅक्टर असो वा मी असो, एकदा नाही दहावेळा विचार करतो. पण तुम्ही काय केलेत, कोणतीही जबाबदारी न मानता असे वागलात आणि वरून माफी मागायला येता! याला काय अर्थ आहे. यू आर व्हेरी इन्सल्टिंग मी. ही तुम्हाला शेवटची वाॅर्गिंन देतोय, पुन्हा असं जर काही केलेत तर तुम्हाला कामावरून डिसमिस करेन. गाॅट इट!"

फादरांनी जवळजवळ धमकावलेच त्यांना.

ते दोघे अपराधी भावनेने मान खाली घालून ऐकत होते. नंतर ते परत एकदा माफी मागून निघून गेले.

क्रमशः

या घटनेचा दुर्गावर काय परिणाम होईल?श्याम तिला कसा सावरेल?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे


0

🎭 Series Post

View all