Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-१८)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली. कसे निभावतील ते हे नातं? जाणून घ्या या कथेत..
डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-१८

मागील भागात:-

फादरांनी जवळजवळ धमकावलेच त्यांना.

ते दोघे अपराधी भावनेने मान खाली घालून ऐकत होते. नंतर ते परत एकदा माफी मागून निघून गेले.

आता पुढे:-

त्या घटनेपासून दुर्गा एकदम शांत-शांत राहू लागली. ती स्वतःतच हरवलेली होती.

दुर्गा बेडवर पडून होती, पण झोप तिच्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. तिचे डोळे छताकडे स्थिर होते. पापण्या मिटल्या की त्या मशीनचा आवाज, पांढरी रूम, घट्ट धरलेले हात… सगळं पुन्हा डोळ्यांसमोर येत होतं. अचानक ती दचकून उठली.

“नको… नको…” तिचा आवाज थरथरत होता.

श्याम लगेच तिच्या जवळ आला. तो काहीच बोलला नाही. फक्त खुर्ची ओढून तिच्या बेडजवळ बसला.

दुर्गा कोपऱ्यात सरकली. गुडघे छातीशी घट्ट आवळून धरले. तिच्या डोळ्यांत भीती ठासून भरलेली होती. कोणताही स्पर्श तिला अजूनच घाबरवत होता.

श्यामने ते ओळखलं.

“मी इथेच आहे,” तो खूप हळू आवाजात म्हणाला. “काही नाही झालं तू झोप. कोणी नाही येणार इथे.”

तो तसाच बसून राहिला.

काही क्षणांनी तिच्या श्वासाचा वेग हळूहळू कमी झाला. तिच्या हाताची बोटं थरथरत होती. ती स्वतःलाच सावरायचा प्रयत्न करत होती.

“ते… ते पुन्हा येतील का?” ती पुन्हा जवळजवळ पुटपुटली.

श्यामच्या छातीत काहीतरी तुटल्यासारखं झालं.

"नाही येणार कोणी? तू शांत झोप." तो तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाला.

तिने एक नजर त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात विश्वास होता. तिने हळूहळू डोळे मिटले. तिच्या अंगावर पांघरूण नीट टाकलं.

पहाटेपर्यंत बसून होता. नंतर तो निघून गेला. त्याचं कामही महत्त्वाचं होतं. बाकी पेशंटचीही जबाबदारी त्याच्यावर होती.

दुसऱ्या दिवशी तो तिला भेटायला आला पण ती काहीच बोलली नाही. तो मावशीला तिची काळजी घ्यायला सांगून निघून गेला.

दोन-तीन दिवस असेच गेले. पेशंटला भेट द्यायला त्यांचे नातेवाईक आले होते. महिना किंवा दोन महिन्यांनी पेशंटची विचारपूस करायला त्यांचे घरचे येत असतं. येताना त्यांच्या आवडीचा खाऊ, खेळणी, कपडे किंवा एखादी भेटवस्तू घेऊन येत.

श्याम प्रत्येकांच्या घरांच्या आदराने, नम्रपणे बोलत होता. त्यांच्या अवस्थेबद्दल सांगत होता. त्यांनी दिलेल्या वस्तू स्वीकारत ते तो घेऊन जातं होता. तेव्हा त्याचे लक्ष दुर्गाच्या वाॅर्डकडे गेले.

ती आजही तशीच गुमसुम झोपली होती. तिचे कोरडे, निस्तेज डोळे पाहून त्याला कसं तरी झालं.

ज्या दिवशी ती इथे आली होती त्या दिवशी किती हसत खेळत होती. तिचे निरागस रूपावरील चैतन्य कुठे तरी हरवले होते. ती चंचल, सुकुमारी दुर्गा दिसत नव्हती. त्याच्या काळजात कालवाकालव झाली.

त्याने निर्मला मावशीला आवाज दिला.

"काय रे?" म्हणत ती तिथे आली.

" हे काय गं, थोडं तिच्याकडे लक्ष दे की. आल्यावर कशी नक्षत्रासारखी दिसत होती. बघा आता कशी दिसत आहे? जरा केस विंचरून, थोडं तिचं आवरून दे की?" तो दुर्गाकडे बघत तिला म्हणाला.

"मला काय एकच काम आहे का हिच आवरत बसायला? तसंही कुठे ज्यादा पैसे मिळतात मला हिचे उठाठेव करण्याचे?" मावशी नाक मुरडत म्हणाली.

"का गं मावशी, असं का म्हणतेस? महिन्याचा पगार मिळतो ना तुला?" मावशीचे शब्द श्यामला टोचले. तो उपहासाने म्हणाला.

"मिळतो ना, पण तेवढ्याने काय होतंय? हुं..जेवढे पैसे तेवढीच सेवा." असे म्हणत मावशी मानेला झटका देत निघून गेली.

श्यामने नकारार्थी मान डोलावली आणि मनात काहीतरी विचार केला. हातातले सामान ठेवून परत दुर्गाकडे आला.

क्रमशः

श्याम पुन्हा तिला पूर्ववत करेल का?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे


0

🎭 Series Post

View all