Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-१)

गुन्हा केलेला असला तरी तिच्या संरक्षणासाठी आणि समाजात मान टिकवण्यासाठी अनपेक्षित त्यांची लग्नाची गाठ बांधली गेली. कसे निवाभतील श्याम आणि दुर्गा हे नाते? सांगणारी कथा
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित-बांधली गाठ

भाग:-१

"फादर, ओ फादर.." वैजयंती मोठं मोठ्याने फादर फर्नांडिस यांना रागात हाक मारत होती.

"ओ काकू, किती मोठ्याने बोलत आहात? कुठे आहात तुम्ही याचं तरी भान ठेवा ना जरा." वाॅर्डबाॅय विलास तिला रागवत म्हणाला.

"ए इल्या, तोंड बंद ठिव तुझं. तू नगं सांगूस मला, कुठं काय बोलायचं हाय ते? तुझ्याशी  हुज्जत घालाया येळ न्हाई मला. सर हो बाजूला. आधी सांग तुझा त्यो फादर कुठं हाय त्यो?" वैजयंती त्याला डोळे दाखवत पुन्हा दात आवळत म्हणाली.

तिचा तो पवित्रा पाहून त्याने आवंढा गिळला. फादर उभ्या असलेल्या दिशेला बोट केले आणि त्याने चुपचाप तेथून पाय काढून घेतला.

वैजयंती ताडताड पावले टाकत फादरच्या दिशेने निघाली. ते डॉक्टरांनी काही तरी बोलत होते.

तिला येताना पाहून फादर यांनी त्या डाॅक्टरांना जाण्याचा इशारा केला तसे ते डाॅक्टर निघून गेले.

चेहऱ्यावर मंद हास्य आणत शांत सुरात फादर तिला आबदीने म्हणाले,"नमस्कार आईसाहेब, कशा आहात तुम्ही?"

"अजिबात बरी न्हाई. लय बेरकी बाय हाय म्या! " वैजयंती काखेतील बोचक सांभाळत रागात म्हणाली.

"तुमच्या बोलण्याचा रोख कळतोय मला, आईसाहेब. पण माफ करा मला. त्यावेळी मला जे योग्य वाटतं होतं तेच मी केलं. त्यात श्यामनेही चूक कबूल केली. त्यामुळे मला तो स्टेप घ्यावा लागला. शेवटी गाॅड जेजसची मर्जी. ते जे करतात ते चांगल्यासाठीच करतात." ते एकदम शांत आवाजात गळ्यातील क्राॅसला हातात घेत त्यावर ओठ टेकवत म्हणाले.

"काय चांगल केले, हं? उलट वाटोळे केले तुम्ही माझ्या लेकराचे. (दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासत दात आवळत) किती इश्वासाने म्या तुमच्यावर त्याला सोपवले होतं अन् तुम्ही इश्वासघात केलात माझा. माझ्या श्यामवर माझा पूर्ण इश्वास हाय. म्या छाती ठोकपणे सांगू शकते. माझा श्याम असलं नीच काम कधीच करणार न्हाई. तुमची गल्लत होतीया, फादर. चोर सोडून संन्यासाला फाशी देत हायसा तुम्ही ! तुमचा त्यो देव डोळे झाकून बसला हाय का वं? त्याला बी दिसना अन् तुम्हास्नी बी दिसना. नसती अदवत माझ्या लेकरावर घेताव तुम्ही." वैजयंती आताही रागातच पण हळव्या स्वरात बोलत होती.

फादर हात पाठीमागे बांधून शांतपणे तिच्या रागाचे बोलणे ऐकून घेत होते.

वैजयंती फादरशी रागात बोलत आहे हे श्यामला कोणीतरी सांगितले. तसा तो हातातील काम सोडून त्या ठिकाणी आला.

"आई, अगं तू कधी आलीस? तू जरा बाजूला ये. मी तुला सगळं समजावून सांगतो." तो नजरेने फादरची माफी मागत वैजयंतीची समजूत काढत म्हणाला.

"मेली तुझी आई? तू तर बोलूच नगं माझ्यासंग. या संन्यासाने सांगितले अन् तू बी यांचं ऐकलेस. एवढा मोठा निर्णय घेताना एकदा बी तुझ्या मनात या म्हतारीचा इचार‌ आला न्हायं का रं? आरं, जीवंत हाय म्या अजून. तरी बी.." आधी तर श्यामला फटकारून बोलणारी वैजयंती नंतर मात्र भावुक होऊन तोंडाला पदर लावत म्हणाली.

क्रमशः

कोण आहे हा श्याम? वैजयंती का असे बोलत होती? कोणता गुन्हा घडला त्याच्या हातून?

जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all