Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-२४)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली. कसे निभावतील ते हे नाते? जाणून घ्या या कथेत?

डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-२४

मागील भागात:-

"ए दुर्गा, काय झालं? का एवढी शांत बसलीस?" त्याने तिला विचारले.

"तूच म्हणालास ना शांत बसं म्हणून. आणि आता मी विचार करत होते." ती गाल फुगवून नाक उडवत म्हणाली.

"कसला?" त्याने कपाळावर आठ्या पाडत विचारले.

आता पुढे:-

"अम्म, कंपाऊंड भोवती नको; मग इथे मला साखरेचं पोत म्हणून पाठीवर घे आणि इथेच या रूममध्ये फिरवं." ती उठून उभी राहिली आणि ड्रेस दोन्ही बाजूला हाताने धरून मान तिरकी करून लाडे लाडे म्हणाली.

"साखरेचे पोतं! उम्म.. थांब." तो विचार करत म्हणाला.

ती मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहत होती. तिच्या क्युट चेहरा पाहून तो तिला नाही म्हणूच शकला नाही.

"ठीक आहे. चल." तो हात झटकत तिला येण्याचा इशारा करत म्हणाला.

तशी ती खुदकन हसली. तो थोडासा खाली वाकला. ती टुणकन उडी मारत त्याच्या पाठीवर, त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफले आणि दोन्ही पाय मागे वर केले आणि त्याच्या पाठीवर बसली. तो एक हात तिच्या गळ्याजवळ असलेल्या हाताला आणि दुसऱ्या हात तिच्या पाठीला लावत तिला फिरवू लागला.

"पोत घ्या पोत, साखरेचं पोत." ती मोठ्याने म्हणत हसत होती.

"ए श्याम, तूही म्हण ना, मी म्हणते तसे." ती मान तिरकी करून त्याला म्हणाली.

त्याने मान डोलावली आणि तोही तिच्या सुरात सूर मिसळून तिला फिरवू लागला.

त्याला तिच्या उभाराचा स्पर्श होत होता. त्यामुळे त्याला ऑकवर्ड वाटू लागले. दोन फेऱ्या झाल्यावर त्याने तिला खाली उतरवले.

"काय झाले? मला अजून फिरवं ना!" ती पाय आपटत भुवया आकसून घेत म्हणाली.

"काय नाही. असे नको. तू मागे फिर. तुला पाठकुळीला घेतो." तो तिला मागे फिरवत म्हणाला.

तिची पाठ त्याच्या पाठीवर टेकवत तिच्या दोन्ही काखेत हात घालून उचलले आणि तो तिला फिरवू लागला.

दोन राऊंड झाले तोच त्याला फादर येताना दिसले. ते त्या दोघांकडे बघत होते. श्यामने घाबरून आवंढा गिळला आणि तो पटकन सरळ उभा राहिला. त्यामुळे ती खाली पडली.

तिच्या बुडाला लागल्याने ती ते चोळत उठत  त्याच्यावर रागावत म्हणाली,"ए, मला का पाडलंस? हुं.."

बोटाने नाक घासले.

फादर आता त्या दोघांजवळ आले होते.

"फादर, हिनेच हट्ट केला साखरेचं पोत खेळण्याचा. मी तिला पाठीमागून पाठीला पाठ लावून घेतले होते." तो दबक्या आवाजात स्पष्टीकरण देत होता.

ती गाल फुगवून त्याच्या दंडावर फटका मारत म्हणाली,"ए फिरवं ना मला."

"शूऽऽ.. गप्प!" तो मान वळवून तर्जनी तोंडावर ठेवून डोळे दाखवत होता.

"श्याम, तुला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तिची अवस्था मी समजू शकतो आणि तुझे डोळेही वाचू शकतो. तुझा कोणताही वाईट हेतू नाही, हे माहिती आहे मला.
तुझ्या डोळ्यांत वासना नाही रे, तिच्या प्रती करूणा आहे. तू तिला लहान बाळ समजून तिच्याशी खेळत होतास, माहिती आहे मला. असो, तिला तिच्या वाॅर्डमध्ये सोडून ये." फादर तिच्याकडे पाहत त्याचा खांदा थोपटत मंद हसत शांत सुरात म्हणाले.

"येस फादर, थॅंक्यू फाॅर अंडरस्टॅंड मी." तो नम्रपणे म्हणाला.

मान डोलावत ते हसत निघून गेले.

ते जाताच तो तिचा कान पकडत म्हणाला,"तुझ्यामुळे मी ओरडा खाता खाता राहिलो. जा आता तुझ्या वाॅर्डमध्ये."

"आह ऽऽ दुखते ना..सोड बरं. जाते मी." ती कान सोडवून घेण्याचा प्रयत्न करत नाक गोळा म्हणाली.

शहरात -

त्या व्यक्तीला भेटायला वकील आला होता. तो वकिलांना पाठ करून उभा सिगार ओढत होता. त्याने तसेच उभे राहून चुटकी वाजवून बोलण्याचा इशारा केला.

"अभयसर, विलच्या अटीनुसार कोट्यवधीची संपत्ती ताईसाहेब आणि त्यांच्या बाळाला मिळेल. त्यासाठी त्यांचा लवकरात लवकर शोध घेऊ लग्न करा. नाहीतर सर्व प्राॅपर्टी विसरा तुम्ही." वकिल फाईल दाखवत म्हणाले.

त्याने हुंकार भरत त्यांना जाण्याचा इशारा केला.

क्रमशः

कोण आहे ही ताईसाहेब आणि हा अभय? कोणाच्या प्राॅपर्टीबद्दल वकील सांगत होते?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.

0

🎭 Series Post

View all