Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-२९)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली. कसे निभावतील ते हे नातं? जाणून घ्या या कथेत..

डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-२९

मागील भागात:-

दोन-तीन दिवसांनी फादरांनी श्यामला औषधांचे बाॅक्स मोजायला दिले. ते तो मोजत होता तर दुर्गा मध्ये मध्ये करत होती. तो प्रेमाने तिला दटावत होता. नरेश आणि मंगेश दुरून हे सर्व बघत होते.

"जेव्हा बघावं तेव्हा यांच्यात काहीतरी चालू असतं. या दोघांचं काही तरी असं करायला हवं की साॅंप भी मरे और लाठी भी ना टुटे!" नरेश त्या दोघांकडे बघत विचार करत त्याला म्हणाला.

आता पुढे:-

एके दिवशी नरेश आणि मंगेश हाॅस्पिटलच्या आवारातील झाडाखाली बोलत उभे होते.

"यार मंग्या, तो श्यामा आता पाक डोक्यात चाललाय माझ्या. जेव्हा बघावं तेव्हा कामात मोडता आणतो." नरेश श्यामबद्दल बोलताना दात खात होता.

"आता काय केलं त्याने?" मंगेशने विचारले.

"अरे काल तो रंग्या पिऊन आला म्हणून त्याला त्याने चांगलंच फैलावर घेतले.‌ त्याने फादरांना जाऊन सांगितले तर त्याला कामावरून कमी केले." नरेश विचार करत म्हणाला.

"आपल्याबाबतही त्याने तसंच केलं. तेव्हाच त्याला धडा शिकवायला हवा होता. छ्या! मिस केलं, यार." मंगेश चिडत म्हणाला.

"अजूनही वेळ गेलेली नाही. रोज रात्री तो रूमबाहेर काॅटवर झोपतो हे मला माहिती आहे. आज रात्री जाऊन त्याचा हात नाही तर पाय तोडूनच टाकू." नरेश विचित्र हसत म्हणाला.

"अरे बाबा, पण आज आपली नाईट ड्युटी आहे ना मग आपल्यावरच अदवत येईल. काही कमी जास्त तर आपण काय करायचे?" मंगेश घाबरत म्हणाला.

"अरे वेड्या, एवढं काय घाबरतोस? काही होणार नाही. कोणत्या तरी वेड्याला वाॅर्डमधून बाहेर काढू. म्हणजे आपोआपच त्याच्यावर सगळे बालन येईल. बोल काय म्हणतोस!" तो विक्षिप्त हसत म्हणाला.

"मायला, लेका अशा बाबतीत तुझं लय चालतंय रे. चल." मंगेश हसत त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्यासोबत निघून गेला.

पण त्यांच हे सगळं बोलणं दुर्गाने ऐकले होते.

"श्यामला मारण्याचा प्लॅन करताय काय? बघाच रात्री मी काय करते ते?" ती मनात विचार करत पुटपुटली.

रात्री जेवण झाल्यावर श्याम नेहमी प्रमाणे बाहेर अंगणात काॅटवर झोपला.

गाॅर्ड चहा पिण्यासाठी जाण्याची वाट दुर्गा पाहत होती. जसा तो गार्ड गेला. तसा तिने आधी काॅटवर उशी ठेवून त्यावर पांघरूण टाकले. मग मगाशी तिने तिच्यासोबत झाडाची एक लांब काटकी आणली होती. ती काठी तिने तिच्या वाॅर्डच्या उभ्या सळया असलेल्या दारातून बाहेर काढली. ती काटकी लांबवून तिने दाराच्या बाजूला हॅंगरला अडकवलेली तिच्या वाॅर्डची चावी अलगद काढून घेतली आणि कुलूप उघडून बाहेर आली. पुन्हा आहे तसे कुलूप लावून चावी आहे त्या ठिकाणी अडकवली. नंतर तिने थेट कर्नलचा वाॅर्ड गाठले. तिथे बाकीचेही काही पेशंट होते.

"कर्नल, हेल्प मी!" ती सयाजींना म्हणाली.

ते खूश होऊन म्हणाले,"कोण मी का? बोल काय काम आहे?" काठीची बंदूक ऐटीत खांद्यावर घेत मिशीला पिळ देत उभे राहिले.

तिचा आवाज ऐकून सर्व पेशंट तिच्या जवळ 'काय म्हणून विचारू' लागले.

"थांबा, माझं जरा ऐका, मी कर्नलला शाॅक ट्रिटमेंटसाठी घेऊन जाणार आहे. तुम्हाला सगळ्यांना यायचं असेल तर चला, मला काही ऑब्जेक्शन नाही." हातवारे करून खांदे आकसून घेत म्हणाली.

"ऑ! शाॅक ट्रिटमेंट..!" असे म्हणत सगळे आपापल्या जागेवर जाऊन झोपले.

'शाॅक ट्रिटमेंट' ऐकताच सयाजी घाबरून खाली वाकले आणि आवंढा गिळत काॅटवर बसले.

"कम कर्नल!" ती हळू आवाजात म्हणाली.

"नो.. नो.. फाॅर शाॅक ट्रिटमेंट नो कर्नल सयाजी कमिंग!" ते खांद्यावरील हातात काठी घेत घाबरलेल्या सूरात म्हणाले.

क्रमशः

दुर्गा कशी वाचवेल श्यामला? कर्नल सयाजी काय करतील?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all