Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-३१)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली गेली. कसे निभावतील हे नातं? जाणून घ्या या कथेत..

डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-३१

मागील भागात:-

तोच नरेश आणि मंगेश हातातील काठी मागे लपवत येत असताना सयाजींना दिसले.

त्या दिशेने बोट करत सयाजी त्याला हळू आवाजात म्हणाले,"लूक एनिमी. कॅप्टन, आय अल्सो फाईट!" उत्साहाने हातातील काठी व्यवस्थित आनंदाने पकडली.

आता पुढे:-

"कर्नल, यू फाईट बीग वाॅर आय फाईट स्माॅल वाॅर! ओके.." श्याम सयाजींना समजावत म्हणाला आणि जाऊ लागला.

"ओके. वन मिनिट, कॅप्टन श्याम.." हातातील काठी व्यवस्थित धरत सयाजीने त्याला थांबवत डोळ्यांने इशारा करत म्हणाले,"गेट क्लोज.."

"गेट ओपन होते म्हणून तर ते आलेत ना." श्याम म्हणाला.

"गेट क्लोज.." ते ओठ दाबत पुन्हा म्हणाले.

त्यांना काय म्हणायचे ते त्याला कळले नाही.

"काय कर्नल तुम्ही पण ना, गेट क्लोज असले असते तर ते आत कसे आले असते?" श्याम हसत म्हणाला.

"ओफ्फो! क्लोज धीस गेट.." त्यांनी आता डोळ्यांनी आणि हाताने त्याच्या पॅन्टीच्या उघड्या झीपकडे इशारा केला. तेव्हा त्याला लक्षात आले. गडबडीत त्याने झीप लावलीच नव्हती.

त्याने ओशाळून जीभ चावली आणि पटकन झीप लावली

"थॅंक्यू, कर्नल." असे म्हणत तो जाऊ लागला.

"वेलकम ॲण्ड ऑल द बेस्ट, कॅप्टन श्याम!" ते हाताचा अंगठा वर करत डोळे मिचकावत हसत म्हणाले.

श्यामने वळून पाहत हसत "येस" अशा आविर्भावात अंगठा दाखवला.

नरेश आणि मंगेश तावातावाने श्यामला मारण्यासाठी निघाले. दोघांच्याही हातात काठी होती. श्यामच्या रूमजवळ आल्यावर बाहेर काॅटवर पांघरूण ओढून घेऊन झोपलेला श्याम आहे असे त्यांना वाटले. दोघे एकमेकांकडे पाहत खुन्नस देत हुंकारत हसले आणि काठी गच्च आवळून धरत नजरेने चल असा इशारा केला.

जवळ आल्यावर ते पाऊले दबकत आले आणि डोळ्यांनी 'चल हाणूया' असा इशारा केला.

दोघे एक साथ पूर्ण ताकदीने त्या काॅटवर श्याम झोपलेला असे समजून जोरात वार करू लागले. जेवढा राग मनात खदखदत होता तेवढा सगळं ते त्या काठीने मारून बाहेर काढत होते.

"मारा.. अजून जोरात मारा." श्याम हळूच पाठीमागून आला आणि त्यांना म्हणाला.

ते मारण्यात एवढे दंग होते की त्यांना श्याम मागे असलेला कळलंच नाही.

"आई ऽऽ आई गं..आ..ऽ ऽ.. मेलो..देवा.." श्याम विव्हळण्याची ॲक्टिंग करत जोरात ओरडत होता.

"मारत राहा..आ ऽ ऽ..ओऽऽ.." श्याम त्यांना प्रोत्साहन देत म्हणाला.

तसे ते दोघे आणखी जोशमध्ये येऊन जोरात प्रहार करू लागले.

दुर्गा लांबून आडोश्याला उभे राहून लपून सगळा तमाशा बघत होती. तिला मज्जा वाटत होती. ती हळू आवाजात टाळ्या वाजवून उड्या मारत हसत होती.

थोड्यावेळाने नरेश आणि मंगेश यांनी काठ्या खाली टाकल्या. जे श्यामने हातात घेतले.

त्या दोघांनी पांघरूण ओढून काढून पाहिले तर तिथे फक्त रचलेल्या उश्या पाहून त्यांना जोराचा धक्काच बसला.

"अ्यॅं..अरे, हा श्याम्या कुठे गेला?" नरेश उशी चाचपत अचंबित होऊन हातवारे करत म्हणाला.

"हो ना, विव्हळ्याचा तर आवाज येत होता मग तो इथे नाही तर कुठे आहे?" मंगेशही अवाक होऊन म्हणाला.

अजूनही त्यांचे लक्ष मागे नव्हते. मग एकदम लक्षात येऊन काठ्या धरून उभ्या असलेल्या श्यामला दुसरा कोणी समजून त्यालाच विचारले.

"कुठे गेला तो?" मंगेशने विचारले.

पण जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा मात्र त्यांचे धाबे दणाणले आणि चेहऱ्यावरचा रंगच उडाला. ते घाबरून पळून जाऊ लागले. तेव्हा श्यामने रागात त्यांच्या पेकटात लाथ घातली.

नरेश धापकन खाली पडला तर मंगेशही पडता पडता वाचला. तो सावरून पळू लागला. तो पळाला त्या दिशेने त्याने काठी भिरकावून दिली. पण त्याला लागली नाही तो तेथून पसार झाला.

नरेशही धडपडत उठला आणि "साॅरी" बोलत त्याने पळ काढला. त्याने मागे पाहण्याची तसदीही घेतली नाही.

क्रमशः

श्यामला कळेल का त्याला वाचवण्यासाठी कोणी मदत केली?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all