डिसेंबर -जानेवारी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-३२
मागील भागात:-
नरेश धापकन खाली पडला तर मंगेशही पडता पडता वाचला. तो सावरून पळून गेला. तो पळाला त्या दिशेने त्याने काठी भिरकावून दिली. पण त्याला लागली नाही, तो तेथून पसार झाला.
नरेशही धडपडत उठला आणि "साॅरी" बोलत त्याने पळ काढला. त्याने मागे पाहण्याची तसदीही घेतली नाही.
आता पुढे:-
"लेकाचे कधी सुधारणार काय माहिती? यांचा बायकालेकरांचा विचार मनात आला नसता तर फादरांना सांगून यांना कायमचे डिसमिस करायला सांगितले असते." त्या दोघांना पळून जाताना पाहून श्याम रागाने पुटपुटला.
तेवढ्यात सयाजी काठी बंदूकीसारखी धरून 'डीढीडीढी' आवाज करत आले.
हाताची मूठ करून हात उंचावून हसत म्हणाले,"आहा! सक्सेस, बीग सक्सेस! इंडियन आर्मी व्हेरी गुड, कॅप्टन श्याम अल्सो व्हेरी गुड. टेक इट."
गर्वाने छाती फुगवत त्यांनी त्याची पाठ थोपटली.
मगाशी श्यामने त्यांना टाॅर्च दिला होता, तो त्याला परत केला.
"कर्नल थॅंक्यू, यू सेव्हड माय लाईफ." श्यामने त्यांचे मनापासून आभार मानले.
"हां, व्हेन कर्नल सयाजी इज हियर देन डोन्ट फियर." ते छातीवर हात ठेवत अभिमानाने म्हणाले.
"हिंदी-चिनी," श्याम दोन्ही बाहू फैलावत हसत म्हणाला.
"भाई-भाई," म्हणत सयाजींने त्याला हसत आलिंगन दिले.
"अं ऽऽ.. कर्नल, एनिमीज माझ्यावरती अटॅक करणार आहेत, हे तुम्हाला कोणी सांगितले." श्याम त्यांच्या खांद्यावर हात ठेवत विचारले.
लपून पाहणाऱ्या दुर्गाला टेंशन आलं. सयाजी तिचं नाव सांगतील असे तिला वाटले. म्हणून ती हळूच डोकावून त्यांना नकारार्थी मान डोलावत सांगू नका या आविर्भावात तर्जनीही हालवत होती.
तिच्याकडे पाहत ते म्हणाले,"हॅ! नो, नो..हे सांगायचे नसते. कर्नल सयाजी नो टेलिंग. इट्स अ सिक्रेट, ओके."
सयाजींनी गुपित सांगितले नाही. म्हणून दुर्गाला आनंद झाला होता. तो आनंद फार काळ टिकला नाही.
कारण सयाजीने लगेच तिला सुरात हाक मारली,"कम ऑन, दुर्गा.."
तिने कपाळावर हात मारून घेतला.
ती गुपचुप मान खाली घालून श्यामच्या पुढ्यात येऊन उभी राहिली.
"थॅंक्यू, दुर्गा. माझा जीव वाचवण्यासाठी. पण तुला कसं कळलं की ते मला मारणार आहेत ते?" श्यामने आधी तिचे आभार मानले आणि नंतर तिला विचारले.
ती वेण्या हातात धरून डुलत-डुलत तिने काय आणि कसे ऐकले ते सांगितले.
गाॅर्ड आणि वाॅचमनची नजर चुकवून ती आली होती आणि सोबत ती कर्नललाही घेऊन आली होती. चुकून जर नरेश आणि मंगेश यांनी पाहिले असते, त्यांना काही केले असते तर हा विचार करूनच तो मनात घाबरला. म्हणून तो तिच्यावर रागावला.
तिने गुपचुप त्यांचे बोलणे ऐकून घेतले. सयाजीही शांत उभे होते. त्याने आधी सयाजीला त्यांच्या वाॅर्डमध्ये सोडले आणि नंतर दुर्गाला घेऊन चालला होता.
ती वेडीवाकडी चालत बडबड गीत गुणगुणत होती.
"अक्कन माती चिक्कन माती, चिखलात फसले दोन हत्ती, हत्ती केवढे जाडजूड, डोंगराएवढे मोठे धूड..ये ऽ ऽ.." ते हावभावसहीत गाणे गुणगुणत टाळ्या वाजवत चालत होती.
"ए पोरी, जरा शांतपणे चाल गं." श्याम वैतागून म्हणाला आणि तिच्या हाताच्या कोपऱ्याला धरत ओढत घेऊन जात होता.
तेवढ्यात एक कार हाॅस्पिटलमध्ये दाखल झाली. तिच्या हेडलाईटचा प्रकाश डोळ्यांवर पडल्याने दोघांनीही डोळ्यांवर हात ठेवला.
प्रकाश बंद झाला आणि गाडीतून एक व्यक्ती खाली उतरली. त्या व्यक्तीला पाहून श्यामने आवंढा गिळला.
क्रमशः
कोण असेल ती व्यक्ती?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा