डिसेंबर -जानेवारी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-३७
मागील भागात:-
"येस येस.." असे म्हणत फादर अजून काही तरी बोलणार होते तोच कोणीतरी मोठ्याने गाणं म्हणण्याचा आणि काही तरी वाजल्याचा मोठ्याने आवाज आला.
आता पुढे:-
फादर, श्याम आणि डाॅक्टर सर्वांनी बाहेर धाव घेतली. बाहेर येऊन पाहिले तर दुर्गा विचित्र हसत, वेडेवाकडे हावभाव करत थाळी काठी वाजवत गाणं म्हणत होती.
दुर्गाने आज पेशंटचा यूनिफाॅर्म घातला होता. आकाशी रंगाचा पॅन्ट शर्ट होता. तिने एका पायाची पॅन्ट वर घेतली होती. केस विस्कटलेले होते.
बाकीचे पेशंट तिच्या भोवती जमा झालेले होते. ती गोल फिरत नाचत गात होती.
"A-tishoo! A-tishoo!
We all fall down.”
We all fall down.”
“A-tishoo! A-tishoo!
We all fall down.”
We all fall down.”
श्याम आणि बाकी वाॅर्ड त्यांना सावरायचा प्रयत्न करत होते. पण दुर्गा तेथून निसटली आणि पुढे जाऊन गोल फिरू लागली. एका क्षणी अचानक ती पोटाला एक हात लावून विव्हळली आणि दुसरा हात डोक्याला लावत खाली पडली. तिच्या सर्वांगाला घाम सुटला होता. सगळे घाबरून तिच्या दिशेने धावले.
श्यामने तिला पटकन दोन्ही हातात उचलून घेतले आणि तिला तिच्या वाॅर्डमध्ये आणले. तिला पाणी पाजले. ती कशीबशी दोन घोट पाणी प्यायली.
सोबत फादर, डाॅ. सुवर्णा आणि अजून एक लेडी डाॅक्टर होते.
त्या डाॅक्टरांनी सर्वांना बाहेर काढले. त्यांनी तिला चेक केले. दोघींनी एकमेकींकडे पाहिले. त्यांना वेगळीच शंका येऊ लागली. तरी पूर्ण चेकअप केल्याशिवाय शंकेचे निरसन होणार नाही म्हणून त्या दोघांनी सध्या तरी मौन पाळले.
फादर आणि श्यामने काळजीने त्यांना विचारले,"डाॅक्टर, कशी आहे ती, काय झालं तिला?"
"सध्या तरी ती बरी आहे. ती गोल फिरल्याने पोटात ढवळलं आणि चक्कर आल्याने ती पडली. बाकी टेस्ट केल्यावर उद्या सकाळपर्यंत कळेल." डाॅ. सुवर्णा म्हणाली आणि निघून गेली. तिच्या मागोमाग दुसरी डाॅक्टरही निघून गेली.
"काळजी घे." असे म्हणत फादर आणि श्याम निघून गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे श्याम फुलांचे गुच्छ घेऊन देवीला अर्पण करायला चालला होता. सगळे त्याच्याकडे रोखून पाहत होते. त्याने त्याकडे कानाडोळा केला आणि तो देवीच्या मंदिराकडे निघाला. फादरही आता तिथे आले होते. तेही गंभीरपणे त्याला पाहत होते.
फादर त्याला म्हणाले,"श्याम इकडे ये जरा."
"आलो फादर, देवीआईच्या चरणी फुले अर्पण करून येतो." श्याम हातातील फुलांचा गुच्छ त्यांना दाखवत म्हणाला आणि जाऊ लागला.
"बघा.. बघा..फादर, करून सरून..नामा निराळा बनून कसा मान वर करून चालला आहे." मावशी नाक मुरडत म्हणाली.
"हा ना, सगळ्यांत असला की राम आणि एकांतात असला की श्याम. नावासारखाचं वागला की हा. त्या देवीचं दर्शन नंतर घे. ओय, महापुरूष इकडे येण्याचे कष्ट घ्या जरा." नरेश त्याला म्हणाला.
सगळे असे का बघत, बोलत आहेत हे श्यामला कळेना. तो जागीच विचार करत थांबला.
"ए कानांत काही घातले का तुझ्या, ऐकू येत नाही का तुला? हां, बास कर तुझ्या चांगुलपणाची नाटकं! फादर बोलवत आहेत तर कळतं नाही का तुला?"
"श्याम, जरा इकडे ये." फादर गंभीर आवाजात त्याला म्हणाले.
क्रमशः
सगळे का श्यामकडे असे बघून बोलत आहेत? काय झाले असेल?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा