Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-३८)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली गेली. कसे निभावतील ते दोघे हे नातं? जाणून घ्या या कथेत..

डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-३८

मागील भागात:-

"ए कानांत काही घातले का तुझ्या, ऐकू येत नाही का तुला? हां, बास कर चांगुलपणाची नाटकं! फादर बोलवत आहेत तर कळतं नाही का तुला?"

"श्याम, जरा इकडे ये." फादर गंभीर आवाजात त्याला म्हणाले.

आता पुढे:-

श्याम जसं जसा पुढे येत होता तसं तसे फादर यांना त्याचे आणि दुर्गाचे एकत्र असलेले क्षण आठवले. तसे त्यांचा चेहरा आणखी गंभीर झाला.

तो पुढे त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. तो काही विचारणार तोच फादर त्याच्याकडे पाठ करून समोर दिसणाऱ्या डोंगराकडे तोंड करून विचारले,"श्याम, मी या निसर्गाच्या सान्निध्यात हे हाॅस्पिटल का वसवले, माहिती आहे का तुला?"

श्याम गोंधळून त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहत होता. फादर असे का विचारत आहेत हे त्याला कळत नव्हते. त्याने नकारार्थी मान डोलावली.

"रोज दिवस उजाडला की तो उंच डोंगर दृढतेने छातीठोकपणे उभा राहिलेला दिसतो. ते पाहिले की तोच दृढपणा समाजसेवा करताना आपल्या मनातही येतो. माणूस कोणत्याही आशा अमिषाला बळी न पडता त्या डोंगर-पर्वतासारखं अचल राहावं. माझंही तुझ्यावर असाच दृढ अचल, विश्वास होता. पण तो अचल, दृढ विश्वास तू खोटं ठरवलंस. लोकांच्या नजरेतून तर तू उतरलासच आणि माझ्या नजरेतूनही तू उतरलास. माझ्या मनात तुझे जे स्थान होते, ते स्थान आज गमावलेस तू!" फादर त्याच्याकडे पाहत नाराजीने म्हणाले.

आज पहिल्यांदा त्याला फादरांच्या डोळ्यांत अविश्वास आणि नाराजी दिसली. थोडी रागीट छटा डोळ्यांत आणि चेहऱ्यावर उमटलेली दिसत होती. जे पाहून त्याच्या मनात चलबिचल सुरू झाली.

"तुम्ही हे सगळे मला का सांगत आहात, फादर? माझ्याकडून काही चूक झाली का?" त्याने गोंधळून नाराजीने विचारले.

"श्याम, तू..नो, नो.." असे म्हणत फादरने दीर्घ सुस्कारा सोडला. पुढचे शब्द त्यांच्या तोंडून निघालेच नाही जणू ते शब्द त्यांच्या गळ्यातच अडकले.

ते हाताची मूठ आवळून थोडे पुढे निघून गेले आणि देवीच्या मंदिरासमोर थांबले.

"प्लीज..फादर, काय आहे तुमच्या मनात ? का असे म्हणालात ते स्पष्टपणे सांगा ना." श्याम त्यांच्या मागे येत विनंती करत म्हणाला.

"श्याम, त्या दिवशी तिचा फोटो पेपरमध्ये पब्लिश केले तर तिचे आयुष्य खराब होईल असे म्हणणारा तू! तूच त्या पोरीचे आयुष्य खराब केलेस?" ते क्षणभर थांबले आणि दीर्घ श्वास घेऊन अडखळत म्हणाले, "ती.. प्रेग्नंट आहे." फादरने बाॅम्ब फोडला.

“ती… प्रेग्नंट आहे.” तो शब्द ऐकून श्याम जागीच स्तब्ध झाला.

तेवढ्यात दोन नर्स दुर्गाला तिच्या वाॅर्डमध्ये नेताना त्याच्या दृष्टीस पडल. तिचा चेहरा पूर्णपणे कोमेजून गेला होता.

"ती प्रेग्नंट होण्यास तूच कारणीभूत आहेस, असं सगळ्यांचं म्हणणं आहे." फादर सगळ्यांकडे हात करत त्वेषाने म्हणाले.

हे ऐकून तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि हातातील पुष्पगुच्छ गळून खाली पडला.

क्षणभर त्याच्या डोळ्यांत आश्चर्य चमकलं. त्याने सगळयांकडे एक नजर फिरवली आणि दुर्गाच्या वाॅर्डकडे त्याची नजर गेली.

ती पाठमोरी बसलेली त्याला दिसली.

त्याने मान खाली घातली. तो शांतपणे उभा राहिला; पळ काढण्याचा विचारही मनाला शिवला नाही.

नरेश आणि मंगेश यांना आयत कोलीत सापडलं होतं. ते दोघे तर श्यामला आधीच पाण्यात पाहत होते. दातात धरत होते. त्याच्यावर आरोप करण्याची ही संधी ते कसे हातातून जाऊ देणार होते.

नरेश त्याच्याकडे पाहत कुत्सित हसत म्हणाला,"मांजर जेव्हा डोळे मिटून दूध पिते तेव्हा तिला वाट कोणीच पाहिले नाही असं वाटतं. हा तोच मांजर ओह! साॅरी मांजर नाही बोका आहे."

मंगेशही कुठे मागे राहणार होता. त्यानेही वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे होते.

तोही त्याच्याकडे पाहत म्हणाला,"ती पोरगी आल्याच्या दुसऱ्याच दिवशी हे श्याम महाशय स्वतः तिला अंघोळीला घेऊन गेले. ही गोष्ट तर सर्वांनाच माहिती आहे."

तो दोन्ही हात खिशात घालून तिरकस श्यामला पाहत होता.

क्रमशः

श्याम का शांत उभा आहे? फादर काय शिक्षा देतील?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all