डिसेंबर -जानेवारी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:- ३९
मागील भागात:-
तोही त्याच्याकडे पाहत म्हणाला,"ती पोरगी आल्याच्या दुसऱ्याच दिवशी श्याम महाशय स्वतः तिला अंघोळीला घेऊन गेले. ही गोष्ट तर सर्वांनाच माहिती आहे."
तो दोन्ही हात खिशात घालून तिरकस नजरेने श्यामकडे पाहत होता.
आता पुढे:-
निर्मला मावशीही म्हणाली,"कितीतरी लेडीज पेशंट आहेत. मी सगळ्यांकडे लक्ष देत होते. पण हा मला सारखं सारखं तिच्याकडे चांगलं लक्ष दे म्हणायचा. कधी कधी तो तिच्यासाठी माझा जीव मेटाकुटीला आणायचा. तो का असे म्हणायचा, हे आता मला लक्षात येतंय."
तिने एका हाताची मूठ दुसऱ्या हातावर आपटत श्यामकडे पाहून नाक मुरडले.
फादर डोळ्यांवरचा चष्मा काढून भावूक स्वरात म्हणाले,"श्याम, ती मुलगी वेडी आहे, या एकाच कारणामुळे तू तिच्यासोबत जे चुकीचे वागलास. त्या चुकीपासून तू पळून जाऊ शकत नाहीस. अरे यामुळे तिला भविष्यात किती अडचणींना सामोरे जावे लागेल याची कल्पना आहे का तुला? उद्या ती मुलगी पूर्ण बरी झाली आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही, बिनलग्नाची ती आई होणार आहे. हे जर तिला कळलं, तर तिच्या मनावर होणाऱ्या परिणामांची कल्पना कर. काय अवस्था होईल तिची? एकतर ती पुन्हा वेडी होईल किंवा आत्महत्याच करेल. बलात्कार झालेल्या मुलीला समाज कोणत्या नजरेने पाहतो हे मी तुला वेगळं काही सांगायची गरज नाही. तिला तो बलात्कारी कोण हे माहिती नसतं, रोज रक्ताचे अश्रू गाळत असते आणि आपला समाज तिला रोज टोमणे आणि उपदेशांचे डोस पाजून, दोष देऊन मारत असतो. अशी अवस्था तिची व्हावी असे तुला वाटते का? "
श्याम तरीही शांतपणे उभा होता.
काही क्षण शांततेत गेला.
फादर पुन्हा उदास होऊन म्हणाले,"या हाॅस्पिटलला कलंक लागले तरी किंवा माझ्या नावाला बट्टा लागले तरी मी ते सहन करू शकतो; पण तू मुलगी आई होण्यास तू कारणीभूत आहेस हे मात्र तू सांगू नकोस. कारण ते सहन करण्याची ताकद माझ्यात नाही रे, श्याम." शेवटचे वाक्य बोलताना त्यांचे डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
ते आवंढा गिळत त्याचे हात हातात घेत, हळव्या स्वरात म्हणाले,"प्लीज श्याम, आय बेग यू."
श्यामला ही भरून आले होते. पण लगेचच त्यावर संयमाचं आवरण आलं.
त्याचे डोळे भरून आले होते. फादर यांच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत गहिवरल्या सुरात म्हणाला,"मी कारणीभूत नाही असं म्हणणार नाही, फादर. मी तिच्याशी प्रेमाने वागत होतो हे खरे आहे. मीच कुठेतरी कारणीभूत असेल असं वाटत आहे." शेवटचे वाक्य बोलून आवंढा गिळत त्याने मान खाली घातली.
त्याचे बोलणे ऐकून फादरांचे त्याच्या हातातील हात सुटले.
"श्याम सगळ्यांशी प्रेमाने, मायेने मुलांसारखे सांभाळून घेतो, पवित्र भावनेने आपुलकीने काम करतो, असे मी छाती फुगवून सर्वांना गर्वाने सांगत होतो." फादर थरथरत्या आवाजात म्हणाले.
"पण तू तर..तू ही तरूण आहेस हे मी विसरलोच होतो. तू असे काही..नो.. नो.." पुढे त्यांना बोलताच आले नाही इतका त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यांचा कंठ शब्दांसाठी साथ देईना.
तो पाणावल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होता. ते आता मंदिराच्या खांबाला धरून त्याला पाठमोरे उभे होते.
ते नाक ओढत दाटत्या कंठाने वळून पाहत म्हणाले,"ठीक आहे, श्याम. मी एक सांगतो ते तू करशील?"
क्रमशः
काय करायला सांगतील फादर त्याला? तो ते करेल का?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा