डिसेंबर -जानेवारी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक;- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-३
मागील भागात:-
श्यामची आई वैजयंती त्याच्यावर रागावून निघून जाते. तो तिच्या वतीने फादरची माफी मागतो.
आता पुढे:-
श्याम प्रत्येक वाॅर्डमध्ये हजेरी लावत, सगळ्या रूग्णांची चौकशी करत होता.
तेवढ्यात एक नर्स घाईघाईने त्याच्याकडे धावत आली आणि वैतागलेल्या सुरात म्हणाली,"ए श्याम, ती काही माझं ऐकत नाहिये. औषध घ्यायला नकार देतेय. तुच साभांळ बाबा तिला, शेवटी ती तुझीच.."
बोलता बोलता ती नर्स थांबली आणि ओठांच्या कोपऱ्यात तिरकस हसली.
त्याने एक कोरडा कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि तिला काही न बोलता त्या रूमकडे वळली.
रूममध्ये ती गुडघ्याभोवती हाताचा विळखा घालून त्यावर डोकं टेकवून शून्यात नजर लावून बसली होती.
ती तिच होती, दोन दिवसांपूर्वी त्याने तिच्याशी लग्न केले होते.
हाॅस्पिटलच्या आवारात देवीचे एक छोटेसे मंदिर होते. तो देवीचा निस्सीम भक्त तर होताच शिवाय त्याची देवीवर नितांत श्रद्धाही होती.
रोज सकाळी तो तेथील बागेतील फुले आणून श्रद्धेने देवीच्या पायाशी वाहत होता. त्याच देवीला साक्षी मानून तिच्याच गळ्यातील मंगळसूत्र त्याने तिच्या गळ्यात बांधले होते आणि त्याच मंदिरातील कुंकू तिच्या कपाळावर लावले होते.
त्याला पाहून ती पाय आणखी आकसून घेत त्याच्याकडे पाहू लागली. डोक्यावरचे केस अस्ताव्यस्त झालेले, साडीचा पदरही अस्ताव्यस्त खाली घसरेला होता. कपाळावरील टिकली एका बाजूला गेली होती.
श्याम हळूच तिच्याजवळ गेला. तिनेही त्याला विरोध केला नाही.
त्याने सावधपणे तिचा साडीचा पदर खांद्यावर नीट टाकला. टिकली कपाळावर व्यवस्थित लावली. तिला हाताला धरून उठवले आणि बेडवर बसवले.
ती गुरफटून डोकं खाजवत त्याच्याकडे पाहू लागली आणि चिडचिड्या आवाजात म्हणाली,"तू का आलास? जा.. मला नाही बोलायचं तुझ्याशी?"
"का म्हणजे? तुझ्याशी बोलायला आलो. तुझ्या औषधांची वेळ झाली. तू का नर्सचे ऐकत नाहीस? ती आली होती ना तुला औषध द्यायला मग का घेतले नाहीस तू? तुला लवकर बरं व्हायचे नाही का? चल, घे आता औषध." तो तिचे केस हाताने व्यवस्थित करत तिला प्रेमाने समजावत होता.
"ती ..ती खूप वाईट आहे. तिने मला चाॅकलेट दिले नाही. रोज मला म्हणते पण देत नाही. आणि माहिती आहे का ?..
थोड थांबून कुजबुजत म्हणाली, "ती..ती मला वेडी..वेडी म्हणाली. मी वेडी नाही ना रे.."
थोड थांबून कुजबुजत म्हणाली, "ती..ती मला वेडी..वेडी म्हणाली. मी वेडी नाही ना रे.."
हसता हसता ती रडत होती.
तिचे सगळे हावभाव निरागस बाळाप्रमाणे होते.
तिची मानसिक स्थिती ठीक नव्हती. ती मध्येच हसायची मध्येच रडायची. नाही तर शून्यात नजर हरवून बसायची.
श्यामच काळीज हेलावून जातं होतं.
"नाही गं राणी, तू वेडी नाहीस. मी रागावतो हं तिला आणि हे बघ मी तुझ्यासाठी चाॅकलेट आणले. आता तर घेशील ना तू औषध." तो खिशातील कॅडबरी काढून तिच्यासमोर नाचवत म्हणाला.
तिच्या डोळ्यांतील बाहुल्या आनंदाने नाचल्या. ती खुशीने टाळ्या वाजवू लागली आणि नंतर कॅडबरी घेण्यासाठी त्याच्या हाताकडे झेपावली.
तो हात मागे घेत म्हणाला,"नो... असं नाही मिळणार चाॅकलेट. आधी औषध मग चाॅकलेट!" तो टॅबलेट तिच्या समोर करत म्हणाला.
ती गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली.
क्रमशः
कोणत्या कारणाने श्यामने वेड्या मुलीशी लग्न केले असेल?
जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा