Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-४०)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली गेली. कसे निभावतील ते हे नातं? जाणून घ्या या कथेत..

डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-४०

मागील भागात:-

तो पाणावल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होता. ते आता मंदिराच्या खांबाला धरून त्याला पाठमोरे उभे होते.

ते नाक ओढत दाटत्या कंठाने वळून पाहत म्हणाले,"ठीक आहे, श्याम. मी एक सांगतो ते तू करशील?"

आता पुढे:-

श्यामच्या डोळ्यांतून अश्रू ओघाळत होते. दोन्ही हाताच्या मुठी गच्च आवळून, तो आवंढा गिळत स्वतःला सावरत म्हणाला,"सांगा फादर, काय करू मी?"

"त्या मुलीच्या घरचे कोणीही येऊ देत, मी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन." फादर गंभीर नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाले.

मंदिरातील देवीच्या मूर्तीकडे हात करत अगतिक स्वरात फादर पुढे म्हणाले,"या देवीला रोज फुले अर्पण करून तिला पुजतोस ना. मग याच देवीला साक्षी मानून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र त्या मुलीच्या गळ्यात बांधशील?"

तो क्षणांचाही विलंब न करता तिच्या वाॅर्डकडे पाहिलं आणि ठामपणे म्हणाला,"ठीक आहे, फादर."

काल जेव्हा फादर आणि श्याम डाॅक्टरांशी बोलत होते. तेव्हा फिरत-फिरत तिथे ऑफिसच्या बाहेर आलेल्या दुर्गाच्या कानावर त्यांचे बोलणे पडले. तिचे नाव ऐकून ती तिथेच थांबली.

जेव्हा ते तिला डिस्चार्ज देण्याचा विचार बोलून दाखवले. तेव्हा तिला टेन्शन आलं.

तिचं नाव ऐकताच तिच्या मनात धडकी भरली. मग तिने मनात विचार करून अस्वस्थ होत बडबडगीत म्हणत, नाचगाणी करत स्वतःला सावरत होती. त्याच वेळी ती चक्कर येऊन पडली.

जेव्हा डाॅ.  सुवर्णा ती प्रेग्नंट आहे असे दुसऱ्या  डाॅक्टरांना सांगताना तिच्या कानांवर आदळले.

ती आतून कोसळून गेली.

"मी प्रेग्नंट आहे, पण.." ती पोटावर हात ठेवून पुटपुटली. तिच्या डोळ्यांत आसवांची गर्दी जमा झाली. मन पूर्णपणे सैरभैर झाले.

जेव्हा फादर आणि बाकी सारे श्यामवर त्याने न केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.
तिचे वाॅर्ड मंदिराच्या समोर असल्याने तिला सगळं स्पष्ट ऐकू येत होते.

तिला ओरडून ओरडून खरं सांगावसं वाटतं होतं. पण सांगण्याची हिंमत तिला झाली नाही.

"एका भल्या माणसाला माझ्यामुळे मान खाली घालावी लागत आहे. कसली अभागी आहे मी, चांगल्या, सभ्य, देवमाणूसावर आरोप होत आहे आणि मी काहीच करू शकत नाही."

क्षणभर थांबून ती पुटपुटली," त्या पेक्षा मीच संपले तर सगळे मोकळे होतील. प्रश्नच नसणार नाही. मी नसले तर प्रश्नच उरणार नाहीत. हा.. हाच उपाय आहे, मीच मरते." असे म्हणत ती आजूबाजूला काही मिळतं का ते शोधून लागली.

तिने मनात आत्महत्या करण्याचा विचार पक्का केला.

तिची नजर काॅटवरच्या बेडशीटकडे गेली. तिने पटकन काॅटवरची बेडशीट ओढून काढली आणि काॅटवर चढली. त्या बेडशीटचे एक टोक तिने छतावरील पंख्याला अडकवून घट्ट गाठ मारली आणि दुसरं टोक गळ्याभोवती आवळणार तोच.. श्यामने लग्नाला होकार दिल्याची बातमी तिच्या कानावर आली. तिला धक्काच बसला.

तिने गळ्याभोवती बेडशीटची पकड सैल होऊन हातातून गळून पडला आणि ती काॅटवरून खाली उतरली आणि मटकन खाली बसली.

तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

"श्याम, का करताय तुम्ही असं? मी तुमच्या योग्यतेची नाही ओ? कलंकिनी आहे मी! दुसऱ्याचं पाप स्वतःच्या माथी का घेताय. सगळ्यांना खरं सांगा ना, श्याम ? खूप मोठं रिस्क घेत आहात तुम्ही? असं करू नका ओ? " असे मनात म्हणत ती ढसाढसा रडू लागली.

श्यामने पायातील बूट काढले आणि मंदिरात आला. आधी त्याने देवीचे दर्शन घेतले. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढताना तो देवीला मनात म्हणाला,"देवीआई, तुला तर सगळं काही माहिती आहे. पण तिच्यासाठी मी हे पाऊल उचलत आहे. पुढे याचे परिणाम काय होतील माहिती नाही. पण सध्या मला जे योग्य वाटते तेच मी करतोय."

त्याने मंगळसूत्र हातात घेतले. एकटक पाहत मनोभावे कपाळावर लावले आणि बाहेर आला. तोपर्यंत डाॅ. सुवर्णाने दुर्गाला तिच्या वाॅर्डमधून हाताला धरून आणले. ती मनात नसतानाही चुपचाप तिच्याबरोबर खाली मान घालून आली.

देवीला साक्षी मानून श्यामने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आणि मंदिरातील कुंकू तिच्या कपाळावर लावले.

क्रमशः

श्यामने दुर्गाशी लग्न करण्याचा का निर्णय घेतला? दुर्गा नेमकी कोण आहे? तिला अशा अवस्थेत आणणारा कोण आहे?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all