Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-४१)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली गेली. कसे निभावतील ते हे नातं? जाणून घ्या या कथेत..

डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-४१

मागील भागात:-

त्याने मंगळसूत्र हातात घेतले. ते एकटक पाहून घेत मनोभावे कपाळावर लावले आणि बाहेर आला. तोपर्यंत डाॅ. सुवर्णाने दुर्गाला तिच्या वाॅर्डमधून हाताला धरून आणले. ती मनात नसतानाही चुपचाप तिच्याबरोबर खाली मान घालून आली.

देवीला साक्षी मानून श्यामने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आणि मंदिरातील कुंकू तिच्या कपाळावर लावले.

आता पुढे:-

मंदिरातील कुंकू कपाळावर लावल्यावर दुर्गा आतून हलली. शरीराला हलके कंपन सुटले होते. डोळे आपसुकच बंद झाले.  मनात विचारांचे वादळ शमता शमत नव्हते. डोळ्यांतील अश्रूंना तिने पापण्यांचा बांध घातला होता. पण गळ्यातला कंठमणीचीही हलकीशी हालचाल झाली.

तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कपाळावरील कुंकू पाहून फादरांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. तर श्यामची लग्न गाठ एका वेडीबरोबर झाले म्हणून नरेश आणि मंगेश मनोमन सुखावले होते. एका दृष्टीने त्याचे आयुष्य उध्वस्त झाले म्हणून त्यांच्या मनाला शांतता मिळाली होती.

लग्न लागताच सगळे आपापल्या कामाला निघून गेले. फादर त्यांच्याजवळ आले. श्यामने खाली वाकून त्यांचा आशीर्वाद घेतला. तिच्यावर त्याने एक नजर टाकली. पण ती तशीच मान खाली घालून उभी होती. सध्या तिला समजून घेत तो काही बोलला नाही.

फादरांनी त्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवून "गाॅड ब्लेस यू" असा आशीर्वाद दिला.

एक नर्स तिला घेऊन गेली. तो तिला जाताना बघत होता. ती जाताच फादरही त्याच्या खांद्याला थोपटत निघून गेले. मग तोही त्याच्या कामाला निघून गेला.

काही क्षणांपूर्वी श्याम आणि दुर्गा यांचे आयुष्य बदलून गेले. नियतीने अनपेक्षितपणे लग्नबंधनाची गाठ बांधली होती. पुढे काय होणार, या नात्याचं भविष्य काय असणार हे दोघांनाही माहिती नव्हतं.

दुर्गा तिच्या वाॅर्डमध्ये आली तेव्हा नुकतीच श्यामने बांधलेल्या मंगळसूत्र तिने हातात घेतले आणि तिचे डोळे भरून आले. इतक्या उशीरपर्यंत तिने पापण्यांच्या बांधाने अश्रूंना अडवून ठेवले होते. तो बांध फुटला. रडण्याचा आवाज कोणाला येऊ नये म्हणून ती तोंड उशीत खुपसून रडू लागली.

मनसोक्त रडल्याने तिला हलकं वाटत होतं. पण रडल्याने तिचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. आपल्यामुळे एका निरपराधाला शिक्षा झाली याचे शल्य तिला टोचत होते. मनावर प्रचंड ओझं होऊ लागलं त्यामुळे तिचा श्वास गुदमरू लागला.

तिच्या मनात सारखा एकच विचार घोळू लागला,"श्यामने का माझ्याशी लग्न केले? माझ्यावर दया, सहानुभूती दाखवून की माणुसकी म्हणून की आणखी काही कारण असेल?"

विचार करून-करून तिचं डोकं दुखू लागलं. त्याच विचारांच्या तंद्रीत तिला निद्रादेवीने कवटाळून घेतले.

इकडे श्यामच्या डोक्यातही तिचेच विचार घोळत होते.

"का मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलो? तिची जबाबदारी मी नाकारू ही शकलो असतो. पण का मी तिला दुःखात पाहू शकलो नाही? पण जाऊ दे, आता झालं ते झालं. मला तिला जपायचं आहे. तिची काळजी घ्यायची आहे." त्याच्या एका मनाने त्याला सावरलं पण दुसरं मनाने लगेच त्याला प्रश्न विचारला,"ती बरी झाल्यावर मला ओळख नाही दिली तर.."

या प्रश्नाच्या उत्तराने तो स्तब्ध झाला. पण पहिल्या मनाने दिलेल्या कौलाने त्याला सावरत दिलासा दिला,"जे होईल ते होईल, सध्या जे झालं ते पाहू."

दोन-तीन तासांनंतर त्याचं काम संपवून तो तिच्या वाॅर्डमध्ये आला तर ती झोपलेली होती. तिचा मलूल चेहरा पाहून त्याला कसं तरीच झालं. तिच्या कपाळावर मायेने फिरवत त्याने तिला हळूवार साद घातली,"दुर्गा..ए दुर्गा..उठ राणी.."

क्रमशः

श्याम आणि दुर्गा यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतील का?

©️ जयश्री शिंदे (रत्नश्री)

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all