डिसेंबर -जानेवारी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-४२
मागील भागात:-
दोन-तीन तासांनंतर त्याचं काम संपवून तो तिच्या वाॅर्डमध्ये आला तर ती झोपलेली होती. तिचा मलूल चेहरा पाहून तिला कसं तरीच झालं. कपाळावर मायेने फिरवत त्याने तिला हळूवार साद घातली,"दुर्गा..ए दुर्गा..उठ राणी.."
आता पुढे:-
दुर्गाने डोळे किलकिले करून त्याच्याकडे पाहिले आणि हडबडून उठू लागली.
"अगं, हळू गं. असे नको उठूस." तो उठण्यासाठी तिची मदत करत म्हणाला.
तिच्या पाठीला उशी टेकवून तिला बसायला मदत केली. ती अजूनही त्याच्याकडे नजर वर करून पाहत नव्हती.
"जेवलीस का तू?" त्याने काळजीने विचारले.
तिने नकारार्थी मान डोलावली.
"मी जेवायला घेऊन येतो." असे म्हणत तो उठून जात होता तोच ती मान खाली घालून दबक्या आवाजात म्हणाली,"मला.. भूक नाहिये."
"असे कसे भूक नाही म्हणतेस, अशा अवस्थेत वेळच्या वेळी जेवावं आणि वेळेवर मेडीसीन्स घ्यावं लागतं. मी आणतो, तू खाऊन घे." असे म्हणत तो गेला आणि थोड्याच वेळात तो जेवणं आणि औषध घेऊन आला.
तिला खरं तर जेवण्याची इच्छा नव्हतीच पण तो खूप काळजीने आणि मनापासून तिला जेवण्याची विनंती केली तेव्हा ती त्याला नकार देऊ शकली नाही. ती कसे बसे खाल्लं आणि औषध घेतली. तो निघून गेला.
ती दोन्ही गुडघे मान विचार करू लागली,"किती सहज वागला तो, जसं की काहीच नाही. मला तर मान वर करून बोलायचीही लाज वाटते."
तो पुन्हा संध्याकाळी एकदा आणि रात्रीही तिला भेटून आला. जेवणं आणि औषध देऊन झोपवून आपल्या रूममध्ये आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच तो स्वतःचे आटोपून नेहमीप्रमाणे देवीच्या चरणी फुले अर्पण केली आणि नमस्कार करून तिच्याकडे निघाला. जाता-जाता बागेतील एक लाल गुलाबाचं फूल तोडून घेतले.
एक हात मागे घेऊन दुसऱ्या हाताने फूल घेऊन चालला होता.
ते पाहून उपहासाने हसत नरेश मंगेशला म्हणाला,"बघा बघा.. गुलाब घेऊन नवरीला भेटायला चाललाय कसा? जणू काही तिला या गुलाबाचा अर्थ कळणारच आहे."
"अबे, तिला नाही पण ह्याला तरी कळतंच ना. त्या शिवाय का तो तिला भेटायला चाललाय." मंगेशही डोळा मारत त्याला टाळी देत म्हणाला.
श्यामने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तो तिच्या वाॅर्डमध्ये आला. तिने अंघोळ केली होती पण केस विंचरलेले नव्हते. कपाळावर टिकली नव्हती. उदास चेहऱ्याने ती पाठमोरी उभी होती. त्याची चाहूल लागताच तिने हळूच वळून पाहिले. पण मान आणि नजर खालीच होती.
तो जवळ जात तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवत तिला आवाज दिला,"दुर्गा.."
ती खांदा आकसून घेत हळू आवाजात म्हणाली,"मला का हात लावलास?"
त्याने पटकन हात बाजूला केला आणि म्हणाला,"हे बघ दुर्गा, हे फूलं घे. तुझे आता लग्न झाले आहे. रोज केस विंचरून छानपैकी एक वेणी घालायची, त्यात फुले माळायची. सौभाग्याचं लक्षण असलेले कुंकू किंवा टिकली कपाळावर लावायचं."
"माझं कुठे लग्न झालं आहे?" ती भाबड्या स्वरात विचारले.
"हे बघ तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे ना." त्याने तिच्या मंगळसूत्राकडे बोट करत सांगितले.
ती नकारार्थी मान डोलावत मुसमुसत म्हणाली,"ते तर फादरने सांगितले म्हणून तू हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलेस ना."
क्रमशः
काय असेल श्यामचे उत्तर? फादरने सांगितले म्हणून त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले की काही दुसरे कारण असेल?
©️ जयश्री शिंदे (रत्नश्री)
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा