Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-४५)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली गेली. कसे निभावतील ते हे नातं.. जाणून घ्या या कथेत..

डिसेंबर -जानेवरी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-४५

मागील भागात:-

त्याच्याकडे न पाहताच थोडी चिडतच ठसक्यात तिने विचारले,"काय काम आहे? कशाला बोलावलेस तू?"

तो उठून उभा राहिला आणि खिशातून एक कागद काढून तिच्या पुढे करत म्हणाला,"हे वाच."

आता पुढे:-

"हे काय आहे? " दुर्वाने कपाळाला आठ्या पडत अभयला तो कागद उघडत विचारले.

"श्रावण महिन्यातील अकरा, भाद्रपद महिन्यातील सोळा आणि आश्विन महिन्यातील आठ अशा तीन तारखा काढल्या आहेत. यातील कोणती तारीख तुला हवी ती तू सांग." तो हसत बोटे मोजून विचारले.

"कसल्या तारखा आहेत या आणि कशासाठी?" तिने तो कागद उघडून पाहत विचारले. तिला अंदाज आला होता तरी तो काय सांगतो हे तिला ऐकायचे होते.

"कसल्या म्हणून काय विचारतेस गं? आपल्या लग्नाच्या मुहूर्ताच्या तारखा आहेत या. सांग कोणत्या मुहूर्तावर वरात काढायची?" एक हात खिशात घालून तिरकस उभे राहत पायाखाली सिगारेट चिरडत त्याने विचारले.

"लग्न? हं..कोणाचे लग्न?" तिने रोखून पाहत विचारले.

"कोणाचे म्हणजे? आपले लग्न? अजून कोणाचे?" तो स्वतःच्या छातीवर हात ठेवून दुसरा हात तिच्याकडे करत म्हणाला.

तिने ओठ तिरपे केले आणि तो कागद टराटरा फाडून खाली टाकून दिला.

तिच्या या कृतीचा त्याला खूप राग आला. पण ओठ दाबत त्याने कसे बसे रागाला आवर घातला.

हात झटकत ती त्याला म्हणाली,"हे बघ अभय, आईवडिलांना गमावल्यानंतर आत्याचं माझ्यासाठी सर्व काही आहे. तू त्या आत्याचा मुलगा आहेस. आपले नाते तिथपर्यंतच राहू दे. तुला पैसे पाहिजे असतील तर मला सांग. ते देईन मी. पण माझ्यासोबत लग्न करण्याची कल्पना करून, स्वप्न पाहू नकोस. समजलं!"

शेवटच्या शब्दांवर जोर देत ती कडक आवाजात बोलली आणि पुढे जाऊ लागली.

त्याला रागच आला. त्याने हाताची मूठ मांडीवर आपटले आणि तिच्या मागे आला.

ती दारापर्यंत आली होती तोच त्याने दाराला हात लावून तिचा रस्ता अडवला आणि तिला रोखून पाहत म्हणाला,"लुक दुर्वा, उगीच विनाकारण मला राग आणू नकोस."

नंतर तो थोडा आग आवरत थोडं सौम्य आवाजात म्हणाला," लहानपणापासूनच मी तुला पत्नी मानत आलोय. तुझ्याशीच लग्न करण्याची स्वप्नही पाहत आलो आहे. तुझ्याशिवाय जगण्याची मी कल्पनाच करू शकतं नाही गं."

"आणि मला तुझी पत्नी म्हणून आयुष्यभर वावरण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही. मी तुझ्याशी लग्न करावं. एवढे वाईट दिवस तर माझ्यावर अजून तरी आले नाहीत. लग्नासाठी तू शेवटचा मुलगा असला तरी मी तुझ्याशी लग्न करणार नाही. दॅट्स फायनल!" ती उपहासाने कडवट हसत म्हणाली.

"एवढे काय केले आहे गं मी? माझा एवढा राग-राग करायला. काय कमी आहे माझ्यात? हॅंडसम, गुड लुकिंग आहे, वेल एज्युकेटेडही आहे. मग मला रेजेक्ट का करतेस?" तो चिडून स्वतःच्या छातीवर हात ठेवून म्हणाला.

ती चिडून काही बोलणार तोच विमल जीना उतरून येत म्हणाली,"तिला काय विचारतोस रे, मी सांगते की ती तुला का रिजेक्ट करतेय ते..दारू ढोसतोस, सिगारेट ओढतोस, रोज पोरी फिरवतोस, जुगार , रेस खेळतोस. असे कितीतरी अवगुण आहेत तुझ्यात.. मग तू हॅंडसम, गुड लुकिंग, वेल एज्युकेटेड असून काय फायदा? "

"आई..हे तू बोलतेस? अगं मी तुझा मुलगा आहे." तो रागाने धुसफूसत दात ओठ खात म्हणाला.

रागाने लाल झालेल्या डोळे मोठे करून जोरात श्वास घेऊ लागला.

"तोंड बंद ठेव तुझं, अभ्या. आई .. कोणाची आई रे? मी तुझी आई नाही. मी तर फक्त दुर्वाची आई आहे. तू जरी माझा मुलगा असला तरी दुर्वा मला मुलीसारखी आहे. तिला आईच्या मायेने वाढवेन असा शब्द दिला होता मी दादावहिनीला शेवटच्या क्षणाला. तोच शब्द मी पाळणार आहे. हे बघ, अभ्या..तिचे लग्न तिच्या मर्जीने आणि मतानेच होईल. तिच्या मनाचा, मताचा विचार, आदर करणे माझे कर्तव्य आहे." विमलने आधी त्याला दरडावले आणि नंतर भावूक होऊन तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली.

"थॅंक्यू, आत्या. माझ्या मनाचा विचार करण्यासाठी आणि मला समजून घेण्यासाठी.." दुर्वा हळव्या स्वरात तिला बिलगून म्हणाली.

क्रमशः

अभय काय करेल आता?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all