डिसेंबर -जानेवरी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-४६
मागील भागात:-
"हे बघ, अभ्या..तिचे लग्न तिच्या मनाने आणि मतानेच होईल. तिच्या मनाचा, मताचा विचार, आदर करणे माझे कर्तव्य आहे." विमलने आधी त्याला दरडावले आणि नंतर भावूक होऊन तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली.
"थॅंक्यू, आत्या. माझ्या मनाचा विचार करण्यासाठी आणि मला समजून घेण्यासाठी.." दुर्वा हळव्या स्वरात तिला बिलगून म्हणाली.
आता पुढे:-
रात्री विमल दुधाचा ग्लास घेऊन अभयच्या रूममध्ये त्याला आवाज देत आली.
"अभय, अरे अभय..बाळा.. काय झालं?" ती सौम्य स्वरात त्याच्याजवळ येत म्हणाली.
तो पालथा झोपून गंभीरपणे विचार करत होता.
त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही म्हणून तिने पुन्हा त्याला आवाज दिला. तेव्हा तो उताणा होत, डोक्याखाली हात ठेवून हुंकार भरला आणि गंभीर नजरेने छताकडे बघू लागला.
"ए सोन्या, काय झालं रे असे का तोंड पाडलंस?" ती जवळ बसून त्याच्या डोक्यावरून फिरवत मायेने म्हणाली.
त्याने तिचा हात झिडकारला आणि रागात श्वास घेत म्हणाला,"माहिती असूनही का विचारत आहेस? का आलीस तू इथे? जा ना तुझ्या त्या लाडक्या लेकीकडे. (लेक या शब्दावर जोर देत कडवट तोंड केले.) मला नाही बोलायचं तुझ्याशी. जा तू."
त्याने तोंड फिरवून घेतले.
ती हसली आणि फिरून त्याच्या दिशेने आली आणि तिने प्रेमाने पुन्हा त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवले आणि हसत म्हणाली,"अरे वेड्या, असं का बोलतोस? कधी कधी मला मनात नसतानाही तसं कठोर बोलावं लागतं. त्याशिवाय तिचा विश्वास कसा बसेल बरं?"
तो गोंधळून तिच्याकडे पाहू लागला. ती काय बोलली हे त्याला समजलेच नाही.
तेव्हा ती खोल श्वास घेत त्याला म्हणाली,"अरे वेड्या, कळतं कसं नाही तुला? नुसताच ताडमाड वाढला आहेस. गरम खोपडीच्या! जरा थंड डोक्याने विचार करायला शिक. मधाचा गोडवा चाखायचा असेल तर थोडंफार मधमाशीचा डंक सहन करावा लागतो आणि सीधी उंगली से घी नहीं निकला तो उंगली तेढी तो करनी पड़ती हैं ना.."
"म्हणजे?" त्याने कपाळावर आठ्या पाडत विचारले.
"म्हणजे.. या कोट्यवधी इस्टेटीचा मालक फक्त तू एकटाच आहेस आणि माझ्यासाठी तूच या इस्टेटीचा उत्तराधिकारी आहेस. पण ते मिळवण्यासाठी डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर ठेवावी लागते. बघ आता मी काय करते?" ती हातातला दुधाचा ग्लास आणि कसल्यातरी गोळ्या दाखवत कुटील हसत त्याला म्हणाली.
"व्वा आई! फंटॅस्टिक.. मानलं तुला. तू तर माझ्यापेक्षाही चालाख आणि कपटी आहेस की.." तो डोळे मिचकावत तिच्या कपटी हसण्यात सूर मिळवत म्हणाला.
"मग..आई आहे मी तुझी. तुझ्या उज्ज्वल भविष्याची काळजी आहे मला. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी आहे माझी. पण मी सांगेल तसंच तू करायचं." ती चेहऱ्यावर गंभीर भाव आणत म्हणाली. तिच्या आवाजात हुकमीपणा आणि जरब होता.
तिने सोबत आणलेल्या झोपेच्या गोळ्या त्या दुधाच्या ग्लासमध्ये टाकल्या.
ते चमच्याने ढवळून एकजीव केले. तो ग्लास दाखवला आणि पुन्हा ओठ तिरपे करून कपटी हसली. त्याच्याकडे पाहत ती म्हणाली,"याची जादू तुला ठाऊक आहेच ना.. या नंतर तू करायचे हे मी तुला वेगळे सांगायला नको. तुझी एवढ्या दिवसांची सुप्त इच्छा आज पूर्ण करून घे. मग पुढचं पाऊल उचलू."
"वाॅव! आई, यू आर ग्रेट! काय परफेक्ट प्लॅनिंग केलेस गं तू. आय लव यू सो मच, आई. आई असावी तर अशी. आज काम फत्ते झालंच म्हणून समज आणि माझी इच्छाही पूर्ण करणार मी." खूप आनंदाने हसत डोळा मारत तो म्हणाला आणि उठून तिच्या गळ्यात पडला.
"हुं, यशस्वी भवः !" ती मायेने त्याच्या पाठीवर हात फिरवत हसून म्हणाली.
क्रमशः
विमलचा कपटी चेहरा दुर्वाच्या समोर येईल का?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा