डिसेंबर -जानेवरी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:- ५०
मागील भागात:-
"ए मागे हो म्हणाले ना मी. नीच आहात तुम्ही दोघेही. तुझ्यात.." दुर्वा तिच्यावर जोरात ओरडली. तिच्या डोळ्यांत रक्त संचारलं होतं. तिचे हात थरथरत होते पण तरीही पूर्ण ताकदीनिशी ती कात्री घट्ट पकडून तिच्यावर धावून आली.
आता पुढे:-
विमल खूप घाबरली. आवंढा गिळत ती दोन पावलं मागे सरकली.
"अरे अभय, हे बघ." ती मुद्दाम तिच्या पाठीमागे पाहत म्हणाली.
तसे क्षणभर दुर्वाने मागे वळून पाहिले. तिचे लक्ष विचलित करण्यासाठी उगीच तिने अभयचे नाव घेतले होते. तिचे लक्ष नाही हे पाहून तेव्हा ती पटकन पुढे होऊन तिच्यावर झपटली.
विमल तिच्या हातातील कात्री हिसकावून घेण्यासाठी झटापट करू लागली आणि दात-ओठ खात चवताळून तिच्यावर ओरडली,"मला मारणार तू! हं.. तुझी एवढी हिंमत आली का तुझ्यात? तू माझ्यावर कात्री उगारतेस?"
"हो, मारणार मी तुला! आधी तुला मारेन.. आणि नंतर तुझ्या त्या नीच, हरामखोर मुलालाही मारेन." दुर्वाही इरेला पेटून ओरडली.
दोघींची झटापट चालली होती. दोघींच्या ओढाओढीत कात्रीचे टोक विमलच्या पोटाजवळ घसरलं.
क्षणभरातच विमलने जोरात ओढ लावून कात्री घेतली आणि तिच कात्री तिच्याकडून तिच्या पोटात घुसली.
"आह ऽ ऽ" ती जोरात किंचाळत खाली पडली.
ओढ बसल्याने दुर्वाने कात्री सोडून दिली होती. पण कात्री तिच्या पोटात घुसल्याने क्षणात ती रक्तबंबाळ झाली. वाहणारे रक्त पाहून दुर्वा सुन्न झाली आणि जागीच थिजली.
विमलच्या जोराच्या किंकाळीने अभय दचकून धावतच त्याच्या रूममधून बाहेर आला.
तिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून तो जोरात ओरडला,"आई ऽऽ.."
त्या आवाजाने दुर्वा भानावर आली आणि तिथून पळून जाऊ लागली.
"अरे गण्या! रव्या! हणम्या.! कोठे मेलेत सगळे? बाहेर या पटकन. ती पळतेय, पकडा तिला. मी आईला हाॅस्पिटलमध्ये घेऊन जातो. त्या दुर्वाला पकडून आणा." अभय विमलला उचलून घेत नोकरांवर खेकसत फर्मान सोडले.
"आई, तू ..तू घाबरू नकोस, तुला काहीच होणार नाही." तो तिला गाडीत बसवत म्हणाला.
"आह ऽऽ....अ..भ..य..मी.. वाचणार नाही, ..आह ऽ ऽ..आ ऽ ऽ.." विमल वेदनेने कराहत म्हणाली आणि तिने मान टाकून दिली.
हाॅस्पिटलमध्ये पोहोचायच्या आधीच तिची प्राणज्योत मावळली. त्याने तरीही तिला हाॅस्पिटलमध्ये नेलं. डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केल्यावर तो तिच्या निष्प्राण देहाला बिलगून धाय कोलमडून रडू लागला.
इकडे दुर्वा अभयने तिच्या मागे लावलेल्या माणसांची नजर चुकवून पळ काढला. त्यांच्यापासून लपतछपत ती एका मंदिरात आली. सुदैवाने ती त्यांची हाती लागली नाही.
त्या देवीच्या मंदिरात जाताच तिने दार लावून घेतले आणि सुटकेचा दीर्घ निःश्वास सोडला.
हात जोडून ती देवीसमोर नतमस्तक होत कोसळून रडू लागली,"आई, लहानपणीच काही कळायच्या आत आईवडिलांचा हात नियतीने हिरावून घेतले. तेव्हापासून कसंतरी जगत होते. पण आता माझं आयुष्यच उध्वस्त झालं गं माझं. कोणत्या गोष्टीची शिक्षा भोगतेय गं मी. मला जसं कळतंय तसं मी कोणतीही चूक केल्याची आठवत नाही मग माझ्याच वाट्याला हे भोग का गं? कुठेतरी लांब जाऊन जीव द्यावा म्हणून पळत होते. पण आता मरण्याची हिंमत होत नाही. आणि आता तुझ्या चरणाशी आले तर जगू वाटतेय मला. कितीतरी वाईट काम करणाऱ्यांना तू क्षमा करून योग्य वाट दाखवतेस. अगं मी तर कोणतही वाईट काम केले नाही मग मला योग्य अयोग्य वाट दाखवणे तुझ्यावर सोपवून देते.."
देवीकडे तक्रार करत आक्रोश करत होती आणि वाट दाखवण्याची विनंतीही करत होती.
अभयची माणसं तिच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. ते हात चोळत निघून गेले. ती उशीर पर्यंत मंदिरात बसली होती. नंतर तेथून बाहेर पडली. रस्त्यावर एकटीच भटकत असताना ती एस. पी च्या नजरेत पडली.
वर्तमान:-
फादरांना तिची करूण कहाणी ऐकून भरून आलं.
क्रमशः
काय निर्णय घेतील फादर ?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा