Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-५१)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षितपणे लग्नाची गाठ बांधली गेली. कसे निभावतील ते हे नातं? जाणून घ्या या कथेत..
डिसेंबर -जानेवरी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-५१

मागील भागात:-

अभयची माणसं तिच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. ते हात चोळत निघून गेले. ती उशीरपर्यंत मंदिरात बसली होती. नंतर तेथून बाहेर पडली. रस्त्यावर एकटीच भटकत असताना ती एस. पी च्या नजरेत पडली.

वर्तमान:-

फादरांना तिची करुण कहाणी ऐकून भरून आलं.

आता पुढे:-

आत्ताची दुर्गा (पूर्वीची दुर्वा) कन्फेशन बूथमध्ये तशीच बसून राहिली.

फादर यांच्या मनात अपराधी भाव दाटून आला. ते सद्गदित झाले. तिथून उठून येशूच्या मूर्तीसमोर गुडघ्यावर बसत अपराधी भावनेने त्या मूर्तीकडे पाहू लागले आणि म्हणाले,"जेजेस, माझ्याकडून फार मोठा अपराध झाला. कोणताही अपराध केलेला नसतानाही श्यामला मी किती काय काय बोलून गेलो. त्या पोराच्या मनाला किती लागले असेल. त्या बिचाऱ्याने निमूटपणे सगळं काही ऐकून घेतले. तोंडातून चकार शब्दही काढला नाही."

एक खोल श्वास घेत ते तेथून उठले. तोपर्यंत दुर्गा त्यांच्या मागे खाली मान घालून उभी होती.

तिच्या जवळ येत ते शांतपणे म्हणाले,"हे बघ दुर्गा बाळा, तू काही जाणीवपूर्वक कृत्य केले नाहीस. जे झालं ते चुकून झालं. परिस्थितीच तशी होती. पण बघू ना, गाॅड जेजेसने पवित्र आणि शुद्ध मन असलेल्या श्यामला तुझ्या जीवनात आणलं. त्यांची योजना असेल म्हणून त्याच्याबरोबर आयुष्यभराची गाठ त्यांच्या मर्जीने बांधली गेली." त्यांनी येशूच्या मूर्तीकडे हात केले.

ते पुढे म्हणाले,"तुझ्यासोबत काहीतरी चुकीचे घडले असेल असा अंदाज श्यामने बांधला असेल. म्हणून तुझ्याबद्दल करुणा दाखवली आणि अनुकंपा दाटून आल्याने तुझ्या गळ्यात त्याने मंगळसूत्र बांधले. मला जसे तू खरं काय ते सांगितलेस, ते खरं तू त्याला सांगून टाक. तो तुला मनापासून माफ करेल आणि मनापासून तुझा पत्नी म्हणून स्वीकार करेल. चल बाळा, माझ्यासोबत."

ते तिला सोबत चल म्हणून हात केला आणि ते पुढे चालू लागले. पण ती जागची हलली नाही.

ती त्यांना थांबवत म्हणाली,"थांबा फादर."

ते वळून तिला प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.

ती हळू आवाजात हुमसून म्हणाली," मला माफ करा, फादर. ही गोष्ट चारचौघात सांगण्यासारखी नाही. माझ्या जीवनात ज्या गोष्टी घडल्या त्या अनाहुत घडल्या."

पोटावर हात ठेवत ती डोळ्यांतले पाणी पुसत आवंढा गिळत म्हणाली,"माझ्या पोटात वाढणारे बाळ पोरक होऊ नये या एकाच कारणामुळे मी श्यामच्या हातून मंगळसूत्र बांधून घेतले. नाही तर त्यांची पत्नी बनण्याची माझी योग्यता नाही, फादर.. मी त्यांना लायक नाही. माझं मन मला हे साक्ष देतंय."

ती चेहरा ओंजळीत घेऊन हुमसून रडू लागली.

"हे बघ बाळा, जे झालं ते झालं. ते एक वाईट स्वप्न होतं म्हणून सगळं विसरून जा आणि श्यामसोबत सुखाचा संसार कर." फादर तिला समजावत म्हणाले.

"माफ करा, फादर. माझं मन त्यासाठी राजी नाही. एवढंच नाही फादर, मी इथे राहिले तर कधी ना कधी पोलीस माझ्यापर्यंत पोहोचतीलच. माझे शीलहरण झालेलं सत्य बाहेर पडेल तर.. तेव्हा श्यामकडे बोट करून सगळे लोक हसतील. त्याला नावे ठेवतील. जे मला सहन होणार नाही. माझ्या मान राखणाऱ्या त्या देवमाणसाचा असा अपमान होऊ नये असे मला वाटतं, फादर." ती नाक ओढत अगतिक होऊन म्हणाली.

"असं म्हणून कसं चालेल, पोरी? किती दिवस सगळ्या गोष्टी मनात ठेवून, तू वेडी असण्याचं नाटक चालू ठेवणार?" फादर पुन्हा तिला समजावत म्हणाले.

"आणखी थोडे दिवस, फादर. माझ्या होणाऱ्या बाळाला सर्व संपत्ती मिळेल अशी माझ्या वडिलांनी विल बनवून ठेवली आहे. ती संपत्ती त्याला मिळावी अशी माझी इच्छा आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर मी त्याला श्यामच्या स्वाधीन करेन आणि मी कोठेतरी दूर निघून जाईन." ती दाटलेल्या कंठाने म्हणाली.

"तू जे तत्त्वज्ञान सांगत आहेस ना, ते कानाला ऐकायला चांगले वाटते; पण वास्तविक जीवनात तसे करणे फारच कठीण असते." फादर हात मागे बांधून किंचित हसत पुढे येत म्हणाले,"हे बघ बाळा, जसं तुझं मन तुला साक्ष देतंय तसंच माझंही मन मला याची साक्ष देतंय की सत्य काय ते श्यामला सांगून तुम्हा दोघांना एकत्र करणे, माझं कर्तव्य आहे‌. चल माझ्यासोबत."

क्रमशः

राजी होईल का दुर्गा श्यामला सत्य सांगण्यासाठी?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all