Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-५३)

अपराध केलेला नसतानाही तिचे संरक्षण करण्यासाठी आणि समाजात तिला मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली गेली. कसे निभावतील ते हे नातं? जाणून घ्या या कथेत..
डिसेंबर -जानेवरी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-५३

मागील भागात:-

थोड्यावेळाने श्याम तिथे अडकवलेली चावी घेऊन वाॅर्डचे कुलूप काढून आत आला.

समोरचे दृश्य पाहून त्याचे डोळे जागीच मोठे झाले.

तो पळतच दुर्गा जवळ गेला आणि जोर जोरात फादरांना आवाज देऊ लागला,"फादर, लवकर या..."

आता पुढे:-

फादर एका पेशंटला हाताळत होते. श्यामची हाक ऐकताच दुसऱ्या डाॅक्टरला त्याला हाताळायला सांगून ते लगेच दुर्गाच्या वाॅर्डकडे धावले.

श्याम दुर्गाचे मनगट घट्ट पकडून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजी दोन्ही दिसून येत होती.

"काय रे काय झालं, श्याम?" फादरने काळजीने विचारले.

"हे पहा फादर, हिने काय करून घेतले? " तो तिचे मनगट दाखवत म्हणाला.

तिने हातातील काचेची बांगडी मनगटात रूतवून घेतली होती. त्यामुळे तेथून रक्त येत होते. त्याच रक्ताचा टिळा तिने कपाळावर लावून घेतला होते आणि देहाला झोके देत हसत होती.

"फादर, हिने बांगडी रूतवून घेतली आणि त्याचा टिळा माथ्यावर लावून घेतला." तो तिच्या हातातून बांगडी काढून घेत म्हणाला.

"हम्म, काळजी करू नकोस. काही नाही होणार." ते त्याला दिलासा देत म्हणाले.

"नर्स, जा पटकन बॅंडेज करून घ्या आणि एखादी मेडिसीन द्या." ते सुस्कारा टाकत नर्सला म्हणाले.

नर्स ड्रेसिंग ट्रे घेऊन आत आल्या.

"काळजीपूर्वक ड्रेसिंग करा, हं.." तो काळजीने नर्सला म्हणाला.

"हो, बाबा." नर्सने मान डोलावली.

तो फादरांच्या जवळ येत चिंतेने म्हणाला,"फादर, तिच्यावर भरोसा ठेवावा असं वाटत नाही. हिने आता असे करून घेतल्यावर माझ्या रूममध्ये तिला एकटीला ठेवणे योग्य वाटणार नाही. ते तिच्यासाठी धोक्याचे ठरेल. मी दिवसभर ड्युटीसाठी बाहेर असेन. घरी तिला एकटीला ठेवलं आणि तिने काही असं अनाहुत करू घेतले तर कोण बघणार तिला? इथे दिवसभर अनेक लोकांचे येणे-जाणे असते. त्यामुळे त्यांचं लक्ष राहिल. म्हणून प्लीज अजून काही दिवस तरी तिला इथेच राहू द्या."

त्याने त्यांना केविलवाण्या स्वरात विनंती केली. त्यांनी होकारार्थी मान डोलावली. तो त्याच्या ड्युटीवर परत निघून गेला.

नर्स दुर्गाचे ड्रेसिंग करून गेली.

फादर दुर्गाकडे पाहत होते. ती विजयी मुद्रेने त्यांच्याकडे पाहत ड्रेसिंग केलेला हात दाखवत होती.

"काय बाळा, हे विद्यावंत मुलीचे लक्षण आहे का? " त्यांनी रोखून पाहत तिला विचारले.

"हुं.. माफ करा, फादर. आता मी विद्यावंत मुलगी नाही, एक वेडी आहे. एका वेडीने जे केले असतं तेच मी केलं. नेक्स्ट टाईम.. बेटर लक, फादर." ती तिरकस हसत वेडी या शब्दावर जोर देत म्हणाली आणि त्यांच्याकडे पाठ फिरवून उभी राहिली.

फादरांनी मनोमन तिच्या हुशारीचे कौतुक करत हसत मान हलवली.

पंधरा वीस दिवस असेच निघून गेले. श्यामची आई वैजयंती पुन्हा गाठोडे काखेत घेऊन श्यामला हाक मारत हाॅस्पिटलच्या आवारात आली.

"श्याम, अरे बाळा.. श्याम." ती आवाज देत एका हाताने गाठोडे आणि दुसऱ्या हाताने डोक्यावरचा पदर सावरत होती.

तेवढ्यात हरी 'पीप पीप पोम्प पाॅम्प' ड्रीर्र ड्रीर्र असा कर्कश आवाज करत आला.

"ए जा रे, तू." असे म्हणत त्याला हुसकावून लावले.

तिचा आवाज ऐकून दुर्गा वाॅर्डच्या दारातून तिला डोकावून पाहू लागली.

"कोण होता हा?" जाणाऱ्या हरीकडे पाहत वैजयंती वैतागत पुटपुटली.

"श्याम, ए श्याम.." तिने हाक दिली.

तिला पाहून नरेश, मंगेश आणि विलास तिथे आले.

"आ हा हा, कसली बाई गं तू? मेले तरी या हाॅस्पिटलची पायरी चढणार नाही असे त्या दिवशी तर तू मोठ्या तोऱ्यात म्हणून निघून गेली होतीस. आता पुन्हा तोंड वर करून यायला लाज नाही का वाटली तुला? हां." मंगेश उपहासाने हसत तिला म्हणाला.

नरेश आणि विलास कुत्सित हसत होते.

वैजयंतीने रागात पाहत तिचा पाय वर उचलून पायातील चप्पल दाखवत त्यांना म्हणाली,"हे काय हाय ठाव हाय नव्हं? की गालावर ठेवून दावू. (दात ओठ खात हात उगारत) गपगुमान जा तुमच्या कामाला. आला मोठा मला सांगणारा. चल निघ इथून."

तिने कडक शब्दांत त्यांना दम भरला तसं ते अपमानाचे घोट गिळून गुपचूप निघून गेले.

क्रमशः

वैजयंती आल्याने दुर्गा पुढे काही नवीन पेच निर्माण होईल का?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all