Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-५४)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली गेली. कसे निभावतील ते हे नातं? जाणून घ्या या कथेत..
डिसेंबर -जानेवरी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-५४

मागील भागात:-

वैजयंतीने रागात पाहत तिचा पाय वर उचलून पायातील चप्पल दाखवत त्यांना म्हणाली,"हे काय हाय ठाव हाय नव्हं? की गालावर ठेवून दावू. (दात ओठ खात हात उगारत) गपगुमान जा तुमच्या कामाला. आला मोठा मला सांगणारा. चल निघ इथून."

तिने कडक शब्दांत त्यांना दम भरला तसं ते अपमानाचे घोट गिळून गुपचूप निघून गेले

आता पुढे:-

वैजयंती पुन्हा श्यामला आवाज देऊ लागली,"श्याम, अरे श्याम.. कुठं हाईस रं पोरा?"

पदर सावरत ती इकडेतिकडे नजर फिरवत होती.

फादर तेथून जात होते तर वैजयंती त्यांच्या नजरेस पडली. ते गालात हसत हात मागे बांधून तिच्याकडे आले आणि आदरपूर्वक तिला म्हणाले,"नमस्कार, आईसाहेब."

तिने हसत तिचे अभिवादन स्वीकारत म्हणाली,"काय फादर ! तुम्ही लग्न केले नाही की तुम्हाला मुलबाळ नाही. तुम्ही एक संन्यासी आहात. तर इथे असलेल्यानांही तुम्ही संन्यासी व्हायला लावणार काय?"

ते दोघे चालत-चालत बोलत होते.

"काय आईसाहेब! गावाहून येतानाच तुम्ही माझ्याशी भांडण करायचं असं ठरवूनच आलात की काय हो?" फादर हसत शांत आवाजात म्हणाले.

"भांडण न्हाय जी, फादर. बरोबर की चुक ते ठाव न्हाय पर देवीआयला साक्षी मानून तुम्ही माझ्या हातून त्या पोरीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधायला लावले. मंग ते लगीन न्हाई अन् ती पोरगी माझी सून न्हाई असं म्हणून चाललं का जी?" तिने त्यांना प्रश्न विचारला.

हे ऐकून दुर्गा मात्र पाठ फिरवून उभी राहिली. काय होईल आता या विचाराने तिला धडकी भरली.

फादर‌ एकदम शांत झाले. ते काहीच बोलत नव्हते. म्हणून वैजयंती पुन्हा म्हणाली,"म्या बोलतेय तरी बी तुम्ही गप्प का आहात?"

"होय, होय.." फादर मान डोलावत म्हणाले.

"काय व्हयं व्हयं म्हणतात? लगीन झालं म्हटल्यावर आता घरात नको का हालायला." ती चालत चालत बोलत होती.

फादरांनी हुंकार भरला.

"मंग पाळणा हालण्यासाठी त्यास्नी एकत्र पाहिजेल नव्ह?" तिने प्रश्न विचारला.

"हो, बरोबर आहे." फादरांनी सहमती दर्शवली.

"बराबर हाय नव्ह! मंग नवरा-बायकोला वेगवेगळ्या ठिकाणी कोंडून ठेवल्यावर ते पाळणा कसा हालेल का? कसं  साध्य होईल?" ती त्यांना समजत होती.

"तुम्ही म्हणताय ते‌ बरोबर आहे‌." फादर म्हणाले.

पण त्यांचे हे बोलणे ऐकून दुर्गा आवंढा गिळत विचारात पडली. तिच्या छातीची धडधड वाढली.

"आता काय? तुमच्या सुनेला तुम्ही घरी घेऊन जायचं म्हणताय, हेच ना! " फादर तिचं मन ओळखून आनंदाने म्हणाले.

तिने होकारार्थी मान डोलावत काहीतरी म्हणणार तोच एक जाडजूड, थोडीशी वेडीसर मुलगी "आत्या" म्हणत बिलगली.

वैजयंतीने दचकून अंग आकसून घेत तिच्याकडे घाबरून पाहत फादरांना तिच्याकडे बोट करत म्हणाली,"फादर, ही मुलगी मला आत्या म्हणून हाक मारतेय म्हणजे हिच माझी सून हाय का?"

"नाही, आईसाहेब!" फादर नकारार्थी मान डोलावत म्हणाले.

"अय्यो, वाचले बाबा! " ती छातीवर हात ठेवून सुस्कारा टाकत म्हणाली,"हिला पाहून माझ्या पोराची स्थिती आठवूनच मला धडकी भरली. आतून हलले ओ म्या." तिने हात थरथरत नाचवत वर केले.

ती मुलगी हसत तिच्या दंडाला झटत पुन्हा तिला "आत्या" म्हणत बिलगायचा प्रयत्न करत होती.

"अय्यो अय्यो यो" असे म्हणत हलके हसत वैजयंतीने त्या मुलीला बाजूला केले आणि तिच्या हनवुटीला हातात धरत मायाने समजावत तिला म्हणाली,"माझी सोनी (तिच्याकडे वरून खालपर्यंत पाहत) तुच आत्यासारखी दिसत हाईस. दुसऱ्या कोण्या आत्याला हुकड बाई, मला सोड हं. जा बाई तू."

ती मुलगी गाल फुगवून तिच्या दंडाला मारलं. आणि तेथून पाय आपटत निघून गेली.

"अय्योयो," म्हणत वैजयंती दंड चोळत कपाळावर आठ्या पाडत तिला पाहून लागली.

ती जाताच फादर वैजयंतीला म्हणाले,"चला आईसाहेब, तुमच्या सुनेला भेटवतो."
ती होकारार्थी मान डोलावत त्यांच्या मागे दुर्गाच्या वाॅर्डकडे निघाली. 

क्रमशः

दुर्गाला पाहून काय प्रतिक्रिया असेल वैजयंतीची? ती दुर्गाला घरी घेऊन जाईल का? दुर्गा तिच्यासोबत जाण्यास तयार होईल का?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all