डिसेंबर -जानेवरी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-५५
मागील भागात:-
ती जाताच फादर वैजयंतीला म्हणाले,"चला आईसाहेब, तुमच्या सुनेला भेटवतो."
ती होकारार्थी मान डोलावत त्यांच्या मागे दुर्गाच्या वाॅर्डकडे निघाली.
आता पुढे:-
वाॅर्डमध्ये येताच फादर पाठमोऱ्या उभ्या असलेल्या दुर्गाकडे हात करून हसत म्हणाले,"हे पाहा, आईसाहेब. ही तुमची सून. घेऊन जा तुमच्या सुनेला तुमच्या घरी."
दुर्गाच्या मनात चलबिचल सुरू झाली होती. हातांची बोटे एकमेकांत गुंफून ती पाठमोरी उभी होती. या दोन दिवसात ती श्यामने आणून दिलेल्या साड्या नेसत होती. केसांची छान वेणीही घातली होती. पाठीमागून दिसणारा तिचा सुडौल बांधा पाहूनच वैजयंती मनोमन खूश होऊन आत आली.
तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आपल्या दिशेने वळवून घेतले.
तिचे अनुपम सौंदर्य पाहून ती कमालीची खूश झाली आणि तिच्या तोंडून आपसूकच "वा! आहा हा!" शब्द निघाले.
तिचे सौंदर्य निरखत तिने स्वतःच्या अंगठा आणि चारी बोटांच्या मध्ये स्वतःचा चेहरा धरला. ती प्रसन्नतेने म्हणाली,"अक्शी नक्षत्रावानी हाईस. नाक, डोळे, ओठ कोरून काढल्यावानी हाय. जणू नाजूक, सुकुमार बाहुली जशी. पर त्यो देव, तुझ्याशी का बऱ एवढा निष्ठूर वागतोय?" शेवटच्या वाक्य ती हळहळून बोलली.
"असो, हरकत न्हाई, आता म्या आली हाय नव्हं. म्या बघेन तुला. समद ठीक करेन. चल, आपल्या घरी जाऊ." ती मवाळ भाषेत तिच्या दंडाला धरत म्हणाली.
"अम्म हुं..जा.. मी नाही येणार." ती खांदा आकसून घेत गाल फुगवून म्हणाली आणि पाठमोरी वळून उभी राहिली.
"चल गं, बाय.." वैजयंतीने विनंती केली.
"उम्म हुं.." दुर्गाने नकारार्थी मान हलवली.
"नेत न्हाई म्हणतीस व्हय.." वैजयंतीने पुन्हा एकदा विचारले.
दुर्गा नाही म्हणत "ईऽऽई.." करत दात खात मांजरी सारखी पंजे दाखवले. तेव्हा वैजयंतीने सटकन तिच्या गालावर एक चापट ठेवून दिली. त्यासरशी दुर्गाचा हात आपसुकच गालावर गेला.
क्षणभर दुर्गा जागीच गोठली. डोळ्यांत पाणी तरळलं. पण ओठ घट्ट मिटून तिने ते आतच गिळलं.
ती पडणार तोच वैजयंतीने तिला सावरून व्यवस्थित उभा केले आणि तिला डोळे दाखवत तिच्या दंडाला धरत म्हणाली,"ए नीट उभी राहा. आ आ ई ई.. हा हा..अशी नाटकं माझ्याजवळ चालायची न्हायती. मला कोण समजलीस तू? पारगावची वैजयंती हाय म्या."
दुर्गा पुन्हा पंजा दाखवण्याचा प्रयत्न केला पण तिने तिच्या हातावर जोराचा फटका दिला. दुर्गा कळवळून "आह" म्हणून कराहली.
पण वैजयंतीने त्याकडे दुर्लक्ष करत तिला बजावत म्हणाली,"मला साधी भोळी समजू नगस. भल्या भल्यांना पाणी पाजलय अन् अंगातील भूत उतरणारी हाय म्या. उगीच मला रागाला आणू नगस. न्हाई तर तुझं समद येड कसं घालवायच हे चांगलच ठाव हाय मला. गपगुमान चल माझ्यासंग घराला, न्हाई तर अजून एक रपाटा देईन. समजलं. चल.."
दुर्गाचा कान पकडून वैजयंती तिला बाहेर घेऊन जाऊ लागली.
"आहऽऽ..स्स.." कानाला पकडून दुर्गा विव्हळली. त्यामुळे वैजयंतीने तिचा कान सोडला.
पण डोळ्यांनी दटावत तिने दाराकडे बोट केले.
ती नुसती पाहत उभी होती तेव्हा ती तिला फटकून म्हणाली,"ए बघतियास का गं अशी घुम्यावानी? चल हो बाहेर. चल गं.."
वैजयंतीने तिच्या खांद्याला धक्का देत तिला बाहेर आणले.
ती चुपचाप बाहेर आली.
बाहेर पडताच दुर्गाचे लक्ष फादरकडे गेले. ती त्यांच्याकडे नाक फुगवून पाहत होती.
फादर मात्र 'मी काहीच करू शकत नाही ' या आविर्भावात खांदे उडवत हात वर करून घेतले.
"आईसाहेब, तोंडाने सांगितले की या पोरीला कळते, तेवढी बुद्धी तर तिला आहे. म्हणजे चापट वगैरे मारायची गरज पडणार नाही. नाही का?" फादर उपहासाने हसत म्हणाले.
वैजयंतीने स्वतःच्या कानशिलाच्या जवळ बोट नेत गोल फिरवले आणि हसत म्हणाली,"तसंच वाटतया, असंच दिसतया."
"दुर्गा बाळा," फादरने दुर्गाला हाक मारली.
तिने डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहिले.
"विश यू गुड लक अगेन." फादर मंद स्मित करत म्हणाले.
वैजयंती दुर्गाला श्यामच्या रूममध्ये आणले.
श्याम पेशंटला बघत चालला होता. तेव्हा एक वाॅर्डबाॅय त्याच्याजवळ येत म्हणाला,"अरे श्याम, तुला माहिती नाही काय रे?"
"काय रे? " श्यामने त्याला विचारले.
"काही वेळापूर्वी तुझी आई आली आणि तिने तुझ्या बायकोला चापट मारून तुझ्या घरी घेऊन गेली. तेथून नेऊन त्या बिचारीसोबत अजून काय करेल देव जाणे!" तो वाॅर्डबाॅय कुत्सित हसत म्हणाला.
श्यामने घाबरून त्याच्या रूमकडे धाव घेतली.
क्रमशः
वैजयंती दुर्गासोबत कशी वागेल? श्याम काय करेल?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा