डिसेंबर -जानेवरी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-५७
मागील भागात:-
"हाय एक लय महत्त्वाचं काम. तू दहा वाजता ये म्हंजी कळलं तुला?" वैजयंती हसून म्हणाली.
"बरं आई, येतो." असे म्हणत तो निघून गेला.
पण दुर्गाच्या मनात धडकी भरली.
आता पुढे:-
वैजयंती ज्याप्रमाणे गालात हसत होती त्यावरून तरी ती तिच्या डोक्यात कसला विचार आला असेल ह्या विचाराने दुर्गाला चांगलीच धडकी भरली.
"आईच्या डोक्यात आम्हाला एकत्र करण्याचे तर येत नसेल ना. असे असेल तर..हे भगवान! कसल्या सिच्युएशनमध्ये टाकलेस तू? तसे श्याम समजूतदार आहेत. पण आईच्या बोलण्यावरून तर वाटतेय की ते त्यांना पाहिजे तसं श्यामला वागायला भाग पाडतील. काय करू सुचत नाहीये मला. जाऊ दे, रात्री हे घरी आली की बघू. तोपर्यंत काहीतरी सुचेलच." दुर्गाने मनात विचार केला.
घड्याळात रात्री दहाच्या आतच वैजयंतीने तिला नववधूसारखे सजवले होते.
"साक्षात लक्ष्मीवानी दिसलीस बघ." तिच्याकडे पाहत ती आनंदाने म्हणाली.
तेवढ्यात श्याम आला. त्याला पाहून ती त्याला म्हणाली,"आलास तू? जा पटकन कापड बदलून ये."
पण श्यामची नजर दुर्गावर पडताच त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिला वरून खालपर्यंत पाहत भुवया आकसून त्याने वैजयंतीला विचारले,"हे सर्व काय आहे, आई?"
"दिसत न्हाई व्हयं रं तुला? तुमच्या पहिल्या रातीची तयारी हाय ही." तिने ठोक शब्दांत सांगितले.
"तसं नाही आई, अगं हिला तिसरा महिना चालू आहे. त्यात तिची मानसिक अवस्था ठीक नाहीये. अशा परिस्थितीत.." तो समजावत होता.
तोच वैजयंती त्याला रोखून पाहत म्हणाली,"आहा रे! संस्काराच्या पुतळ्या! हे समद पुराण आता सांगतोयस. तवा कुठे गेली होती तुझी बुद्धी? तवा शेण खाल्लंस मंग.."
तो डोकं खाजवतं गप्प उभा राहिला.
दुर्गा खाली मान घालून दोघांचे बोलणे ऐकत होती.
"आरं श्याम, येड घालवण्याच हा एक इलाज असतो. वयात आलेल्या पोरीच येळेत लगीन न्हाई झालं तर कधी कधी असा आजार व्हतं. गावाकडे एका मुलीला असंच झालं व्हतं. मंग लगेच तिचं लगीन लावून दिलं आणि तिचं नवऱ्याशी संबंध झाले. तवा सकाळ पारी तिच्या चेहऱ्यावर अमाप आनंद झळकत होता. ती ठीक झाली व्हती." वैजयंती सांगताना थोडीशी लाजत कचरत होती.
नंतर स्वतःला सावरत ती म्हणाली,"म्या बी काय बोलत बसलीया. माझ्या सुनेला मला महत्त्वाचं काय तरी सांगायचं हाय. तू जा, कापड बदलून जेवूनशनी ये."
"ही आई पण ना, काहीही बडबडत असते." श्याम मनात पुटपुटला आणि निघून गेला.
तो निघून जाताच वैजयंतीने घसा खाकरत दुर्वाकडे मोर्चा वळवला.
ती जवळ येताच दुर्गा अंग आकसून किंचित तोंड फिरवून बसली.
वैजयंती थोडी खाली झुकून हळू आवाजात समजावत तिला म्हणाली,"हे बघ बाय, माझ्या पोराला कसं बसं समजावलं हाय म्या. तो तुझ्याजवळ आल्यावर, तुला हात लावल्यावर अजिबात आरडाओरडा, ही हा, आ ऊं करायचं न्हाई. कालवा केलास तर याद राख. तिथं खूप लोक व्हती म्हणूनश्यान एकच ठेवून दिली होती. पर हे घर माझं हाय. तुझ्या अंगातल समद येड काढीन, हुश्शार!"
ती तिला सांगत कमी आणि दम जास्त देत होती. त्यामुळे दुर्गाच्या तोंडून शब्दच फुटले नाहीत. तेव्हा तिने तिच्या डोक्याला डिवचत म्हणाली,"बोल की काय म्हणतेय म्या?"
दुर्गा मुसमुसत होती.
"आ ऊं करून आरडाओरडा करशील?" तिने दरडावून विचारले.
दुर्गा हुमसत नाहीमध्ये मान डोलावत "नाही" म्हणाली.
"गलका, कांगावा करशील?" तिने परत विचारले.
तिने नाक ओढत नकारार्थी मान डोलावली.
"आहा! श्यानी, माझी गुणाची सून! आता कशी वठणीवर आलीस." तिने मायेने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवले.
"असंही तू कांगावा, गलका केला असता तर त्या कालव्याने माझं पोरगा कवाच पळून गेला असता.." हात वारे करत हसत म्हणायला आणि श्याम यायला एकच गाठ पडली.
त्याने फक्त 'पळून गेला' हेच शब्द ऐकले त्यामुळे त्याने कपाळावर आठ्या पाडत विचारले,"कोण पळून केले, आई?"
"कुणी न्हाई रं, ते जाऊ दे सोड. हे बघ श्याम, कोण कोणत्या गोष्टीत कसे असेल हे माहिती न्हाई. पर ही गोष्टी मात्र समद्यांना चांगलीच जमते. ती कोणती मोहमाया हाय ठाव न्हाय बघ." ती मिश्किल अंदाजात हसत म्हणाली.
पुन्हा ती भानावर येत पदर सावरत म्हणाली,"म्या बी ना काय बाय बोलती बघ. म्या बाहेरच्या काॅटवर निजती. येतं हं म्या." ती दार बाहेर जात दार ओढून घेत म्हणाली.
जाता जाता घसा खाकरून तिने मिश्किल नजरेने त्याला खुणावले.
ती जाताच श्यामने सुस्कारा सोडला आणि
रूमवर नजर फिरवली.
रूमवर नजर फिरवली.
वैजयंतीने रूम छान सजवली होती. काही फळे, दूध, मिठाई ठेवली होती.
तो दुर्गाला उठवून बेडजवळ आणत म्हणाला,"बघ आईने किती छान रूम सजवले आहे आणि काही खायचे पदार्थही आहेत. यातले तुला काही खायचे आहे का?" फळे आणि दुधाकडे बोट दाखवत त्याने तिला विचारले.
"उम्म हुं.." तिने नकारार्थी मान डोलावली.
"बरं, झोप." तो तिला झोपण्यास म्हणाला. ती बेडच्या एका कडेला पोटात पाय घेऊन झोपली.
तो तिच्या बाजूला पहुडला. पण तिचा साडीचा पदर स्वतःच्या हाताला गुंडाळून घेतला. तो हात छातीवर ठेवला आणि दुसरा हात डोक्याखाली घेऊन तो झोपला.
मध्य रात्रीच्या सुमारास तो डोळे मिटूनच मान नकारार्थी डोलवत पुटपुटला,"नाही फादर, मी काही चूक केलेली नाही. माझी काहीच चूक नाही, फादर."
आणि एकदम दचकून जागा झाला. बाजूला पाहिले तर दुर्गा त्या ठिकाणी नव्हती.
क्रमशः
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा