डिसेंबर -जानेवरी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-६१
मागील भागात:-
दोन दिवसांनी अभयच्या माणसांनी त्याला घेऊन श्यामच्या घराजवळ आले. कार थोड्या अंतरावर उभी केली. त्याच्या माणूस श्यामच्या घराकडे बोट करून म्हणाला,"सर, हेच ते घर आहे."
"हो का, भारीच." अभय कारच्या खिडकीतून पाहत छद्मी हसत म्हणाला.
आणि कारमधून उतरून त्या घराच्या दिशेने चालू लागला.
आता पुढे:-
अभय त्याच्या दोन माणसांना सोबत घेतले.
डोळ्यांवर गॉगल चढवत ऐटीत चालू लागला.
डोळ्यांवर गॉगल चढवत ऐटीत चालू लागला.
वैजयंती घराबाहेरच्या कट्ट्यावर बसून तांदूळ पाखडत होती. तिचे लक्ष नव्हते. दुर्गा आत होती.
पावलांचा आवाज आल्याने तिने मान वर करून पाहिले. अनोळखी चेहरे पाहून ती प्रश्नांकिंत नजरेने त्यांच्याकडे पाहू खांद्यावरचा पदर सावरत उभी राहिली.
"नमस्कार, काकू." अभय थोडंसं झुकून दात काढत हात जोडून म्हणाला.
त्याचा आवाज ऐकून दुर्गाने खिडकीतून पडदा बाजूला काढून हळूच डोकावले. अभयला पाहून तिचे डोळे मोठे झाले. तिला धडकीच भरली. तिने पटकन लपत भितींला पाठ टेकवली. तिचा श्वास फुलू लागला. डोळे भरून आले. कंठ दाटून आला.
"कोण तुम्ही? कोणतं मोठे सायब वाटता? " अभयचा सुटाबुटातील रूबाबदार व्यक्तिमत्त्व पाहून वैजयंतीने गोंधळून विचारले.
"नाही काकू, हे खूप आसामी.." त्याच्यासोबत असलेल्या टकला माणूस सांगत होताच की अभयने हात दाखवत त्याला थांबवले.
"आपण एकमेकांचे खूप चांगले संबंधी आहोत. एवढंच काय आपण एकमेकांचे नातेवाईक आहोत असे समजा." अभय चेहऱ्यावर मोठी स्माईल आणत म्हणाला.
"चांगले संबंधी, नातेवाईक? काय बी कळना बघा. माफी असावी; पर तुम्हास्नी नाय वळखल वं. कशापायी आलासा ते सांगा." वैजयंतीने सौम्य स्वरात विचारले.
त्याचा दुसरा माणूस तोंड उघडणार तोच अभय त्याला थांबवत म्हणाला,"आ आं, हे थांब मीच सांगतो. ते काय आहे काकू, आमच्या नातेवाईकातली एक मुलगी घरातून पळून गेली होती. ती याच हाॅस्पिटलमध्ये होती. आता तर तिने याच घरातल्या मुलाबरोबर लग्न करून सेटल झाल्याचे कळले. ती मुलगी तीच आहे का याची शहानिशा करायलो आलो आहे."
"अस्स व्हय. माझ्या सुनेचा नातेवाईक हायती ठावं नव्हतं मला. आम्हास्नी तर वाटतं होतं की बिचारी पोरकी हाय की काय? म्या आणि माझा मुलगा किती वाट पाहत होतो. बरं झालं तुम्ही आलात ते. थांबा हं म्या तिला बोलावून आणते." वैजयंती हनवुटीवर हात ठेवत आधी आनंदाने आणि नंतर बिचारा चेहरा करत म्हणाली आणि नंतर दुर्गाला बोलवायला आत आली.
ती जाताच अभय त्या दोघांकडे बघून कुत्सित हसला.
दुर्गा आधीच घाबरून गेली होती.
वैजयंती आत येत तिला मवाळ भाषेत म्हणाली,"दुर्गा, तुझे नातेवाईक आहेत असे सांगत हायती. चल बाहेर ते तुला बघायचं म्हणत हायती. चल बयो."
"नको आत्या, मी नाही येणार बाहेर." दुर्गा रडत म्हणाली.
"चल पोरी" तिने पुन्हा विनवणी केली.
"कांगावा केला तर बघच, तुला सोडणार न्हाय." वैजयंतीने नेहमीप्रमाणे तिचं रागाचं अस्त्र बाहेर काढले.
"मी नाही येणार, मला सोडा." असे म्हणत दुर्गा हळूहळू भींतीला पाठ टेकवून रडत खाली बसली.
"अगं बयो ते काय तुला खाणार हायती व्हयं, चल गुमान." वैजयंती दटावत म्हणाली.
"आत्या, माझ्यावर बळजबरी करू नका, मला नाही यायचे हो. समजून घ्या तुम्ही." ती हात जोडत रडत म्हणाली.
वैजयंती तिच्या समोर बसत काळजीने म्हणाली,"तुला त्यांच भ्या वाटतंय का? ते काही तरी करतील असं वाटतंय का तुला? म्या हाय नव्हं तुझ्यासंग, तवा चल बयो."
"नाही म्हटलं ना मी, मला नाही यायचं ..नाही यायचं.." असे म्हणत दुर्गा रडतच दोन्ही हाताने स्वतःच्या कपाळाला बडवून घेऊ लागली.
ती खूपच हायपर झालेलं पाहून वैजयंती घाबरून गेली आणि तिचे दोन्ही हात धरून तिला म्हणाली,"ठीक हाय, ठीक हाय..तुला न्हाई ना यायचं बाहेर. नग येऊस पर बाय डोस्क बडवून नगो घेऊस."
ती कपाळावर हात मारत बाहेर निघाली पण मध्येच थांबत तिच्याकडे पाहत चिंतेने म्हणाली,"काय झालं हिला? चार-पाच दिसापासून जरा विचित्र वागत हाय. तिचे दिस भरत आलं म्हणूनश्यान की काय? देवा पांडुरंगा! तूच बघ बाबा आता."
बडबडत ती बाहेर आली. अभय तिची वाट पाहत होता.
"तिला जरा बरं वाटतं न्हाई. म्हणूनश्यान यायला नग म्हणती. तुम्हीच दोन पावले आत येऊन बघितलं तर बरं होईल." वैजयंती त्याला विनंती करत म्हणाली.
हे ऐकून तर दुर्गा पटकन उभी राहिली आणि पटकन पुढे येऊ लागली.
अभय हसत होकारार्थी मान डोलावत गाॅगल काढून हात घेत आत आला.
वैजयंती पुढे आणि तो तिच्या मागे होता.
"या, आत या.." वैजयंतीने त्याचं स्वागत केलं.
तोपर्यंत दुर्गा रूमच्या दारापर्यंत आली होती.
तो तिला पाहत विक्षिप्त हसू लागला.
त्याला पाहून दुर्गा आधी तर जागीच थिजली मग नंतर दाराला असलेला पडदा पटकन ओढून घेतला. तिचं असे वागणे वैजयंतीला पटले नाही.
"अगं दुर्गा.." म्हणून वैजयंती काही बोलणार तोच अभय तिच्याकडे वळून म्हणाला,"असू काकू, आम्ही ज्या मुलीच्या शोधात आलो होतो ती मुलगी ही नाही. येतो काकू, तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद."
अभय तिथून निघून गेला.
क्रमशः
अभयने दुर्गाला का ओळख दाखवली नाही?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा