Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-६२)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली गेली. कसे निभावतील हे नातं..
डिसेंबर -जानेवरी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-६२

मागील भागात:-

"अगं दुर्गा.." म्हणून वैजयंती काही बोलणार तोच अभय तिच्याकडे वळून म्हणाला,"असू काकू, आम्ही ज्या मुलीच्या शोधात आलो होतो ती मुलगी ही नाही. येतो काकू, तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद."

अभय तिथून निघून गेला.

आता पुढे:-

अभय निघून गेला पण दुर्गाच्या मनात भीती भरली. त्या भीतीने तिच्या मेंदूची उडू लागली. तिचे हात पाय वाकडे होऊ लागले. अंगाला झटके येऊ लागले. डोळे उघडे होते पण त्यात भय दाटले होते. तिच्या पायातील त्राण निघून गेला होता. ती दाराला पाठ टेकवून उभी होती. तिला आता अंगाला झटके बसू लागल्याने अंगाला झटका देत ती हळूहळू खाली सरकी लागली आणि एका क्षणाला ती खाली कोसळली. तिच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि ती मानेला झटका देत हातपाय झाडू लागली.

पडदा उंचीला थोडा कमी असल्याने तिचे झडत असलेले पाय वैजयंतीच्या नजरेस पडले.

तिने घाबरून तिच्याकडे धाव घेतली. तिची अवस्था पाहून ती पुरती घाबरून गेली.
"अरे देवा पांडुरंगा! काय झालं हे? हे दुर्गा , पोरे.. अगं..बया आता काय करू म्या? देवा, अशा येळला ह्यो कसला आजार आला हिला. वाचव रं देवा माझ्या लेकराला." ती तिच्या तोंडातून येणारा फेस तिच्या पदराने पुसत देवाचा धावा करत म्हणाली.

ती इकडे-तिकडे, वर-खाली पाहू लागली. तिला खिळ्याला अडकवलेला चाव्यांचा जुडगा दिसला. तिने पटकन ते काढून तिच्या हाताची मूठ उघडून त्या ठेवला आणि मदतीसाठी धावतच बाहेर आली.

तिला एक कंपाऊंडर येताना दिसला. तो तिचा घाबरलेला चेहरा पाहून काय झाले म्हणून विचारले.

तिने दुर्गाची अवस्था सांगून श्यामला पटकन बोलून आणायला सांगितले.

थोड्याच वेळात श्याम पटकन ॲम्ब्युलन्स घेऊनच आलाच. तोही तिची अवस्था पाहून खूप घाबरला होता.

तिला पटकन हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि तातडीने उपचार सुरू केले. तिला आय. ही. यू. विभागात ठेवले होते.

वैजयंती, श्याम आणि फादर तिच्या काळजीने येरझाऱ्या घालत होते. ती सुखरूपासाठी देवाकडे प्रार्थना करत होते.

थोड्याच वेळात डाॅक्टर बाहेर आले. तेव्हा फादरांना त्यांनी बोलावले. त्यांनी त्यांना काही तरी सांगितले.

श्याम आणि वैजयंती दोघेही ते काय म्हणतात त्यासाठी अधीर झाले होते.

"श्याम, दुर्गाच्या फीटस कंट्रोलमध्ये आल्या आहेत." फादर सांगत होते.

त्यांचे बोलणे मध्येच तोडत "म्हंजी काय ओ फादर? ती ठीक हाय नव्हं?" वैजयंतीने काळजीने विचारले.

"म्हणजे तिला जो आता आजार झाला होता तो आटोक्यात आला आहे. पण पुढे अजून यायची शक्यता असून तिच्या जीवाला धोका आहे. त्यासाठी लवकरात लवकर तिचे सिझेरीन म्हणजे ऑपरेशन करणे गरजेचे आहे, असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे." फादर पुढे म्हणाले.

श्याम काही बोलणार तोच वैजयंती म्हणाली,"श्याम, लय इचार करण्यात येळ नग लावूस, ऑपरेशन शिवाय दुसरा न्हाई तर करायला व्हय बोल."

"ठीक आहे, फादर." श्यामने थोडाही वेळ न दवडता लगेच म्हणाला.

ऑपरेशनची तयारी सुरू झाली. दुर्गाला फादरचे बोलणे आठवले. तेव्हा तिच्या मनात कसं तरी झालं.

श्याम बाहेर काळजीने उभा होता. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येत म्हणाले,"पेशंटला ऑपरेशनच्या आधी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे म्हणतेय, जा तिच्याशी बोलून घे."

तो पटकन तिच्याजवळ आत गेला. तिच्याजवळ स्टूल ओढून त्यावर बसला. त्याला पाहून तिचा कंठ दाटून आला. तो काही विचारायच्या आधीच ती त्याला कातर आवाजात म्हणाली,"मला माफ करा, श्याम. मी वेडी नाही, इतक्या दिवस वेडी असण्याचं नाटक करून तुमची फसवणूक केली."

ते ऐकून श्याम स्तब्ध झाला.

"माझे शीलहरण झाले तरी माझ्या मानासाठी तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधून मला नवजीवन दिलेत. खूप मोठ्या मनाचे व्यक्ती आहात तुम्ही, तुमच्या समोर उभ राहायचीही लायकी नाही माझी. माझं मन सतत मला खात होतं, भल्या माणसासमोर येण्याचीही समोर येण्याची लाज वाटत होती. म्हणूनच बाळ झाल्यावर ते तुम्हाला सोपवून दूर जाण्याचा निर्णय मी घेतला होता. पण आता ऑपरेशन झाल्यावर मी जगेन की नाही माहिती नाही त्याची भीती वाटली म्हणून..(ती हुंदके देत) मला मरणाची भीती नाही ओ, पण माझ्या जीवनातील हे एवढं मोठं कटूसत्य न सांगता मेले तर माझ्या आत्म्याने मला माफ केले नसते. म्हणून मीही कबुली देत आहे. तुम्ही माफ करा अगर नका करू. पण मी तुमची आयुष्यभर ऋणी असेन, श्याम. आता मरण आले.." ती मुसमुसत म्हणत होतीच तो तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणाला,"बस्स, आता या गोष्टींचा विचार करू नकोस. हे बघ दुर्गा, मी तुला आधीही तुला म्हणालो होतो आज परत म्हणतोय मी तुला मनापासून माझी पत्नी म्हणून स्वीकार करूनच तुझ्याशी लग्न केले आहे. (तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हातात घेऊन) हे गळ्यातले मंगळसूत्र देवीआईच्या गळ्यातील आहे. तिचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी तुला काहीही होणार नाही. तू निश्चित राहा. " तो तिचे डोळे पुसत तिला दिलासा देत म्हणाला.

"आणि अजून एक गोष्ट, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करू लागलोय, दुर्गा." तो तिचा हात एका हातात घेऊन दुसऱ्या हाताने तिच्या डोक्यावर फिरवत मनापासून म्हणाला.

तिचे डोळे तुडुंब पाण्याने भरून आले ती हुंदका देत हात घट्ट धरून म्हणाली,"माझेही तुमच्यावर खूप प्रेम आहे, श्याम."

तो खूप खुश झाला. पण तिच्या पोटात कळा यायला सुरुवात झाली. ती पोटाला धरून जोरात विव्हळली,"आह ऽऽ"

तिला पटकन ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल केले. श्यामचा जीव काळजीने तुटू लागला.

क्रमशः

काय होईल दुर्गा वाचू शकेल का? अभयचा काही प्लॅन असेल का?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all