Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-६)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि तिला समाजात मान देण्यासाठी ते दोघे अनपेक्षितपणे लग्नबंधनात बांधले गेले. कसे निभावतील श्याम आणि दुर्गा हे नाते? जाणून घ्या या कथेत..
डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-६

मागील भागात:-

मंगेश आणि नरेश श्याम विरूद्ध फादरचे कान भरत होते.

आता पुढे:-

"आणि फादर एवढंच नाही तर आम्ही किंवा डाॅक्टर त्याला काही बोलायला गेलो की म्हणतो कसा माझं आणि फादर यांच्यात बोलणं झालं आहे. आमच्यात छान बाॅंडिंग आहे आणि अंडरस्टॅंडिंगही वेगळी आहे. तुम्ही यात नाक खुपसू नका. जा इथून तुमच्या कामाशी काम ठेवा, असे म्हणत त्याने हाकलून लावले हो आम्हाला." मंगेश दीनवाणा चेहरा करून म्हणाला.

त्याला नरेशनेही दुजोरा दिला.

फादर शांतपणे मंद स्मित करत विचारले," काय म्हणाला श्याम माझ्याबद्दल? पुन्हा एकदा सांगा."

मंगेश लगेच म्हणाला,"तुमची आणि त्याची अंडरस्टॅंडिंगच वेगळं आहे असे म्हणाला."

"करेक्ट तर म्हणाला तो. जा तुमचं काम करा." असे म्हणत फादर जाऊ लागले तर त्या दोघांनी "फादर, फादर" म्हणत पुन्हा त्यांना अडवले.

तेव्हा फादर त्या दोघांकडे पाहत म्हणाले,"हे बघा, एखाद्यावर आरोप लावण्यापूर्वी आपण योग्य आहोत का याचा विचार करावा."

त्यांनी त्या दोघांकडे बोट केले. तेव्हा दोघांनी मान खाली घातली.

ते पुढे म्हणाले,"तुम्ही सगळे पेशंटकडे फक्त वेडे म्हणून पाहता पण श्याम स्वतःची मुले समजतो. एका आईच्या मायेने लहान मुलांप्रमाणे त्यांनी देखभाल करतो, काळजी घेतो, माया लावतो. जा तुमचं काम बघा."

त्यांचं बाकी काही न ऐकून घेता फादर तेथून निघून गेले.

त्यांचा डाव फसला म्हणून ते‌ दोघे रागाने हात चोळत होते.

फादर पुढे आले तर श्याम त्यांना सर्वांना आपल्याला वाॅर्डमध्ये जायला सांगून येत असलेला दिसला.

तोही त्यांना पाहून हसला आणि त्यांच्याकडे आला.

"गुड मॉर्निंग, श्याम." ते हसत म्हणाले.

"गुड मॉर्निंग, फादर." तोही नम्रतेने म्हणाला.

दोघे चालत चालत बोलतं होते.

"तुझ्या आईला बरे नव्हते ना. तर तू जाऊन लगेच आलास?" फादरने काळजीने विचारले.‌

"आता बरी आहे. म्हणून निघून आलो." तो म्हणाला.

"अच्छा, काय रे हे असे पेशंटसारखे कपडे का घातलेस तू? तूही त्यांच्यात सामील झालास काय?" त्यांनी त्याच्या कपड्याकडे पाहत विचारले.

"नाही ओ फादर. अहो ते एक पेशंट आहे, माझं युनिफाॅर्म पाहून मलाही असाच ड्रेस दे म्हणून हट्ट करत होता. म्हणून मग मी त्याच्यासारखा ड्रेस घातला तेव्हा त्याला खूप आनंद झाला. त्यांना मी त्यांच्यापैकीच एक वाटलो. त्याच्या आनंदासाठी घातले होते. आता बदलतो." तो हसत म्हणाला.

त्याच्याकडे कौतुकाने पाहत फादर हसले
त्या हास्यामागे शब्दांत न मावणारा अभिमान दडलेला होता.

पुढे ते म्हणाले,"अच्छा, काल‌ तू एक दिवस नव्हता तर त्या वाॅर्ड नं. ३ व ७ मधील पेशंटने औषध घेण्यासाठी खूप गोंधळ घातला म्हणे. मिळेल ते ती वस्तू वाॅर्डबाॅयला फेकून मारले. जरा बघ बरं जाऊन काय प्राॅब्लेम आहे ते."

"हो फादर, बघतो मी. तुम्ही निश्चिंत राहा." तो विश्वास म्हणाला आणि तेथून निघून गेला.

फादरही त्यांच्या कामासाठी निघून गेले.

श्याम युनिफॉर्म घालून वाॅर्ड नं. ३ मध्ये आधी गेला.

तो पेशंट स्वातंत्र्य सैनिक असल्यासारखे बरळत होता.

श्यामने त्याच्याकडे पाहिले. टेबलावरील टॅबलेटच्या पाकिटातून एक टॅबलेट काढून गुपचुप त्याच्या पुढे ठेवले.

त्याने विचारले,"हे काय आहे?"

"टॅबलेट! पण तू हे हातात घेतले तर बघच!" श्यामने त्याला दरडावले.

त्या पेशंटने ते टॅबलेट हातात घेतले.

ते पाहून तो मनात हसला कारण त्याला माहिती होतं तो सरळ सांगितले की ऐकणार नाही. करू नको की म्हटल की तो बरोबर ते करणार म्हणून तो मुद्दाम त्याला दरडावत होता.

श्याम जगमधील पाणी ग्लासमध्ये ओतत त्याला म्हणाला,"ती टॅबलेट तोंडात अजिबात घ्यायचे नाही."

त्याने ती टॅबलेट तोंडात टाकली. मग श्याम पुढे म्हणाला,"आता पाणी पिऊन गिळायचे नाही."

त्याने त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास घेतला आणि पटकन पाणी पिऊन ते टॅबलेट गिळून टाकले आणि त्याच्याकडे पाहत हसत म्हणाला,"मी ती टॅबलेट गिळून टाकली, बोल आता काय करशील?"

त्याने मांडीवर थाप मारत मिशिला पिळ दिली.

"काही नाही करणार, थॅंक्यू." श्याम त्याच्या खांद्यावर थोपटत हसत म्हणाला आणि तेथून बाहेर पडला.

दुसऱ्या पेशंटलाही त्याने त्याच्या पद्धतीने टॅबलेट घ्यायला लावली. तोच एका नर्सने फादरने त्याला बोलवण्याचा निरोप पाठवला.

क्रमशः

कशासाठी बोलावलं असेल फादरने श्यामला?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
0

🎭 Series Post

View all