Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-७)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि समाजात तिचा मान टिकवण्यासाठी अनपेक्षित त्यांची लग्न गाठ बांधली गेली. कसे निभावतील श्याम आणि दुर्गा हे नाते जाणून घ्या कथेत..

डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ

भाग:-७

मागील भागात:-

दुसऱ्या पेशंटलाही त्याने त्याच्या पद्धतीने त्याला टॅबलेट घ्यायला लावली. तोच एका नर्सने फादरने त्याला बोलवण्याचा निरोप पाठवला.

आता पुढे:-

फादर त्यांच्या ऑफिसमध्ये बसले होते. त्यांच्यासमोर सफारी ड्रेसमधला एक चाळीस ते पंचेचाळीस वयाचा व्यक्ती बसला होता.

ते दोघे बोलत होते.

"तिला इथपर्यंत आणताना खूप त्रास झाला.‌ कसंबसं इथपर्यंत आणले." तो व्यक्ती त्यांना सांगत होता.

फादर मान डोलावत होते.

तेवढ्यात श्याम त्यांच्याजवळ येत म्हणाला,"फादर तुम्ही बोलावत मला?"

"हो श्याम, हे एस पी सर आहेत, यांच्या कारमध्ये एक पेशंट आहे. तिला घेऊन ये." फादर त्याला त्या एस पी यांच्याकडे हात करून म्हणाले.

"येस, फादर." म्हणत त्याने मान डोलावली.

तो एस पी यांना आदराने म्हणाला,"सर, इथे सामान्यतः पेशंट यायला तयार होत नाही. त्यांना फसवून, गोड बोलून आणणे खूप कठीण असतं. त्यासाठी तिची काही हिस्ट्री कळली तर बरं होईल, म्हणजे मी तसे बोलून तिला आणता येईल."

"तू म्हणतोस ते खरं आहे रे, श्याम. पण मला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही रे." एस. पी. खांदे उडवत म्हणाले.

तोच एक पेशंट तिथे गाडी चालवण्याचे ॲक्टिंग करत तोंडाने 'पिप पिप पोम्प पाॅम्प' आवाज करत आत आला. ते एस. पी. साहेबांना बिडी, सिगारेटची मागणी करू लागला.

श्याम त्या पेशंटला हाताळत म्हणाला,"ए हरी, ते बिडी, सिगारेट ओढत नाहीत. तू तुझ्या रूममध्ये जा, मी ते तुला आणून देतो."

हरी त्या एस. पी.कडे रागाने बघत पुन्हा गाडी चालवण्यासारखे आवाज करत निघून गेला.

तो गेल्यावर श्याम एस. पी.साहेबांना म्हणाला,"सर, माफ करा. पण तुम्ही तुमच्या कारमध्ये तिला घेऊन आलात, मग तुम्ही म्हणाताय तिच्याबद्दल माहिती नाही, ते कसे?"

एस. पी. साहेब बोलायच्या आधीच फादर त्याला म्हणाले,"श्याम, ती पेशंट एक तरूण मुलगी आहे. बहुतेक ती घरातील लोकांची नजर चुकवून पळून आली असे‌ वाटते. रस्त्यावर एकटीच इकडे तिकडे भटकत होती. ती त्यांच्या नजरेस पडली. तरूण मुलीला एकटी सोडणे त्यांच्या मनाला पटले नाही. ती सेफ राहावी म्हणून त्यांनी तिला इथे आणले. तू जा, तिला गोड बोलून घेऊन ये."

"जी फादर, घेऊन येतो." असे म्हणत श्याम तिला आणायला गेला.

कारमध्ये ती मुलगी मांडी घालून हाताची बोटे मोजत होती.

"वीस..बावीस..नाही नाही.. चुकलं.." असे म्हणत ती पुन्हा बोट मोजू लागली.

श्याम कारच्या खिडकीपाशी येत वाकून पाहत स्मित हास्य करत तिला म्हणाला,"हॅलो!"

तिने वळून तिच्याकडे पाहिलं. त्याने भुवया उडवत पुन्हा हसला. तिचेही ओठ रूंदावले. ती खूप सुंदर होती. कपड्यावरून तर मोठ्या घरातील वाटत होती. तिने दोन केसांची वेण्या घातल्या होत्या. दोन्ही भुवयांच्या मधोमध एक टिकली, हातात बांगड्या आणि उंची पंजाबी ड्रेस तिने घातला होता.

तो कारचा दरवाजा उघडत तिला म्हणाला,"चल, ये बाहेर."‌

"हं," ती तोंडाजवळ बोट नेत हुंकार भरला.

"बाहेर ये, कम." त्याने तिला बाहेर येण्यासाठी खुणावले.

ती गळ्यातील ओढणी पकडत खाली उतरली. इकडे तिकडे नजर भिरभिरवत हात मागे-पुढे हालवत तिने त्याला विचारले,"ए हॅलो, हा कोणता पॅलेस आहे?"

क्रमशः

कोण असेल ही मुलगी? काय सांगेल श्याम तिला?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all