Login

अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-८)

अपराध केलेला नसतानाही तिच्या संरक्षणासाठी आणि समाजात तिचा मान टिकवण्यासाठी त्यांची अनपेक्षित लग्न गाठ बांधली. कसे निभावतील श्याम आणि दुर्गा हे नातं? जाणून घ्या या कथेत..

डिसेंबर -जानेवारी २०२५-२६

दीर्घकथा लेखन स्पर्धा

शीर्षक:-अनपेक्षित बांधली गाठ (भाग:-८)

भाग:-८

मागील भागात:-

ती गळ्यातील ओढणी पकडत खाली उतरली. इकडे तिकडे नजर भिरभिरवत हात मागे-पुढे हालवत तिने त्याला विचारले,"ए हॅलो, हा कोणता पॅलेस आहे?"

आता पुढे:-

"हां, (हलके हसून) हे एका किंगचं पॅलेस आहे. जिथे आता तू राहणार आहेस." श्यामने तिला सांगितले.

"हा का?" ती खांदे उंचावत हसत म्हणाली.

"हुं, आता चल, आत." तो तिला म्हणाला.

"ए.. ए , थांब. मी जर तुझ्यासोबत यायला हवं तर मला तुझी टेस्ट घ्यावी लागेल." ती म्हणाली तसा तो चाटच पडला.

"काय! तू माझी टेस्ट घेणार?" त्याने अचंबित होऊन स्वतःकडे बोटं करतं तिला विचारले.

"हो, मला टेस्ट घ्यायला खूप आवडते.
जर तू त्या टेस्टमध्ये पास झालास तरच मी तुझ्यासोबत येईन. ओके." हळूहळू पुढे चालत ती त्याला म्हणाली.

"बरं बाई, जसं तू म्हणशील तसं." तो तिच्या मागे येत म्हणाला.

'कसली टेस्ट घेणार आहे, देव जाणे. पण सध्या मला तिच्या म्हणण्यानुसार वागावं लागेल.' तो मनात विचार केला.

ती तेथून पुढे निघून गेली.

"ए पोरी कुठे चाललीस? थांब." तो तिच्या मागे जात म्हणाला.

"मी इथेच आहे." ती मागे वळून हसत म्हणाली.

ती हनुवटीवर बोट ठेवून म्हणाली,"अम्म, माझा पहिला प्रश्न. तो चालत नाही; पण जमीन फाडतो, पण जखम होत नाही. सांग पाहू, ते काय आणि त्याला किती पाय असतात?"

"ते नांगर असते. त्याला दोन पाय असतात." त्याने मागे हात बांधून हसत उत्तर दिले.

"अरे वेड्या, तू चुकीचे उत्तर दिलेस. दोन नाही, सहा पाय असतात." ती डोळे मिचकावत म्हणाली.

"ते कसं बरं?" त्याने प्रश्नार्थक चेहरा करत विचारले.

"तू अगर मी कोणीही नांगर चालवले तरी नांगराचे दोन आणि बैलाचे चार असे एकूण सहा पाय झाले ना. हा ऽऽ हा.." ती हसत उडी मारून टाळी वाजवत म्हणाली.

"काय रे! मी बरोबर सांगितले ना." ती पप्पी फेस करून म्हणाली.

"हो, अगदी बरोबर सांगितलेस." तो हसत म्हणाला.

"हो, तर मी अगदी बरोबरच सांगते. तू मान्य केलेस ना. नाही.. नाही.. तू मान्य करायलाच हवं." ती मान हालवत म्हणाली आणि ड्रेस हातात धरत स्वतः भोवती गिरकी घेऊन नाचत नाचत पुढे निघाली.

'आयला, ही तर हुशार दिसतेय. हिला वेडी कोण म्हणेल? शिकलेली दिसतेय.' तो तिच्याकडे पाहत मनात बडबडला.

नंतर मनातले विचार झटकत तिला थांबवत म्हणाला,"ए चल, आता झाली ना तुझी टेस्ट घेऊन."

ती थांबली. तिच्या समोर एक ध्वज स्तंभ होता. तिथे जाऊन तिने ध्वजारोहण केल्यासारखे करून डोक्याला हाताचा पंजा टेकवत सॅल्युट केला आणि त्या स्तंभाला पकडून गोल गोल फिरू लागली.

"अगं ए पोरी, गोल गोल फिरू नकोस. तू फिरत आहेस पण माझं डोकं गरगरत आहे. चल, बाई आत चल."

"नाही मी नाही येणार आत, माझा दुसरा प्रश्न आहे ना अजून." ती थांबून दोनच्या ऐवजी चार बोटे दाखवत त्याला म्हणाली.

त्याने मनातच कपाळावर हात मारून घेतला. काही क्षणांपूर्वी त्याला वाटलं ती वेडी नसेल पण आता तिला पाहून ती वेडी असल्याची त्याला खात्री वाटू लागली.

क्रमशः

काय असेल तिचा दुसरा प्रश्न? ती कोण, कुठली कळेल का?

©️ जयश्री शिंदे

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.

0

🎭 Series Post

View all