डिसेंबर -जानेवारी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:- ९
मागील भागात:-
त्याने मनातच कपाळावर हात मारून घेतला. काही क्षणांपूर्वी त्याला वाटलं ती वेडी नसेल पण आता तिला पाहून ती वेडी असल्याची त्याला खात्री वाटू लागली.
आता पुढे:-
तिला दोन आणि चार मधला फरक कळत नव्हता की ती मुद्दाम त्याला सतावत होती, हेच श्यामला समजत नव्हते.
तो हळूच पुढे आला आणि तिची दोन बोटे मुडपून तिला म्हणाला,"हे दोन असतात."
तिने मुडपलेली बोटे पुन्हा सरळ केली आणि ती बोटे त्याच्या समोर करत गाल फुगवून म्हणाली,"नाही, हेच दोन असतात."
"बरं बाई, दोन तर दोन. आता विचार तुझा तो दुसरा प्रश्न! पण हा शेवटचा असेल, त्यानंतर गुपचूप आत चालायचं," सुस्कारा टाकत श्याम तिला म्हणाला. त्याने जणू तिच्यासमोर शरणागती पत्करली होती.
ती पुन्हा ध्वजस्तंभाला धरून गोल फिरत म्हणाली,"कावकाव करतो म्हणून कावळ्याला कावळा म्हणायचे की तो काळा असतो म्हणून कावळा म्हणायचे?"
"ए बाई, आधी ते गोल गोल फिरणे थांबव. मग तुझ्या प्रश्नांचं उत्तर देतो." तो तिला हाताला धरून थांबवत थोडा वैतागत म्हणाला.
ती गाल फुगवून भुवया उंचावत पाहत म्हणाली," सांग उत्तर."
"हम्म, काळा तर तो असतोच आणि तो कावकाव करतो म्हणून तर त्याला कावळा म्हणतो. आता तुझी टेस्ट संपली असेल तर चल आत आता." तो सुस्कारा टाकत तिला म्हणाला.
"हम्म, अजून एक शेवटचा प्रश्न, एकदम सिंपल असा प्रश्न विचारते." ती दाताखाली बोट चावत म्हणाली.
"सिंपल?" असे म्हणत तो पुढे आणखी काही बोलणार तोच फादर तिथे येत म्हणाले,"काय रे, श्याम? तुला पेशंटला घेऊन ये म्हणालो तर तू ही इथेच तिच्याशी गप्पा मारत बसलास होय रे."
"तसं नाही, फादर. ही केस जरा काॅम्प्लिकेटेड आहे. ती मला प्रश्न विचारत होती. त्याचे मी करेक्ट उत्तर दिले तरच ती माझ्यासोबत येईल म्हणाली." तिच्याकडे बोट करत तो फादरला म्हणाला.
ती मान झुलवत ओढणीशी बोटाने खेळत उभी होती. फादर तिचे हावभाव पाहत होते.
श्याम तिला फादरांकडे बोट करत म्हणाला,"हे बघ, तुला जे काही प्रश्न विचारायचे ते तू यांना विचार."
"हे खरंच देतील का मला सगळ्या प्रश्नांची उत्तरे?" तिने त्यांच्याकडे पाहत त्याला विचारले.
"हो, नक्कीच देतील." तो हसत म्हणाला.
मनात मात्र 'माझी सुटका झाली' असा सुस्कारा सोडला.
ती त्यांच्याकडे पाठ करून म्हणाली,"उम्म, यांना एकच पण मोठा कठीण प्रश्न विचारते. सांगा हे किती?"
तिने हाताचे एक बोट पुढे केले.
फादर शांतपणे म्हणाले,"तीन!"
"हे चूक आहे ना." फादरने दिलेले उत्तर ऐकून श्यामने गोंधळून विचारले.
"नो, ही इज करेक्ट. आय एम कमिंग विथ यू." ती हसत फादरकडे पाहत म्हणाली आणि त्यांच्या हातात हात दिला.
"चल बाळा," असे म्हणत फादर तिला आपल्या सोबत घेऊन गेले.
जाणाऱ्या त्या दोघांकडे पाहत श्याम स्वतःशी सुस्कारा टाकत म्हणाला,"हम्म, बरोबर आहे म्हणा, माझ्यापेक्षा फादर जास्त अनुभवी आहेत. त्यांच्या वीस वर्षांच्या सर्व्हिसपुढे माझी तीन वर्षांची सर्व्हिस कुठे लागायची?"
क्रमशः
तिच्याबद्दल कधी कळेल?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा