Login

अनपेक्षित भेट

काॅलेजमधील प्रेम अनपेक्षितपणे पन्नासाव्या पुन्हा नव्याने गवसण्याची कथा
#लघुकथा लेखन
ईरा स्पर्धा

शीर्षक:- अनपेक्षित भेट

"कधी येणार ही, वेळ तर निघून गेली. काय करावं आता? आणखी थोडावेळ वाट बघतो. नाही आली तर जातो घरी. " वैतागून माधव घड्याळात पाहत स्वतःशीच पुटपुटले.

तेवढ्यात ती येताना दिसताच ते थोडे सावरून उभे राहिले. जवळ येताच ते हात दाखवत म्हणाले," काय हो, कंडक्टरसाहेब, केव्हापासून वाट पाहतोय. इतका उशीर का झाला?" असे एकामागून एक प्रश्नांचा भडीमार करत ते बसमध्ये चढून एका सीटवर बसले.

"अहो, काका वेळेच निघालो होतो पण मध्येच टायर पंक्चर झाले म्हणून ते काढेपर्यंत उशीर झाला. तरीही आलो ना बस घेऊन. " कंडक्टर हसत तिकिट काढून देत त्यांना म्हणाला.

माधव यांनी ते तिकिट घेत स्मित हास्य करत मान डोलावली. माधव साधारण पन्नाशी गाठत आलेले, एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. पन्नास वय असले तरी ते चर्मिंग दिसायचे. रोज ते ह्या त्यांच्या आवडत्या बसमध्ये प्रवास करत. आज खरं तर शाळेला सुट्टी होती पण गृहपाठाच्या वह्या तपासायच्या होते म्हणून ते शाळेत निघाले होते. म्हणून बस उशीरा आले तरी शांत ते होते. त्यांचा स्वभाव तसा शांतच. जास्तच कोणाशीच ते बोलत नसायचे. कामाशी काम ठेवायचे.

शाळा आली तसे ते बसमधून उरतले. शाळेतील स्टाफरूममधील त्यांच्या कपाटातील वह्या घेऊन तेथील टेबलावर ठेवून तिथेच खुर्चीवर बसून तपासले. दोन चार कर्मचारी होते तिथे सोबतीला. काही वेळानंतर ते पुन्हा घरी जाण्यास निघाले. दुपार झाल्याने बाहेर खूप ऊन होतं. आता बस नसणार म्हणून त्यांनी रिक्षाने जायचे ठरवले. त्यात लगेच समोरून एक रिक्षा येताना दिसली. त्यांनी हात दाखवून ती थांबवली आणि त्यात बसणार तोच पलिकडून पण कोणीतरी बसलं. त्या व्यक्तीने कोठे जायचे ते ठिकाण सांगून पर्स मांडीवर ठेऊन बाजूला पाहिले. तर माधव समोर पाहत होते. रिक्षा चालू झाली. त्या त्यांना बोलत करण्यासाठी म्हणाल्या," जिथे मला जायचे आहे, तुम्हालाही त्याच ठिकाणी जायचे आहे का?"

त्यांनी त्यांच्याकडे न पाहताच होकारार्थी मान डोलवत म्हणाले, " त्याच्या थोडं पुढे जायचे आहे. " ते समोर पाहूनच म्हणाले. तिला थोडं विचित्र वाटलं. त्यांचा चेहरा काही त्यांना व्यवस्थित दिसलाच नाही कारण त्यांनी मान वळवून बाहेरच्या दिशेला पाहत होते.

"काय विचित्र माणूस आहे." त्या मनातच नाक मुरडत म्हणाल्या. त्यांचा मोबाईल वाजला म्हणून त्या ते काढून बघत होत्या तोच समोर एक खड्डा त्या रिक्षावाल्याला दिसलाच नाही. त्यामुळे त्याचा गचका बसल्याने त्यांचा तोल गेला. माधवला धडकून त्यांचा मोबाईल खाली पडला. तो देण्यासाठी माधव आणि त्या एकदमच खाली वाकले. तेव्हा त्यांचे चेहरे एकदम समोरासमोर आले. नजर आपसुकच एकमेकांकडे वळली. तेव्हा दोघेही आश्चर्याने बघत एकदमच जोरात ओरडले "तू?"

रिक्षावाल्याने घाबरून मागे वळून गचका बसला म्हणून साॅरी म्हटले. पण हे दोघं तर एकमेकांना पाहण्यात व्यस्त होते. हाॅर्नचा आवाज आल्यावर ते दोघे व्यवस्थित बसले. एकमेकांना पाहून सुखद धक्का बसल्याने ते हसले.

त्या भावूक होत म्हणाली," माधू, कसा आहेस? "

माधव ही भावूक होत म्हणाले, " मस्त आहे, तू कशी आहेस, मीरा? "

" मी पण मस्त आहे." त्यांनीही हसत उत्तर दिले.
दोघांचेही डोळे पाणावले होते. तेवढ्यात रिक्षा थांबली.

"मॅडम, तुमचे ठिकाण आले." रिक्षावाला मागे वळून मीराला म्हणाला.

त्या माधवकडे पाहत म्हणाली," माधू, माझं घर आलं, तू पण चल ना. बसून निवांत बोलूया. तुला चालेल ना? "

एकतर त्यांना ते खूप वर्षांनी पाहत होते. काॅलेज नंतर एक दोनदा ओझरती भेट झालेली त्या नंतर आता भेटले होते. त्यामुळे काय आणि कसं बोलावं हेच कळेना त्यांना. भांबावून गेले होते ते या अनपेक्षित भेटीने. त्यांनी हाक मारल्यावर भानावर येऊन होकार देत रिक्षावाल्याला पैसे देऊन दोघेही खाली उतरले.

मीरा त्यांच्या काॅलेजामधील मैत्रिण. दिसायला काळीसावळी पण नाकीडोळी सुंदर. तेव्हा माधव यांच तिच्यावर खूप प्रेम होतं. तिला त्यांच्या मनातलं सांगायच्या आधीच तिने त्यांना त्यांचं लग्न ठरलेलं सांगितल्याने परत कधीच त्यांनी त्यांना न भेटण्याच ठरवलं होतं. नंतर एक दोनदा ओझरती भेट झाली होती तेव्हाही त त्यांना न बोलताच निघून गेले होते. पण आज पुन्हा नियतीने त्यांची अचानक अनपेक्षित अशी भेट घडवून आणली होती.

मीरा त्यांना घरी घेऊन आल्या. त्यांना बसायला सांगून त्या आत जाऊन त्यांच्यासाठी पाणी घेऊन आल्या. मी आलेच असे सांगून पुन्हा किचनमध्ये गेल्या. तो पर्यंत ते त्यांच्या घराचं निरीक्षण करत होते. घर छान सजवलं होतं. एका ठिकाणी त्यांची नजर स्थिरावली. ते उठून त्या ठिकाणी गेले. तिथे त्या दोघांचा काॅलेजमधला फोटो होता, ज्यात ते दोघे खळखळून हसतानाचा त्या फोटोवरून नकळत त्यांनी हात फिरवला. डोळे पुन्हा भरून आले.

"काय झालं, माधू? " मीरा त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या.

" तू अजून हा फोटो संभाळून ठेवला आहेस. पण.." बोलता बोलता ते थांबले. डोळ्यांवरचा चष्मा काढून रूमालाने डोळे टिपले.

त्यांनी डोळ्यांनेच खुणावले सांगते बस असा इशारा केला. त्यांनी टिपाॅयवर काचेच्या ग्लासमध्ये शरबत आणून ठेवले होते. ते पिण्यास सांगितले. ते त्यांनी निमूटपणे पिले.

मीरा म्हणाल्या, " पण काय माधू, बोल आता."

ते थोडे कचरत अडखळत म्हणाले," तुझे तर लग्न झाले ना. मग तुझ्या नवऱ्याने तुला हा फोटो लावायला परवानगी कशी दिली? तेही इतक्या मोठा फ्रेममध्ये? तो कुठे आहे? "

"तो दिसणारच नाही कारण.." त्या श्वास सोडत म्हणाल्या.

ते बुचकळ्यात पडले. तरीही त्यांचे पुढचे बोलणे ऐकायला त्यांनी अधिरेतेने कारण विचारले.

"कारण माझं लग्नच झालंच नाही. " त्या हसत म्हणाल्या. " मग त्याच्या परवानगीची गरजच काय? वेड्या!"

ते शाॅक लागल्यासारखं त्यांच्याकडे पाहू लागले. त्या हसत पुन्हा म्हणाल्या, " ते तर तू तुझ्या मनातलं मला सांगावस म्हणून तसे तुला सांगितले होते. पण तू तर काहीच न सांगताच माझ्यापासून दूर निघून गेलास. एक दोनदा भेटलो तरी तेव्हाही तू मी काही बोलायच्या आत निघून गेलास. " त्या उदास होत त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होत्या.

"म्हणजे तू ऽऽ तुऽऽ तुझही माझ्यावर प्रेम होतं. " ते अचंबित होत आनंदाने डोळे विस्फारत अडखळत म्हणाले.

" होतं नाही बुध्दु, आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहिलं. " त्या जवळ येत त्यांचा हात हातात घेत भरल्या डोळ्यांनी पाहत म्हणाल्या.

"आणि हो, मला माहिती आहे तुझंही आजही तेवढंच प्रेम आहे. " त्या नाक ओढत म्हणाल्या.

"तुला कसं कळलं ते?" ते आश्चर्याने विचारले.

त्यांनी त्यांच्या पाकीटामध्ये असलेला त्यांचा फोटो दाखवला. जो रिक्षात दोघे मोबाईल घेण्यासाठी वाकले होते तेव्हा त्यांच्या शर्टाच्या खिशातून पडला होता. त्याच्या नकळत त्यांनी ते स्वतःच्या पर्समध्ये ठेवला होता.

"आताही मनातलं सांगणार नाहीस का? " त्या चेहरा बारीक करत म्हणाल्या.

"अऽऽ हं.. मीरा, आजही माझं तुझ्यावर तेवढचं प्रेम आहे जेवढं काॅलेजमध्ये असताना होतं." ते हसत पण भावूक होत त्यांचा हात हातात घेत म्हणाले.

"चंदेरी केस झाले आता म्हणतोस तू, तेव्हाच म्हटलं असतास तर आज सुखाचा संसार होऊन नातवंडे आली असती आपल्याला. " त्या त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवत नजर वर करत मिश्किल सुरात म्हणाल्या.

तेही हसून त्यांच्या माथ्यावर ओठ टेकवत त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले," देर आये दुरुस्त आये, चल आता करूयात लग्न. करशील ना माझ्याशी लग्न."

त्यांनीही आनंदाने होकार भरला. दोघेही एकटेच होते. काही मित्र मैत्रिणींच्या साथीने त्या दोघांनी साध्या पध्दतीने देवाच्या साक्षीने देवळात लग्न केले. आता आनंदाने संसारात रमले.

काॅलेजमधील मीरा व माधव यांचे प्रेम वय पन्नास वर्ष असताना एका अनपेक्षित भेटीत पूर्ण झाले.

समाप्त:-

प्रेम वेळीच व्यक्त केले पाहिजे. प्रेम खरे असले तर कधी ना कधी नियती त्यांना एकत्र आणतेच. प्रेमाला वय, रूप, रंग नसतेच. पन्नाशीतील प्रेमही प्रेमच असतं. प्रेमाला उपमा नसते ते देवा घरचे देणे हे खरं. नाही का?