डिसेंबर -जानेवरी २०२५-२६
दीर्घकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- अनपेक्षित बांधली गाठ
भाग:-५६
मागील भागात:-
"काही वेळापूर्वी तुझ्या आईने तुझ्या बायकोला चापट मारून तुझ्या घरी घेऊन गेली. तेथून नेऊन त्या बिचारीसोबत अजून काय करेल देव जाणे!" तो वाॅर्डबाॅय कुत्सित हसत म्हणाला.
श्यामने घाबरून त्याच्या रूमकडे धाव घेतली.
आता पुढे:-
वैजयंतीने दुर्गाला छान पद्धतीने दागिन्यांनी नटवले होते. छान साडी नेसवून तिच्या केसांत गजरा माळला होता. दागिन्यांनी तिचं तिच्या सौंदर्य आणखीनच खुलून आलं होतं.
"जरा इकडे फिर, बघू दे तरी मला. माझी सून कशी दिसतेय ते?" असे म्हणत वैजयंतीने तिचा चेहरा ओंजळीत घेऊन स्वतःकडे वळवला.
"आहा! साक्षात लक्ष्मी दिसत हाईस गं. इतकं सुरेख रूप आधी कवाच पाहिलं नव्हतं म्या. बया, माझीच नजर लागायची तुला. लय झाक दिसलीस बघ तू." वैजयंतीने तोंडभरून दुर्गाच्या सौंदर्याचे कौतुक केले आणि तिच्यावरून बोटे ओवाळून कानशिलाजवळ आणत कडाकडा मोडली.
"हे बघ बाय, आपल्या घरी पाहुणे येत जात असतात. ते आल्यावर तू कायसुदीक बोलू नगोस, फकस्त बाहुलीवानी बसून राहा. म्या त्यास्नी सांगेन की माझी सून कमी बोलतिया. मंग कुणाला बी तू येडी हाईस ते कळणार न्हाई. समजलं का?" वैजयंतीने तिला हसत विचारले.
दुर्गा निर्विकारपणे खाली मान घालून बसली होती. ओठ थरथरले पण शब्दच फुटले नाहीत. तेव्हा ती तिच्या डोक्याला डिवचत चिडून म्हणाली,"अगं ए, ऐकाया येत न्हाई का तुला? तोंड उघड की."
"हुं, समजलं." दुर्गा बोटांशी खेळत बारीक आवाजात म्हणाली.
"हं, दोन येळा सांगितल्यावर तुला समजलं." ती म्हणाली.
अजूनही काही दागिने एका पेटीत राहिले होते. ते हातात घेत ती थोडी भावूक होतं म्हणाली,"अम्म..बघितलं का पोरी, मला असायला एकुलता पोरगं. त्याचं लगीन थाटामाटात करावं म्हणून रातदिस काम करून पोटाला चिमटा काढून पै-पै जमवून हे दागिने बनवले. लगीनदिशी तुला या दागिन्यांनी मडवून डोळे भरून बघण्याची माझी लय आस व्हती. पर ते भाग्य मला लाभल न्हाई; पर हरकत न्हाई. आता ते बघायला मिळालं ते लय हाय. हां.."
तेवढ्यात श्याम धाप टाकत घरी आला. दारातून आड डोकावून पाहिले तर समोरचे दृश्य पाहून क्षणभर थबकला आणि नंतर गालात हसत दाराला एका हाताचा टेका देऊन उभा राहिला.
तो वैजयंतीचे बोलणे ऐकत हसत होता.
"इकडे बघ जरा. आहा, दागिन्यांमुळे तुला शोभा आली की तुझ्यामुळे दागिन्यांना शोभा आली तेच समजेना बघ. इतकी नक्षत्रावानी दिसालीस. जरा हात दे बघू. हुं.." वैजयंती दुर्गा हात हातात घेत तिला सोन्याच्या बांगड्या घालत म्हणाली.
"आई, कधी आलीस गं तू?" श्यामने तिला विचारले.
ती तिचा हात धरून त्याच्याकडे न बोलता रागात पाहू लागली.
"काय झालं आई, अजूनही माझ्यावर रागावली आहेस का तू?" त्याने तिचा चेहरा पाहून विचारले.
"तोंड बंद ठिव तुझं. अजिबात बोलू नगोस. आय एकपट तर पोरग दहापट असं ऐकलं होतं. तू माझ्या पोटी जन्माला आलास ते सजा म्हणून, असं वाटू लागलया. काय रं? म्या एक रागाने निघून गेले व्हती. पर तू आला का न्हाईस माझ्याकडं. हातापाया पडून माझी माफी मागून, सूनेचे तोंड बघून जा, आय. असं म्हणायला तोंड शिवलं होतं काय रं तुझं? हां..(दुर्गाच्या हनवुटीला हात लावून प्रेमाने पाहत) इतक्या गाॅड सुनेचं तोंड बघितलं असत तर तवाच इथं म्या आली असती. का आला न्हाईस तू?" वैजयंतीने त्याला खडसावून विचारले.
"साॅरी आई, माझ्याकडून चूक झाली. ते जाऊ दे सोड." तो तिची माफी मागत म्हणाला.
"चूक तुझ्या एकट्याची न्हाई रं, माझीबी चूक व्हती." ती म्हणाली.
"असू दे गं आई, तुझ्या सुनेला घरी आणलेस ना तू आता. दिवसातून तीन-तीन वेळा तिला दागिन्यांनी सजवून पाहत बैस. चल मी निघतो आता." असे म्हणत तो जाऊ लागला.
"ए कुठे चालला हाईस?" तिने आवाज देत थांबवले.
"ड्युटीवर चाललो आहे, आई." तो.
"आरं पर आता दिस मावळला की. तरी बी तुझी डुटी संपली न्हाय व्हयं रं. आता कोणती डुटी हाय तुझी?" तिने कपाळावर आठ्या पाडत विचारले.
"अगं आई, आज नाईट ड्युटी ज्याची आहे तो येणार नाही. मग त्याची ड्युटी माझ्यावर सोपवली आहे." त्याने शांतपणे सांगितले.
"त्यो संन्याशी फादर सांगतो तुला अन् तू बी त्याचं ऐकत बसं. त्याने सांगितले डोरले बांध. म्हणून तर ते बांधलं.. तर समद झालं व्हय रं. त्या परास दुसरं काय सुदिक नसतं व्हय. (थोडी चिडत) हे बघ श्याम, त्या फादरांना सांग की माझ्या आयने सांगितले हाय असं म्हण. अन् राती दहा वाजेपतूर काम संपवून पटाकदिशीना माघारी ये. राती घरी एक लय महत्त्वाचं काम हाय तुझ्याकडं?" ती थोडी नरमाईने मवाळ भाषेत म्हणाली.
दुर्गा चमकून त्या दोघांकडे पाहू लागली.
"असं काय महत्त्वाचं काम आहे, आई?" श्यामने विचारले.
"हाय एक लय महत्त्वाचं काम. तू दहा वाजता ये म्हंजी कळलं तुला?" वैजयंती हसून म्हणाली.
"बरं आई, येतो." असे म्हणत तो निघून गेला.
पण दुर्गाच्या मनात धडकी भरली.
क्रमशः
काय काम असेल वैजयंतीचे श्यामकडे ? दुर्गा का धडकी भरली?
©️ जयश्री शिंदे
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून त्याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फाॅलो करा आणि फाॅलो सेटींग मध्ये जाऊन favorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा