Login

अंत एकाकीपणाचा

अनेक पातळीवर जोडीदाराशिवाय एकाकीपणे लढणाऱ्या प्रत्येक स्त्रियांसाठी हा लेख समर्पित!
       अंत एकाकीपणाचा
स्त्री असो किंवा पुरुष त्या दोघांच्याही आयुष्यात जोडीदार हवाच. आपल्या आयुष्यात कितीही जवळची लांबची नाती असली तरी जोडीदार हा गरजेचाच आहे. प्रेम, लग्न, संसार या गोष्टींना महत्त्व देणाऱ्या कुटुंबात तिचा जन्म झाला. शांत, अबोल व मनमिळाऊ अशी आनंदी!

आनंदीचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले होते आणि ती नोकरीच्या शोधात होती. अशातच तिच्या नात्यातून एका मुलाचे स्थळ तिच्यासाठी समोरून चालून आले. त्यामुळे या मुलाला कांदेपोह्यांच्या कार्यक्रमासाठी बोलावण्याचे तिच्या आई-वडिलांनी ठरवले. आनंदीला लग्न नको हवे होते असे नव्हते पण तिला आणखी शिकून स्वतःचे करिअर घडवायचे होते. तिच्या वडिलांच्या निर्णयापुढे असेही तिचे काही चालणार नव्हतेच. त्यात तिच्या मोठ्या बहिणीने प्रेम विवाह केला होता. त्यामुळे आता जे काही होईल त्याला सामोरे जाण्याचे तिने ठरवले.

दोन दिवसांनी कांदेपोह्यांचा कार्यक्रम ठरवण्यात आला. या सगळ्यात आनंदीला काय हवे हे कोणीही विचारले नाही. त्यामुळे ती आणखीनच दुखावली मात्र चेहऱ्यावर हसू कायम ठेवत ती छान तयार झाली. मुलाकडची मंडळी येण्याची वाट बघत असतानाच ती तिच्या आईला म्हणाली, “इतकी घाई का करताय? मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही. माझं वयही लग्नाचं नाही. लग्न म्हणजे काय हे देखील अजून मला स्पष्ट समजलेले नाही. थोडा वेळ हवा आहे मला.” तिचे हे बोलणे ऐकून आई चिडून “थोडा वेळ दिला तर तुही तुझ्या ताईसारखी थेर करशील आणि लग्नाचे म्हणशील तर जबाबदारी पडली की आपोआप सगळं समजेल तुला. उगाच काहीतरी बोलून मोडता घालू नकोस. मुलगा छान आहे, शिकलेला आहे तेव्हा आता शांत रहा.” असे म्हणते.

आई बाहेरच्या खोलीत निघून गेल्यावर आनंदी आणखीनच अस्वस्थ झाली. तो मुलगा छान आहे असं आई म्हणाली पण खरंच तस असेल का? की पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात जाईन हा विचार मनात येताच तिच्या काळजात धस्स झालं. थोड्या वेळाने पाहुणे आल्याचे तिला कळते. तिची चुलत बहीण आणि मावस बहीण तिच्या खोलीत येतात.
मावस बहीण “अनु, मुलगा खूप देखणा आहे ग! त्याने एमबीएसुद्धा केलं आहे. फक्त स्वतःच घर अजून घेतलं नाहीयेय. म्हणजे त्याच्या आई-वडिलांचे आहे पण त्याचे स्वतःचे नाही असे तो बाहेर म्हणाला. मला तरी त्याच्याकडून पॉझिटिव्ह वाइब्स येत आहेत पण तू विचार करून निर्णय घे. मावशी आणि काकांचं काही ऐकू नकोस. तुझा नकार असेल तर सांग मला मी आईला आणि बाबाला सांगेन बोलायला” तिने असे बोलताच आनंदी आणि तिची चुलत बहीण तिच्याकडे हताश नजरेने पाहतात आणि ती त्यांना डोळ्यानेच धीर देते.

एक दहा मिनिटांनंतर तिची मावशी तिला बाहेर न्यायला येते. ती घाबरतच मुलाकडे एक नजर वर करून पाहते आणि तिचे हार्ट बिट इतके वाढतात की हृदयच हातात येईल की काय असं तिला वाटते. मावस बहिणीने सांगितल्याप्रमाणे मुलगा खरच देखणा होता आणि मुख्य म्हणजे हसतमुख होता. मुलाच्या मामा-मामीने तिला अनेक प्रश्न विचारले. तीही अगदी शांतपणे त्याची विचारपूर्वक उत्तरे देत होती. तिची उत्तरे ऐकून तिला पाहायला आलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू पसरते. थोडावेळाने त्या दोघांना बोलण्यासाठी एका खोलीत पाठवले जाते.

आनंदी काही बोलत नाही हे पाहून तोच समोरून बोलायला सुरुवात करतो.

“नमस्कार, मी अमित लाड.” अमित

“मी आनंदी चव्हाण” आनंदी

“मला तू आवडली आहेस.” त्याने असे बोलताच आनंदी चकित होते. हे लक्षात येताच “मान्य आहे असं पहिल्या भेटीत काही सांगता येणार नाही पण तुझे आई-वडील आपल्याला भेटायला देतील याबाबत मी जरा साशंक आहेच. मात्र एक खात्री नक्की देऊ शकतो तुझी सगळी स्वप्न मी पूर्ण करेन.” असे अमित बोलतो. त्याचे हे आश्वासक बोलणे ऐकून आनंदीला थोडा धीर येतो. “का कुणास ठाऊक तुमच्या बोलण्यावर मला विश्वास ठेवावा वाटतोय पण तरीही मला फक्त एका पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात जायचं नाही हेही तितकंच खरं आहे.” असे ती बोलते. आणखी थोडा वेळ ते दोघे बोलतात आणि त्यांचा होकार कळवतात.

आनंदीचे आई-वडील त्यांच्या मोठ्या मुलीच्या पळून जाऊन लग्न करण्याने इतके नाराज झालेले असतात की त्यांना आनंदीवर आपण आपल्याला हवे तसे वागण्यासाठी दबाव टाकतो आहे हे त्यांच्या लक्षातही येत नाही. तिची आवड-निवड हे असले विचारच त्यांच्या मनात आले नाहीत. दोन्ही कुटुंबाच्या होकारानंतर आनंदीच्या आई-वडिलांनी अगदी दीड महिन्यातच तिचे लग्न लावून दिले होते. या सगळ्यात मात्र अमितने तिची खूप काळजी घेतली होती. तिच्या मनाचा आधी विचार केला होता. त्याला आई-वडील नव्हते. त्याच्या मामा-मामीने त्याला सांभाळलं होतं. आई-वडिलांचे घर आणि संपत्ती असल्याने त्याला आर्थिक अडचण कधी आलीच नाही. त्यामुळे त्याने जेव्हा आनंदीला पुढे शिकवण्याचे ठरवले तेव्हाही तिच्या आई-वडिलांनी आक्षेप घेतला पण याचा निर्णय ठाम होता. आनंदी घर, संसार, नोकरी सांभाळत अभ्यास करत होती आणि तिला तिच्या प्रत्येक गोष्टीत अमित साथ देत होता. काही काळ सरल्यावर संसाराची आणि करिअरची घडी बसवत असतानाच आनंदीने दोन गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला. तिच्या गरोदरपणाच्या काळातही तिने माहेरी जाणे कटाक्षाने टाळले होते. तिच्या मोठ्या बहिणीने आणि अमितच्या मामीने मात्र तिचे सगळे डोहाळे पुरवले होते.

वर्षामागून वर्षे जात होती आणि सगळे छान सुरळीत सुरु आहे असे वाटतानाच नियतीने क्रूर घाला घालावा असे आनंदीच्या बाबतीत घडले. एका अपघातात अमितचा मृत्यू झाला होता. अमितच्या जाण्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पदरात दोन मुली त्यांना कसं वाढवणार यापेक्षा अमितशिवाय कशी राहू हा प्रश्न तिला सतत भेडसावत होता. अमितचे निर्वाणीचे शब्द ऐकून तर तिला आणखीनच हतबल वाटत होते. शेवटच्या क्षणीही माझाच विचार या माणसाने केला. अमितच्या असण्याची तिला इतकी सवय झाली होती की, तो आसपासच आहे असा तिला भास व्हायचा. मात्र जेव्हा तिला वास्तवाचे भान यायचे तेव्हा ती कोलमडून जायची. अशातच तिने दोन ते तीनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिचा मानसिक तोल ढासळतो आहे हे पाहून तिच्या बहिणीने पुढाकार घेत तिला समजावले. “अनु, अमित आपल्याला सोडून गेला आहे आणि आता तुला त्याच्याशिवाय जगायचं आहे हे वास्तव स्वीकारून खंबीरपणे उभी रहा. आम्ही तर आहोतच पण तू स्वतःला तयार कर” ताईचे बोलणे तिच्या कानापर्यंत तर जात होते पण मनात उतरत नव्हते.

अशीच एकट्याने तिने मुलींची आजारपणे काढली. मुलींना पहिल्यांदा पाळी आली आणि मुली मोठ्या झाल्या ही भावना व्यक्त करायला तिच्याजवळ कोणीच नव्हतं. आईजवळ बोलावं तर, आईचे सल्ले आणि उपदेश संपत नव्हते. ताईजवळ बोलायची पण अमितसोबत जे बोलणं व्हायचं त्याची सर कोणत्याच संवादाला नव्हती. समाजाला मात्र तिचा हेवा वाटायचा कारण अमित गेल्यावरही ती फार दिवस दुःख कवटाळून बसली नाही. त्याचे दिवस कार्य झाल्यावर ती लगेचच ऑफिसमध्ये रुजू झाली. लोकांच्या नजरा तिला सगळं काही सांगायच्या पण ती दुर्लक्ष करायची. या गोष्टींनी आताच घाबरून गेलो तर पुढे एकही पाऊल टाकू शकणार नाही आणि त्याहीपेक्षा तिला अमितने तिच्यावर घेतलेली मेहनत वाया घालवायची नव्हती. तिच्या मनात, श्वासात फक्त तोच होता आणि तोच राहणार होता. अमित गेला तेव्हा तिने अगदी धीटपणे गळ्यातलं मंगळसूत्र आणि कपाळावरच कुंकू कुणाला पुसू दिलं नव्हतं. ते तिच्यासाठी संरक्षण होत म्हणून नाही तर, ती अमितला समर्पित होती यासाठी. मात्र यावरूनही तिला नावे ठेवली. तिने हेही सहन केलं कारण हा लढा तिच्या एकटीचा होता.

एके दिवशी तिच्या एका जवळच्या मित्राने तिच्याजवळ शारीरिक सुखाची मागणी केली. त्याची मागणी ऐकून तिला धक्काच बसला. अशा बऱ्याच लोकांचा अनुभव ती घेत होती पण तिचा मित्रही तिच्याबाबत असा विचार करत असेल हे वाटून तिला भडभडून आलं. त्यानतंरच्या कित्येक रात्री आपल्याला अमितचा स्पर्श, त्याची मिठी, एकमेकांच्या ओढीची उत्कटता कधीच अनुभवता येणार नाही या विचाराने तिला झोपच लागली नाही. मनात साचलेले विचार कुणाला सांगूही शकत नव्हती. मुलींच्या दहावीच्या परीक्षेचा ताण असो किंवा त्यांचा महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याचा ताण हा तिला एकटीनेच सहन करण्यावाचून पर्याय नव्हता. मुलीही मोठ्या होत होत्या आणि तितक्याच जबाबदारीमुळे समजूतदारही झाल्या. त्या तिला व ती त्या दोघींना समजून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. अमितनंतर तिने मुलींबाबतच्या कर्तव्यात जराही कसूर केली नाही. ती आणि तिच्या मुली इतकंच तीच जग होतं. तरीही बाहेरच्या जगाला तिचा त्रास होत होता. असंख्य नातेवाइकांसमोर ती एकटी उभी होती आणि तरीही प्रत्येक कसोट्या एकाकीपणे पार करत होती. प्रत्येक सणवाराला अमितच्या आठवणीने डोळे भरून यायचे.

अशीच वर्षांमागून वर्षे सरली आणि ती मुलींच्या लग्नाच्या मागे लागली. मुली मात्र त्यांना घरजावई हवा असा हट्ट धरून बसल्या होत्या. त्यांच्या या अपेक्षेवर समाज त्यांची खिल्ली उडवत होता पण त्या दोघींनी आईचा एकाकीपणा पाहिला होता. आपण गेल्यावर आई आणखी एकटी पडेल या काळजीने त्या अस्वस्थ होत्या आणि म्हणूनच त्यांनी आनंदीचा विरोध असूनही घरजावयाची अट ठेवली होती. त्यांच्या या अटीमागची भावना त्यांच्या मावशीला कळताच ती आनंदीच्या पुनर्विवाहाचा विचार त्यांच्यासमोर मांडते. हा विचार ऐकूनच मुलींची अवस्था मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार अशी होते. सर्वानूमते मावशी आणि अमितची मामीच या विषयासाठी पुढाकार घेणार असे ठरते व त्यांनी हा विषय छेडताच या वयात लग्न करणे म्हणजे समाजाला स्वतःवर हसण्याची आणखी एक संधी दिल्यासारखे आहे हा विचार करून आधी अजिबात तयार नसलेली आनंदी मुलींच्या आनंदासाठी तेही करायला तयार होते आणि तिच्या मुली लागलीच आनंदीसाठी जोडीदार शोधायच्या कामाला लागतात.

कदाचित मुलींची इच्छाशक्ती प्रबळ होती. आनंदी आणि अमितचा एक मित्र बायको गेल्यापासून एकटाच राहत होता आणि मुख्य म्हणजे तोही स्वतःसाठी जोडीदाराच्या शोधात होता. ऐन तरुण वयात बायको गेल्यावर त्याने एकट्यानेच मुलाचा सांभाळ केला आणि त्याचा तोच एकुलता एक मुलगा परदेशात स्थायिक झाला होता. त्याला आनंदीविषयी कळताच तो आनंदी आणि तिच्या कुटुंबाला भेटायला आला. त्याला भेटल्यावर तोही आनंदीला अमितसारखाच वाटला. काही काळ एकमेकांसोबत वेळ घालवून त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. बऱ्याच नातेवाईकांनी नाके मुरडली पण नेहमीप्रमाणेच आनंदी आणि तिच्या मुलींनी सगळ्या समाजाकडे दुर्लक्ष केले. “आम्ही आमच्यासाठी बाबा नाही तर, आईसाठी जोडीदार शोधतो आहोत आणि हे आम्ही आधीच करायला हवं होतं” असे तिच्या मुलींनी नातेवाईकांना आणि खास करून त्यांच्या आजीला ठणकावून सांगितले.

बाई विधवा झाली की समाजाकडून तिला आजही उपेक्षित समजलं जातं आणि तेव्हाच नकळत का होईना काही जुन्या परंपरा पाळल्या जातात. बाई ही सुद्धा माणूस आहे आणि तिलाही भावना आहेत हे समाजाने समजून घेण्याआधी एका बाईनेच समजून घ्यायला हवं आहे तर आणि तरच स्त्रियांबाबत वैचारिक बदल घडून येईल.

प्रणाली प्रेरणा प्रदीप साळुंके.