Login

अंतरमन

मीराच्या मनाची व्यथा सांगणारी प्रेमकथा.
कथेचे नाव:- अंतरमन
विषय:- स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो?
फेरी:-  राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

जसे समुद्र किती खोल आहे ह्याचा अंदाज नुसतं किनाऱ्यावर उभं राहून लावता येत नाही अगदी स्त्रीच्या मनाचं देखील तसंच असतं. तिच्या अथांग मनात कितीतरी तरंग उठत असतात. कधी सैराट वादळं मनात थैमान घालत असतात मात्र तिच्या संथ लाटेसारख्या चेहऱ्यावरून कधी समजून देखील येत नाही नक्की तिच्या मनात काय चाललं आहे? मग असं म्हटलं जातं; "बोलल्या शिवाय कसं समजणार?" मात्र तिच्या अबोल मनाचा ठाव कोणी घेण्याचा प्रयत्न तरी करतं का? स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो?

सध्याची स्त्री संसारात घरासोबत बाहेरच्या गोष्टीची जबाबदारी घेत असते. तिची देखील घरातील व्यक्तींनी आपुलकीने विचारपूस केली पाहिजे. एका स्त्रीला काय हवं असतं? फक्त आपुलकीचे दोन शब्दच आणि मायेने पाठीवर फिरवलेला हात. हो ना? अभ्यास करून पहा. नक्कीच तिला समजणे कठीण जाणार नाही.

मीरा रात्री कितीही उशीराने झोपली तरीही तिला पाचचा गजर होण्याआधीच जाग यायची. माहेरी तिला एक सवय लावली गेली होती. घरातील केरकचरा काढून झाल्यावर अंघोळ केल्याशिवाय कधीच स्वयंपाकघरात प्रवेश करायचा नाही. बालपणीच आईने मनावर एक संस्कार कोरला होता. ती म्हणायची,"आपण देवघरात अंघोळ केल्याशिवाय प्रवेश करतो का? नाही ना? स्वयंपाकघरात देखील अन्नपूर्णा मातेचे वास्तव्य असते. मग तिथले ही पावित्र्य जपले गेले पाहिजे की नाही?"

सहा वाजले की, सगळे हळू हळू उठायला सुरुवात व्हायची.

"मीराऽ आमचा बिना साखरेचा चहा झाला का गं?" सासूबाई बेडरूम बाहेर येऊन म्हणायच्या.

"पाच मिनिटात देते आईऽ." वाफाळलेला बिना साखरेच्या चहाचे दोन कप घेऊन मीरा सासूबाईंच्या बेडरूममध्ये जायची.

"आज नाश्ताला काय बनवणार आहेस?" सासूबाईंचा रोजचा ठरलेला प्रश्न.

मीराचे देखील उत्तर ठरलेले असायचे."तुम्ही सांगा काय बनवू?" सासूबाईंच्या आवडीनुसार नाश्ता बनवला जाई. दुपारच्या जेवणाचे मेनू आदल्या रात्रीच ठरवले जात असे त्यामुळे मीरा रात्रीच कडधान्य भिजवून ठेवायची किंवा कधी एखादी भाजी चिरून ठेवायची. नाश्ता बनवून झाला की, दुपारचे जेवण मीरा तेव्हाच करून घ्यायची कारण मिहिरला; तिच्या पतीला टिफीनबॉक्स द्यायचा असायचा. तो तयारी करून बाहेर येण्या अगोदर ती डायनिंग टेबलवर चहा व नाश्ता तयार ठेवायची. तो नाश्ता करायला बसला की, त्याचा टिफीनबॉक्स, पाण्याची बॉटल आणि सुका खाऊ बॅगमध्ये भरून ठेवायची.

मिहिर घराबाहेर पडल्यावर सासूबाई तिला नाश्त्यासाठी आवाज द्यायच्या. सासू व सासरे दोघांचा नाश्ता ती डायनिंग टेबलवर लावायची. नाश्ता झाला की, सासू - सासरे रोज सकाळी ९ वाजता देवळात जाण्यासाठी घरातून बाहेर पडायचे. ते दुपारी बाराच्या अगोदर घरी परतायचे.

सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मीरा वर्क फॉर्म होम कॉम्प्युटरवर करत बसायची. मात्र ऑफिसची कामं करताना अधुन - मधुन ती घरातील इतर कामं देखील आटपायची. पहाटे पाच वाजता उठलेली मीरा दुपारच्या सुमारास उरलेला नाश्ता व चहा करून घ्यायची. त्यामुळे दुपारी जेवणाच्या वेळेस तिला भुक लागायची नाही. दुपारी शक्यतो तिचा उपवासच घडायचा.

सासू बाई दुपारचे जेवण तेवढं काय ते घेण्यासाठी स्वयंपाकघरात यायच्या. "अगं! जेवलीस का? जेवून घे. ऑफिसची कामे होतच राहतील." असं म्हणत दोघांची दोन पानं घेऊन जायच्या. जेवून झाल्यावर तेवढं ताट घासून ठेवायच्या आणि दुपारची निद्रा घेण्यासाठी सज्ज व्हायच्या.

पण कधी म्हणाल्या नाही. "मी देऊ का वाढुन?" अश्या वेळी तिला आईची आठवण यायची. कामावरून आल्यावर फ्रेश झाल्यावर आयातं ताट हातात असायचं. छान गरम गरम पंच पक्वांनानी भरलेलं असं आणि आता स्वतःच्या हाताने जेवण बनवूनसुद्धा खाण्याची इच्छा मनापासून बिलकुल होत नाही.

एकदा कोणी पाहुणे आले होते. मीराने केलेला पाहुणचार पाहून त्यांनी तिची वाहवा केली. तेव्हा सासुबाई हसतच बोलून गेल्या,"तीचे वर्क फ्रॉम होम आहे म्हणून. ती घरात नसती तर मलाच करणे भाग होते. शिवाय सून येण्याच्या अगोदर एवढी वर्ष संसाराचा गाडा मीच ओढला बरं. आता तीच जबाबदारी सुनेस देऊन मोकळी झाले एकदाची."

त्यावेळी मीराला खूपच वाईट वाटलं होतं. अरेंज मॅरेज त्यात लग्नाला एक वर्ष देखील झाले नव्हते. तरीही लवकरच तिने घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या भर लॉकडाऊनमध्ये सांभाळून घेतल्या होत्या. तरी मिहिर एका शब्दाने तिच्या बाजूने बोलला नव्हता. बघायला गेलं तर दोघांत बोलभाषा मोजक्याच शब्दांची असायची. कारण मिहिर डॉक्टर असल्यामुळे कधी कधी तर चोवीस तास देखील ड्युटी करून घरी परतायचा. नवीन लग्न झालेले असून देखील तो रुग्ण सेवेत त्याचे कर्तव्य बजावत होता. मीराला त्यांचा खूप हेवा वाटत होता.

आईने दिलेली शिकवण तिच्या लक्षात होती. "प्रसंगावर मात करून पुढे चालत राहायचे असते. आपल्या कामात आपण चोख राहून समोरच्या व्यक्तीचे मन जिंकायचे असते. सगळे दिवस सारखेच नसतात. चांगले दिवस येतातच."

दरवर्षी प्रमाणे त्यांच्या घरी श्रावणी सोमवारची पूजा होणार होती. सासूबाईंनी यंदाच्या वर्षीपासून नवीन वधु - वर ह्यांना पुजेस बसण्याची आज्ञा दिली. रविवारी मीरा व मिहिर दोघं बाजारात सामान खरेदी करण्यासाठी एकत्र गेले. पूजेसाठी लागणारं सगळं सामान दोघांनी मिळून घेतलं आणि घरी आले. लग्नानंतर ते पहिल्यांदाच शॉपिंगसाठी बाहेर पडले होते. कारण लॉकडाऊनमुळे त्यांना एकत्र कुठेच जाताच आले नव्हते.

श्रावणी सोमवारी सूर्यनारायण सोनेरी पहाट घेऊन आले. नित्य नियमाप्रमाणे मीरा उठली. गुरुजी सकाळी दहा वाजता येणार होते म्हणून तिने लवकर तयारी करायला घेतली. खणाची हिरवी साडी, नाकात नथ, डोळ्यांत काजळ, कपाळावर चंद्रकोर, कानात मोत्यांच्या कुड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि कोल्हापुरी साज, हातात हिरवा चुडा आणि केसाची सागरवेणी त्यात माळलेला मोगऱ्याचा गजरा आणि हलका मेकअप करून ती छान तयार झाली होती. लग्नानंतर ती आज नटली होती. तिने मिहिरकडे एक नजर टाकली पण तो तिच्या नटलेल्या सौंदर्याकडे पाहून एकही शब्द बोलला नाही तर मिश्किल हसत बाहेर निघून गेला.

\"अरे! ही काय पद्धत झाली? निदान स्तुती नको सुंदर हा एक शब्द देखील बोलू शकत नाही का?.\" तिला खुप राग आला होता.

ती आरश्यासमोर उभी राहिली आणि मनातच म्हणाली, \"कसं आवरू स्वतःला?\" तिच्या मनाने तिला उत्तर दिलं; \"जशी आई स्वतःला आवरायची.\" तिला आईचे शब्द आठवले,"आपण त्यांच्या घरी आलो आहोत. त्यामुळे आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी सहन करणे भाग आहे."

आईचे शब्द आठवून ती पुन्हा मनातच बोलू लागली; \"आई इतकी मी सात्विक नाही. माहेरी राग आल्यावर फणा उभा करणारी मी आणि आता एवढं सहन करण्याची शक्ती येते तरी कुठून? कदाचित आईने दिलेले संस्काराचे बाळकडू घेऊन नम्र झाले.\"

लगेचच स्वतःला सावरत ती बाहेर आली. मिहिर चौरंगाला केळीचे खांब जोडत होता. सासरे त्याला मदत करत होते. सासूबाई प्रसाद आणि नैवेद्याच्या तयारीला लागल्या होत्या. स्वयंपाकात मीराने बऱ्यापैकी तशी तयारी करूनच ठेवलेली होती. तेवढं फक्त फोडणी देण्याचे काम सासूबाई करणार होत्या. मीराने दारापुढे रांगोळी काढून दिवे लावले. देवघर फुलांनी सजवलं.

गुरुजी आल्यावर देवघरातील देवांचे व मोठ्याचे आशीर्वाद घेऊन जोड्याने सत्यनारायणाची पूजा बारा वाजता संपन्न झाली. देवाला नैवेद्य अर्पण करून झाल्यावर सासू सासरे आणि चार पाहुणे मंडळी ह्यांना मीराने जेवण वाढले. मिहिर तिच्यासाठी थांबतो म्हणाला इतक्यात मीराला थोडं चक्कर आल्यासारखे वाटायला लागले. सासूबाईंची परवानगी घेऊन ती रूममध्ये गेली. डोळे बंद केल्यावर तिच्या डोळ्यातून पाणी घळघळ वाहत होते. कोरोना संकट थैमान घालत होते. त्यामुळे सासूबाईंनी कुणालाच आमंत्रण देऊ नये असे सांगितले होते. अगदी मीराच्या माहेरीसुद्धा! ती पहिल्यांदा पूजेला बसली आणि माहेरची माणसं डोळ्या पुढे नाही म्हणून तिला खुप वाईट वाटलं होतं.

इतक्यात मिहिर पंचपक्वांनाचे भरलेले ताट घेऊन रूममध्ये आला, "सुंदर डोळ्यांत हे अश्रू शोभा देत नाही. बघ! रडून तुझा मेकअप खराब झाला. जा चेहरा धुऊन ये." तो म्हणाला.

ती उठली आणि चेहरा धुऊन आली. पुरणपोळीचा घास भरवत तो तिला म्हणाला,"आपल्या चौकोनी कुटुंबासाठी दिवसभर तू मेहनत घेणारी, गरम स्वादिष्ट पदार्थ सगळ्यांना वाढतेस स्वतः मात्र थंड जेवतेस. स्वतःच्या तब्येतीला देखील जप जरा. आज घरात सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली. मखर सजलेले दिसते आहे. उद्या सकाळपर्यंत सगळी फुले कोमेजुन जातील. सगळ्या वस्तु तिकडून काढल्या जातील पण माझ्या मनाचा मखर तुझ्या स्थानाचे कायम पूजन करीत राहील. माझ्या आयुष्यात तुझ्या सुंदरतेची कुपी अखंड दरवळ देईल. आपल्या संसारातील चौरंग एकमेकांच्या साथीने कायम स्थिर असेल." तो खूप मनापासून बोलत होता आणि मीरा अगदी भान हरपून त्याचं बोलणं ऐकत होती.

श्रावणी सोमवार तिला सरप्राइज देऊन गेला होता. मिहिरने तिच्या अंतरमनावर प्रेमाचा शिडकाव केला होता. मनावर केवढी मोठी मरगळ आली होती ती बाजूला होऊन प्रेमाची लाली तिच्या गालावर पसरली होती आणि डोळ्यातील आनंदाश्रु सर्व काही बोलून जात होते.

समाप्त
©®नमिता धिरज तांडेल.
जिल्हा पालघर