अंतिम मुदत : भाग १

एक रहस्यमय कथा!
संध्याकाळचे सात वाजत आले होते तरीही त्या अंधाराने संपूर्ण वातावरणाला जणू गिळंकृत केले होते. नाही ती अमावस्येची रात्र नव्हती मुळीच पण आज त्या आकाशाला काहीतरी सांगायचं होतं जणू. भर उन्हाळ्यातही विजांच्या कर्कश आवाजाने एक आरोळी ठोकली तसा स्वतःच्या ऑफिसमध्ये काम करत बसलेला अभय जरासा दचकला.

'हे कायं भर उन्हाळ्यात आता पाऊस पडणार का?' अभयने खिडकीचा पडदा दूर सारून हळूच बाहेर डोकावले तसा अभय मनाशीच खुदकन हसला इतक्यात वार्‍याची एक थंड झुळूक त्याच्या सर्वांगाला स्पर्शून गेली आणि त्याच्या अंगावर एक शहारा आला.

'आज वातावरण काहीतरी वेगळंच दिसतयं. घरी लवकर जायला हवे बाबा नाहीतर नेमका हा पाऊस मला रस्त्यात गाठायचा आणि उशीर झाला तर वीणाचा राग सहन करावा लागेल. असेही आज फार काम करायची इच्छाही होत नाहीये त्यापेक्षा लवकर घरी गेलेले बरे तेवढेच बायको खूश होईल.' स्वतःच्या विचारांवर शिक्कामोर्तब करून अभयने घरी जायचे ठरवले आणि इतक्यात लाईट्स गेले.

'घ्या अजून पाऊस सुरू देखील झाला नाही तोपर्यंत लाईट्स गेले देखील खरंच अवघड आहे. जाऊ दे बाबा आता या अंधारात त्या मोबाईलच्या टॉर्चमध्ये काही आवराआवर जमणार नाही आपल्याला त्यापेक्षा घरी गेलेले बरे.' स्वतःशीच बडबडतं अभयने टॉर्चच्या सहाय्याने स्वीच ऑफ केले आणि तो खिडकीचे दार बंद करायला लागला इतक्यात वार्‍याने वेग वाढवला आणि दोन्ही बंद असलेली दारे अचानक पुन्हा उघडली गेली. अभय पुन्हा खिडकीचे दार बंद करण्यासाठी पुढे सरसावला तेव्हा त्याला समोरच्या इमारतीमध्ये किंचितसा पिवळा प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशात एक अस्पष्ट आकृती दिसायला लागली.

'हे कायं ती इमारत तर केले कित्येक दिवस पडीक आहे, त्या इमारतीचे बांधकाम अर्धवट आहे अजून पूर्ण देखील झालेले नाही मगं आत्ता तिथे कोणं बरं असेल तेही या अशावेळी?' अभयच्या मनांत कुतूहल निर्माण झाले तसे क्षणाचाही विलंब न करता अभयने खिडकी बंद केली आणि ऑफिसला लॉक लावून पुढच्या पाच मिनिटांत अभय खाली उतरला आणि त्याच्या ऑफिसच्या
समोर असलेल्या इमारतीकडे एकटक पहायला लागला. एरवी बांधकामामुळे नकोशी वाटणारी, धुळीने माखलेली ती इमारत आज या रात्रीत काहीशी वेगळी आणि हवीहवीशी का वाटायला लागली आहे याचे गूढ मात्र अभयला उलगडतं नव्हते. अभयने मान उंचावून त्या इमारतीकडे पाहिले तेव्हा मगाशी अस्पष्ट वाटतं असलेली ती आकृती एका स्त्रीची आहे हे कळायला त्याला वेळ लागला नाही.

इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर ती स्त्री अगदी टोकावर उभी राहून वर आकाशाकडे एकटक पाहत होती.

'कोणं आहे ती? इतक्या रात्री तिथे उभी राहून कायं करतेयं? इतका वारा सुटला आहे चुकून तोल गेला तरऽऽऽ' अभयच्या मनाला विचार शिवला तसा तो धावतच त्या इमारतीमध्ये शिरला.

इतकावेळ शांत असलेले ढग आता पुन्हा आक्रोश करायला लागले आणि सोसाट्याच्या वार्‍यासह तिथे मुसळधार पावसाला सुरूवात झाली .

'टकऽऽ टकऽऽ' प्रत्येक पायरी चढताना अभयच्या बुटांचा होणारा आवाजाने वातावरणात भय निर्माण करत होतं. चढताना अभयच्या वाटेत कुठेतरी एखादे लाकूड वगैरे येत होते पण अभय सगळे बाजूला करत भराभर जिने चढायला लागला.

अभय शेवटच्या मजल्यावर पोहचला तेव्हा त्याला त्या स्त्रीची देहाकृती स्पष्ट दिसायला लागली. पाठीवर रूळणारे केस वार्‍यासह हेलकावे घेत होते आणि तिची ओढणी तिथेच खाली पडली होती पण देह मात्र अगदीच निश्चल.

"कोणं आहे तिकडे?" अभयने विचारले आणि तिथे असणारा तो पिवळा प्रकाश अचानक गायब झाला तसा अभय दोन पाऊले मागे सरकला.
नावाप्रमाणे भय नव्हतेच मुळी त्याला कुठल्याही गोष्टींचे. कॉलेजपासून अगदी भिडस्त स्वभाव म्हणून तर या एवढ्या भयानक मुसळधार पावसांत त्या बंद इमारतीत शिरण्याचे त्याने धाडस केले होते पण आता मात्र त्याच्या चेहऱ्यावर किंचित आठ्यांचे जाळे निर्माण झाले होते.

"कोणं आहे? मॅडम एवढ्या रात्री काय करताय तुम्ही तिथे?" अभयने पुन्हा एकदा विचारले.

उरलासुरला प्रकाश ही नाहीसा झाला त्यामुळे आता सोबतीला फक्त काळाकुट्ट अंधार आणि गडगडाटणार्‍या वीजा तरीही अभयने पुन्हा विचारायची हिम्मत केली आणि आकाशात एक लख्ख वीज कडाडली तेव्हा त्या विजांच्या प्रकाशात अभयला हळू हळू चेहरा दिसायला लागला. अभयचा आवाज ऐकून त्या स्त्रीने मागे वळून पाहिले आणि त्या प्रकाशात अभयने तिचा चेहरा पाहिला तेव्हा ती एक पंचवीस वर्षांची तरूणी आहे हे अभयच्या लक्षात आले.

गोरा वर्ण.. मध्यम बांधा असलेली ती तरूणी निर्विकारपणे उभी होती पण तिचे दोन्ही डोळे मात्र अभयवर रोखले गेले होते. ते घारे निळेशार डोळे अगोदर कुठेतरी पाहिल्यासारखे अभयला भास झाला. तिची नजर मात्र अजूनही अभयवर होती आणि हे पाहून त्याचा श्वास रोखला गेला.

"कोणं आहेस तू?" अभयने जरा चाचरतचं विचारले.

"मीऽऽऽ अनामिका" एक गोड आवाज त्याच्या कानापर्यंत ऐकू आला तशी अभयच्या सर्वांगातून एक लहर उठली आणि त्या टीप टीप बरसणार्‍या पावसांत ही त्याच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा व्हायला लागले.

क्रमशः

कोणं आहे ही अनामिका? ती एवढ्या रात्री त्या इमारतीमध्ये कायं बरं करत असेल? अभयसोबत हे रहस्य तुम्हाला ही जाणून घ्यायचे असेल तर कथेचा पुढचा भाग नक्की वाचा

©®ऋतुजा कुलकर्णी

🎭 Series Post

View all