अंतिम मुदत : भाग ३ (अंतिम भाग)

एक रहस्यमय कथा!
अभयने भीतीने हात मागे घेतला तसा इतकावेळ सुंदर वाटणारा तिचा चेहरा ठिकठिकाणी जखमांनी भरलेला दिसला. तिच्या गालांवर काही रक्ताचे थेंब होते जे वाळून गेले होते आणि वार्‍याच्या लकेरींसोबत हेलकावे घेणारे तिचे केस आता अधिकचं भयानक वाटू लागले.

पावसाने चांगलाच वेग धरला. त्या शांततेत ती पावसाची सर देखील भयानक वाटू लागली. अभयची चांगलीच बोबडीच वळली. तो मागे मागे सरकायला लागला.

"थांबऽऽ" अनामिकेचा आवाज त्या आसमंतात गुंजायला लागला आणि अभयची पाऊले जागीच खिळून राहिली कोणीतरी घट्ट पकडून ठेवल्यासारखी.

"मला न्याय मिळवून दिल्याशिवाय तू कुठेही जाऊ शकतं नाही. माझ्यावर बलात्कार झाला, माझ्या शरीराचे लचके तोडले गेले. कायं चूक होती माझी? मला नकार देण्याचा पूर्ण अधिकार होता एक व्यक्ती म्हणून पण कोणाच्या तरी पुरूषी अहंकारामुळे माझं जीवन एका क्षणांत उद्ध्वस्त झालं.

आयुष्यात खूप स्वप्ने होती माझी माझ्यासाठी अशी पण त्या घटनेने माझ्या मनावर खोलं आघात केला तरीही मला न्याय हवा होता. पोलीस, कोर्ट कचेरी यांच्या रोज पायर्‍या चढत गेले पण शेवटी पुराव्याअभावी त्या नराधमांची सुटका झाली त्या न्याय देवतेच्या मंदिरात. शिक्षा मात्र मला आणि माझ्या कुटुंबाला मिळाली. अन्याय तर झालाच होता माझ्यावर पण झालेल्या बदनामीमुळे माझी आई इतकी नैराश्यात गेली की स्वयंपाक करता करता तिच्या साडीने कधी पेट घेतला हे तिलाही कळले नाही. डोळ्यांसमोर माझ्या आईच्या शरीराची राख होताना मी पाहत राहिले पण तिला वाचवू शकले नाही.

आईचे अकस्मात जाणे वडिलांना सहन झाले नाही आणि तिच्या पाठोपाठच हार्ट अ‍ॅटॅकचे निमित्त होऊन तेही मला एकटीला सोडून गेले.
एकदा बलात्कार झालेली मुलगी सगळ्या समाजासाठी सहानुभूतीचा विषय ठरते फक्त. समाजातील पुरूषांसाठी मात्र ती त्यांची वासनेची भूक भागवणारी हक्काची प्रॉपटी असते. नकोसे वाटतात ते वासनांध डोळे. जीव गुदमरायला लागला आहे.

मला आत्महत्या शिवाय कुठलाच पर्याय नाही पण मला न्याय हवा आहे. मला माझ्या उद्ध्वस्त आयुष्याचा प्रतिशोध घ्यायचा आहे." अनामिकाचा चेहरा आता अधिकचं भेसूर वाटायला लागला. अभयचे शरीर थरथरू लागले आणि इतक्यात त्याच्या समोरून अनामिकेने इमारतीच्या कड्यावरून स्वतःला झोकून दिले.

" अनामिकाऽऽ" अभयच्या तोंडातून एक आर्त किंकाळी बाहेर पडली. तो कसाबसा स्वतःला सावरत उठला आणि खाली वाकून पाहू लागला पण खाली काहीच दिसत नव्हते आता मात्र अभय चांगलाच गांगरून गेला.
तो मागे वळला तर अनामिका त्याच्यासमोर उभी पूर्ववत. यावेळी ना तिच्या चेहर्‍यावर कुठलीही जखम होती ना कुठले रक्त.

"कं.. कोणं.. कोणं आहेस तू? का मागे लागली आहेस माझ्या? " बोलताना अभयची जीभ वळत नव्हती.

" अभय मी अडकली आहे गेल्या सहा महिन्यांपासून फक्त तुझ्यामुळे. मला मुक्तता हवी आहे आता या सगळ्यापासून आणि माझी मुक्तता फक्त तुच करू शकतोस कारण माझ्या आत्महत्येला तू जबाबदार आहेस. अशाच एका रात्री या अशाच इमारतीवरून मी जीव दिला पण तुला आता न्याय मिळवून द्यायचा आहे मला.

अभय मला मुक्त करं.. मुक्त करं मलाऽऽ " अनामिकाची नजर अभयवर रोखली होती.

" अनामिका मी नाही केलं काहीऽऽऽ... मी जबाबदार नाही तुझ्या आत्महत्येला.. मला सोडऽऽऽ घरी जाऊ दे मला प्लीज " अभय घामाने डबडबला होता.

" अभयऽऽ उठं नाऽऽ कायं होतं आहे तुला? " अभयला त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला त्याने पाहिले तर त्याची बायको वीणा समोर उभी होती. अभयने आजूबाजूला नजर वळवली तर त्याला कुठेही ती इमारत दिसतं नव्हती आणि अनामिका सुद्धा.

"ती इमारत कुठे आहे? अनामिका कुठे गेली? " अभयने पुन्हा एकदा नजर वळवली सगळीकडे तर तो त्याच्या घरात आहे असे जाणवले.

"अभय अरे कायं चाललंय तुझं? किती घाम आला आहे बघ एकदा."

" रात्र.. ती इमारत.. मला भेटलेली ती अनामिका...कुठे आहे? मी इथे कसा आलो? पाऊस थांबला का? " अभय वीणाकडे प्रश्नार्थक नजरेने पहायला लागला.

" अभय प्लीज भानावर ये. तू तुझ्या घरात आहेस आणि कुठला पाऊस पडत नाहीये अरे आत्ता दुपार आहे. आत्ताच काही वेळापूर्वी जेवण करून तू तुझ्या ऑफिस रूममध्ये गेला होतास ना मगं लगेच कशी रात्र होईल?

अभय मला माहित आहे सहा महिने झाले उद्या डेडलाईन आहे पण होईल काहीतरी. अजून वेळ आहे. अनामिका फक्त एक पात्र आहे तुझ्या कथेतील. तू लिहिलेले 'प्रतिशोध', ही कथा वाचकांना इतकी आवडली आहे आणि त्यामुळेच या दुसर्‍या पर्वाची सगळे वाट पाहत आहेत.
पहिल्या पर्वात अनामिकाने आत्महत्या केलेला प्रवास तू दाखवलास.
आता तुला त्याचं ताकदीने तिच्या आत्म्याने स्वतःच्या अन्यायाचा घेतलेला प्रतिशोध दाखवायचा आहे आणि तुला जमेल ते. रिलॅक्स हो तू जरा.

अनामिका फक्त तू लिहित असलेल्या भयकथेतील एक पात्र आहे कुठलीही व्यक्ती नाही शांत होऽऽ अभय. तू गेले सहा महिने फक्त आणि फक्त कथेच्या विचारात आहेस त्यामुळे तुला भास झाला असेल अनामिका भेटल्याचा बाकी काही नाही. मी कॉफी घेऊन येते तुझ्यासाठी " असे म्हणतं वीणा त्याच्या हातात कोरे कागद आणि पेन देऊन गेली.

अभय त्या कोर्‍या कागदांकडे पहायला लागला.
'नाही हा भास नव्हता' अभय स्वतःशीच पुटपुटला.

'अभय मला तूर तुझ्या लेखणीतून साकारले आहेस पण सहा महिने माझा आत्मा या अपूर्ण कथेत अडकला आहे. कथा पूर्ण करं मला मुक्ती दे अभय' अभयच्या कानांत आवाज आला आणि इतक्यात बाहेर एक वीज कडाडली.

हा भास नव्हता. स्वतःच्या लेखणीतून साकारलेले एक पात्र त्याच्याशी बोलत होते यावर अभयला विश्वास ठेवणे जड चालले होते कारण अकल्पनीय अशी घटना त्याच्या आयुष्यात घडली होती.

*****

मध्यरात्री अडीच वाजता लख्ख वीजांसह मुसळधार पाऊस बरसत होता. अभयने कागदावर समाप्त असे लिहून त्याखाली लेखक ब्लॅक डेव्हिल असे लिहिले आणि टेबलवरचा दिवा विझवून तो खुर्चीवरून उठला तेव्हा खिडकीतून त्या वीजांच्या प्रकाशात एक आकृती त्याच्याकडे पाहून हसत पावसात विरघळून जाताना दिसली.