Login

अंतरीच्या यातना भाग ११( अंतिम)

संघर्षगाथा एका पुरुषाची
अंतरीच्या यातना भाग ११(अंतिम)

मागील भागाचा सारांश: सारिकाने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने अनुजसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. चिठ्ठीमध्ये सारिकाने तिच्या आयुष्यातील सिक्रेट तिने लिहिले होते.

आता बघूया पुढे…..

अनुज कोर्टाबाहेर बसलेला होता, त्याच्या मनात एकाचवेळी असंख्य विचार सुरु होते. केसचा निकाल आपल्या बाजूने लागला पाहिजे, म्हणून तो देवाकडे प्रार्थना करत होता. अनुज त्याच्या विचारात दंग होता, तेवढ्यात त्याला एका लहान मुलीचा आवाज आला, म्हणून त्याने आवाजाच्या दिशेने बघितले. ती लहान मुलगी येऊन अनुजला बिलगली.

"पप्पा मला तुमची खूप आठवण येते. तुम्ही आमच्यासोबत राहत का नाही? प्लिज पप्पा घरी या ना."

अनुज यावर काही बोलणार इतक्यात त्या मुलीला एका बाईने अनुज जवळून एका बाईने खेचून बाजूला केले.

निकम वकील अनुजजवळ येऊन म्हणाले,
"आपल्याला आतमध्ये बोलावलं आहे. चला."

अनुज कोर्टात जाऊन बसला. जज आल्यावर कोर्टात उपस्थित असणारे सर्वजण उभे राहिले. जजने वकिलांना सुनावणी सुरु करण्याचे आदेश दिले. निकम वकिलांनी आपली बाजू मांडली. विरोधी पक्षाच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली. अनुज आपल्या जागेवरुन उठून म्हणाला,
"जज साहेब मला थोडं बोलायचं आहे, मी बोलू शकतो का?"

"मि. अनुज विटनेस बॉक्समध्ये येऊन तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता." जजने सांगितले.

अनुजने विटनेस बॉक्समध्ये जाऊन बोलायला सुरुवात केली,
"मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली, त्यासाठी मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. माझ्या वकिलांनी आणि विरोधी वकिलांनी त्यांची बाजू मांडली. मी बाप म्हणून किती नालायक आहे, हे विरोधी पक्षातील वकिलांनी मांडले. दोन्ही वकील जे बोलले, ते त्यांचं काम होतं. या सगळ्यात मी, माझी मुलगी ओवी आणि माझी बायको स्मिता आमची मानसिक व भावनिक फरफट झाली आहे. आता तुम्ही म्हणाल की, तुम्ही कोर्टापर्यंत आलात म्हणून हा खटला सुरु झाला आहे. आमच्यात झालेल्या थोड्याफार गैरसमजांमुळे आम्ही इथपर्यंत आलो आहोत.

जज साहेबांनी निकाल लावण्यापूर्वी माझे म्हणणे नीट ऐकून घ्यावे आणि ह्या सगळ्याचा विचार करुन निकाल द्यावा. आपला कायदा स्त्रीच्या बाजूने झुकलेला असल्याने ओवीची कस्टडी स्मितालाच मिळेल, असं मला वाटतंय. शेवटी आई जे आपल्या मुलीला प्रेम देऊ शकते, ते बाप देऊ शकत नाही, असा गोड गैरसमज आपल्यामध्ये निर्माण झाला आहे. 

मी दहा वर्षांचा असताना माझे बाबा हे जग सोडून गेले आणि माझं जगचं बदललं. मला आणि आईला गाव सोडून मुंबईला मामाकडे रहायला यायला लागलं. मामीला आम्ही त्यांच्याकडे राहिलेलं आवडत नसल्याने ती सतत मला व आईला धुसफूस करत होती. काही दिवसांनी आम्ही दुसरीकडे एका छोट्याशा घरात रहायला गेलो. आई छोटं मोठं काम करुन आमचा उदरनिर्वाह त्यावर भागवत होती. प्रिया मावशी व मनोज काकांच्या मदतीने मी गुरुकुलमध्ये शिक्षणासाठी गेलो आणि आई पुण्यात गेली. हळूहळू आमची आर्थिक परिस्थिती सुधारत होती. आईला चांगली नोकरी मिळाली होती. मी अकरावीत असताना माझ्या आईची मानसिक स्थिती बिघडली होती आणि त्यातचं तिने आत्महत्या केली.

आईने आत्महत्या करण्यामागील खरे कारण मला समजल्यावर माझ्या पायाखालची जमिनचं सरकली होती, ते कारण मी इथे सांगू शकणार नाही. मला आई व वडील या दोघांचे प्रेम कधी मिळालेच नाही. प्रिया मावशी व मनोज काका सोडून माझ्याजवळील व्यक्ती कोणीच नाही. 

स्मिता माझ्या आयुष्यात आल्यावर मला वाटले होते की, आता ही जर माझ्या आयुष्यात असेल तर मी कधीच दुःखी होणार नाही. माझ्या आई वडिलांना गमावल्यामुळे मी स्मिताची अधिक काळजी घेऊ लागलो होतो. स्मिताची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेणे आणि तिच्यावर अतिप्रेम करणेच तिला आवडले नाही. 

मी कदाचित जास्तही केले असेल, पण त्यावर घटस्फोट हा पर्याय नसू शकतो ना? स्मिताने माझ्या आयुष्यातून निघून जायचा निर्णय घेतला. मी तिच्या निर्णयाचा आदर करुन तिला घटस्फोटही दिला. आता ओवीच्या कस्टडीचा खटला सुरु झाला. ओवी माझीही मुलगी आहे, मग मी तिला सांभाळू का शकत नाही?

ओवीवर जितका अधिकार स्मिताचा आहे, तेवढाच अधिकार माझा सुद्धा आहे. मी आधीच सगळ्यांना गमावले आहे, आता मला ओवीला गमवायचे नाहीये. मला माझी मुलगी माझ्याजवळ हवी आहे. 

स्त्री जशी पटकन डोळ्यातील अश्रू दाखवू शकते, तसं पुरुषाला जमत नाही. पुरुष रडत नाही, म्हणून त्याला काही यातनाचं होत नाही, असं म्हणता येणार नाही. पुरुषाच्या अंतरीच्या यातना कोणीतरी समजून घेईल का? त्यालाही मन असतं आणि त्या मनाला वेदनाही होतात."

अनुजच्या डोळ्यात पाणी होतेच, शिवाय कोर्टात जमलेल्या लोकांच्या डोळयात सुद्धा पाणी आले होते. स्मिता आपले अश्रू लपवू शकली नाही. कोर्टाचा निकाल स्मिताच्याच बाजूने लागला, कारण ओवी अजून लहान होती आणि तिला तिच्या आईची गरज जास्त होती.

स्मिताने अनुजला ओवीला भेटण्याची परवानगी दिली होती. अनुज व स्मिता ओवीला रविवारी बाहेर पार्कमध्ये फिरायला घेऊन जायचे. अनुज व स्मिताच्या भेटी ओवीमुळे वाढल्या होत्या. अनुजपासून दूर राहिल्याने स्मिताला त्याच्या असण्याची किंमत कळाली होती. 

दोन वर्षांनंतर स्मिताने अनुजसोबत पुन्हा लग्न करण्याचे ठरवले. अनुजच्या आयुष्यात आता त्याच्या जवळील माणसं आहेत. अनुज व स्मिताला आपापल्या चुका समजल्या होत्या आणि त्यांनी त्या चुका सुधारुन नवीन आयुष्याला सुरुवात केली.

मी आजवर अनेक कथा लिहिल्या, पण त्यात जवळपास स्त्रीचा संघर्ष, तिच्या मनातील यातना हेच दाखवलं. या कथेत मात्र एका पुरुषाचा संघर्ष व त्याच्या मनातील यातना दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माझी ही कथा कशी वाटली? हे कमेंट करुन नक्कीच कळवा.

समाप्त.