#अनुभव
माझ्या लग्नापूर्वी मी सांगलीला एका ठिकाणी जॉब करत होते. तेव्हा मी माझ्या कामात व्यस्त असताना अचानक मला एक फोन आला, “हॅलो, वनिता मॅडम बोलताय का?”
मी म्हणाले, “हो.. मी वनिता बोलते, आपण कोण?”
समोरची लेडीज अगदी कळवळून म्हणाली, “अहो वनिता मॅडम, मी कोल्हापूर सिटी हॉस्पिटल मधून नर्स बोलतेय. अनिता नावाची तुमची बहीण आहे ना?,
मी म्हणाले, “हो.. आहे माझी बहिण. का ओ?...काय झालं?”
“अहो… तुमची बहीण खूप सिरियस आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे हॉस्पिटलमध्ये या. तिच्याजवळ कुणीच नाही. तिची कंडीशन खूप क्रिटिकल आहे.”
नर्सचे ते बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. एकाएकी काय झालं असेल या काळजीने मन सुन्न झालेले. ताबडतोब मी कोल्हापूरला सरकारी दवाखान्यात पोहोचले.
तिकडे गेल्यावर पाहते तर काय माझी बहीण बेडवर झोपून होती. तिची दयनीय अवस्था झालेली पाहून माझे अश्रू अनावर झाले. पण डोळ्यातील अश्रू आवरत मी तिच्याजवळ गेले. तिचे शरीर खूप सुजलेले दिसत होते. म्हणजे ती तशी तब्बेतीने सडपातळ होती पण आत्ता पाहिले तर मला ती ओळखून न येण्यासारखी झाली होती. ज्यांनी मला फोन केला त्या सिस्टर तिच्याजवळ होत्या.
बहिणीची अशी अवस्था पाहून मी खूप बेचैन झाले होते. असे का झाले असावे काही कळेना म्हणून मी त्या नर्सला म्हणाले, “सिस्टर.. हिला नक्की काय झालेय ते मला समजेल का?”
सिस्टर म्हणाल्या, “ तुमच्या बहिणीला इथे ऍडमिट केले तेव्हा तिचा बीपी खूपच वाढला होता. त्याचा परिणाम तिच्या किडन्यावर होऊन तिच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात.”
हे ऐकून तर मला धडकीच भरली. काय बोलावे अन् काय करावे ते सुचेनासे झालेले.
माझी बहिण आणि तिचा नवरा हे दोघेच तिकडे राहत होते. ती गरोदर होती आणि तिला नववा महिना नुकताच चालू झाला होता. काही कारणाने अचानक तिचा बीपी वाढला म्हणून तिच्या नवऱ्याने तिला दवाखान्यात नेले. तिच्यावर उपचार सुरू होते. डिलिव्हरीसुध्दा नॉर्मल झाली पण बीपी कमी जास्त होतच होता. त्यामुळे एकाएकी तिच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या.
दवाखान्यात तिच्याजवळ थांबायला कुणीच नव्हते. ते लहान बाळ आणि या दोघांना सांभाळणे तिच्या नवऱ्याला शक्य होईना, म्हणून नर्सने तिला विचारले, “तुमचं जवळच असं कुणी आहे का जे तुमच्याकडे लगेच येऊ शकेल? त्यांचा फोन नंबर द्या म्हणजे मी बोलावून घेते.”
माझ्या बहिणीला पटकन माझीच आठवण आली. कारण माझा नंबर तिला तोंडपाठ होता. ती म्हणाली, “ हो आहे माझी बहिण. ती माझ्यासाठी नक्की येईल इकडे!” असे म्हणत तिने माझा नंबर सिस्टरला दिला आणि त्यामुळे त्यांनी मला फोन केला होता.
नंतर मी डॉक्टरांची भेट घेतली तेव्हा मी त्यांना म्हणाल, “की अचानक कशा काय फेल झालाय किडन्या? असे होऊ शकते का?”
डॉक्टर म्हणाले, “हो काही केस मध्ये असे होऊ शकते. कधी काय होईल सांगता येत नसते. म्हणून म्हणतात ना की बाईचा तो पुनर्जन्म असतो.”
मी शांतपणे ऐकून घेत होते. मनात अनेक प्रश्नांचा नुसता गोंधळ चालू होता. पुढे डॉक्टर म्हणाले, “मन घट्ट करून ऐका.. खचून जाऊ नका पण सत्य परिस्थिती तुम्हाला कळायला हवी म्हणून सांगतोय, तुमच्या बहिणीच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात. मी स्पष्टच सांगतो पण तुमची बहीण आता काही दिवसांचीच सोबती आहे.”
डॉक्टरांचे बोलणे ऐकून माझे पाय थरथर कापू लागले. पूर्ण शरीरातील त्राण निघून गेल्यासारखे वाटू लागले. डॉक्टरांनी मला धीर देत सांगितले की आता आहे या परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. माझी अवस्था खूप बिकट झाली होती. थड रडताही येईना आणि शांत राहताही येईना. पण तेव्हा बहिणीला आधार देणे हे माझे कर्तव्य पार पाडणे खूप महत्त्वाचे होते.
तिथल्या सिस्टरने मला खूप मदत केली. सगळी परिस्थिती समजावून सांगितली होती. “तुमची बहिण आहे तोवर तिची काळजी घ्या.” असे सांगितले.
मी बहिणीजवळ गेले आणि तिच्या तोंडावरून हात फिरवत म्हणाले, “काही काळजी नको करू, तुला काही होणार नाही; मी आहे इथेच…तुझ्याजवळ.”
मी माझ्या घरी फोन करुन सगळी कल्पना दिली. ते ऐकून आई वडील पूर्णपणे खचून गेलेले. कारण अवघ्या चोवीस वर्षांची होती माझी बहिण. इतक्या लवकर ती आपल्याला सोडून जाणार या कल्पनेनेच आई चक्कर येऊन पडली. घरी आई आजारी इकडे बहिण आजारी. माझं डोकंच काम करेनासं झालं. मग मी वडिलांना सांगितले की तुम्ही तिकडे आईची काळजी घ्या. मी आहे इकडे हिच्याजवळ.
वडिलांनी आईला दवाखान्यात नेले. मी बहिणीजवळ थांबले. तिचे छोटे बाळ आणि तिची काळजी घेताना माझ्या तब्बेतीची हेळसांड होऊ लागली. अशातच माझी दाढ खुप दुखत होती. शिवाय त्याच वेळी मला पिरियड आल्याने पोट आणि कंबर भयंकर दुखत होती. चोहोबाजूंनी जणू नुसती संकटांची रांगच लागली होती. तरीही मी खंबीरपणे बहिणीजवळ थांबले होते.
बहिणीला आता माहित झाले होते तिच्या किडन्या फेल झाल्यात. ती स्वतः आजारी होती पण त्यातूनही ती मला समजवायची की माझी काळजी करु नको, मी बरी होणार आहे. कारण तिच्या त्या लहान बाळाकडे बघून तिला जगण्याची आसं निर्माण होत होती, पण देवाला ते मंजूर नव्हते. तिच्या बोलण्याने मला अजूनच रडू यायचे. मन कासाविस व्हायचे पण नियतीपुढे कुणाचे काय चालणार!
डॉक्टर एका दिवसाआड बहिणीचे डायलिसिस करायचे. तेव्हा ते रक्त पाहताना माझ्या अंगावर काटे यायचे पण मन घट्ट करून डोळे झाकून मी बसायचे. तिची तडफड पाहून माझे काळीज धडधड करायचे. जसे जसे दिवस पुढे सरत होते तसे तसे बहिणीची तब्बेत खूपच खालावत गेली. नंतर तिला श्वास घेतानाही त्रास होऊ लागला म्हणून डॉक्टरांनी तिला ऑक्सीजन मास्क लावला. आता मात्र तिची तडफड पाहताना माझी अवस्था बिकट होऊ लागली. मांडीवर लहान बाळ घेऊन रडू नये असे माझी आई नेहमी सांगते म्हणून मोकळेपणाने धड रडताही येत नव्हते.
तब्बल विस दिवस माझी बहीण मृत्यूशी झुंज देत होती. पण तिची जगण्याची आस तिच्या मनातच विरून गेली. अखेर एकदाची तिची प्राणज्योत मावळली आणि तडफड बंद होऊन ती शांतपणे निपचीप पडली. मी माझ्या बहिणीला कायमचे मुकले.
त्याक्षणापासून आजही मला मोठ्या दवाखान्याची खूप भीती वाटते. इतकेच नाही तर टीव्हीमध्ये किंवा एखाद्या सिनेमात किंवा अन्य कुठेही ऑक्सीजन मास्क लावलेली व्यक्ती पाहिली की मला माझ्या बहिणीची खूप आठवण येते आणि आपोआप डोळे पाणावतात. ते दिवास माझ्या आयुष्यातील खूप वाईट दिवस होते जे मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या बहिणीच्या आणि माझ्या जीवनाशी निगडित असलेला हा एक वाईट अनुभव माझ्या मनात खोलवर रुतून बसला आहे. आजही मनात एकच खंत वाटते की मी माझ्या बहिणीला वाचवू शकले नाही.
—---------
—---------
©® सौ. वनिता गणेश शिंदे