Login

#अनुभव

आयुष्यात आलेला एक थरारक अनुभव


#अनुभव -
आपुले मरण पाहिले म्या डोळा


असं म्हणतात की अनुभवाने माणूस समृद्ध होतो. काही अनुभव अतिशय थरारक, अंगावर काटा आणणारे असे असतात. त्याची नुसती आठवण झाली तरी आपण तो प्रसंग पुन्हा अनुभवतोय असा भास होतो. असाच एक अनुभव माझ्या संध्याकाळच्या ५.४५ च्या बोरिवली लोकलमधील एका मैत्रिणीला आला होता. त्यावेळी मी सुद्धा तिच्याबरोबर होते. तो प्रसंग घडल्यानंतर दोन-तीन दिवस ती गाडीला आलीच नाही. ज्या दिवशी आली त्या दिवशी खूप गप्प गप्प होती. मी इतर मैत्रिणींना आधीच सांगून ठेवल्यामुळे कोणी तिला काही विचारले नाही. परंतु तिला स्वतःलाच असं वाटलं की यांना सर्वांना सांगितल्यावर आपल्याला थोडं हलकं वाटेल म्हणून तिने तो प्रसंग कथन केला. तिने जे सांगितलं ते ऐकून सगळ्याजणी एकदम स्तब्ध झाल्या. काय बोलावं कोणाला सुचेना.

बारा डब्यांच्या गाड्या नियमितपणे सुरू होण्यापूर्वीचा तो काळ होता. त्यावेळी फक्त थोड्याच बारा डब्यांच्या गाड्या होत्या. प्लॅटफॉर्मची लांबी नऊ डब्यांच्या लोकलसाठी होती. त्यामुळे बरेच प्रवासी ट्रॅक ओलांडून जात येत असायचे. बारा डब्यांची लोकल त्यावेळी प्लॅटफॉर्मवर दोन वेळा थांबत असे. माझ्या मैत्रीणीला, अनिताला(नाव बदलले आहे) त्यादिवशी थोडं लवकर जायचं असल्या कारणाने ती आणि मी आधीच्या गाडीने आलो. गोरेगावला आमची चर्चगेटहून येणारी जलद लोकल प्लॅटफॉर्म नंबर तीन वर आली. त्याचवेळी चर्चगेट कडे जाणारी धीमी गाडी प्लॅटफॉर्म नंबर दोन वर आली. दोन्ही गाड्या एकाच वेळी आल्यामुळे पुलावर खूपच गर्दी झाली. लवकर घरी जाण्यासाठी तिने दोन नंबरची ट्रेन गेल्यानंतर ट्रॅक मध्ये उडी मारूया असं म्हटलं. मी तिला म्हटलं जास्त घाई करू नको आपण पुलावरूनच जाऊया. मी असं म्हणेपर्यंत तिने दोन नंबर ट्रॅक वर उडी मारली सुद्धा. प्लॅटफॉर्म नंबर एक वर चर्चगेटहून येणारी धीमी गाडी येत होती. तिने विचार केला की एक नंबरची गाडी गेली की आपण क्रॉस करून जाऊ. इतक्यात काही तांत्रिक कारणामुळे चार नंबर वरून जाणारी जलद लोकल दोन नंबर ट्रॅक वरून येत होती. रेल्वेची तशी उद्घोषणा झाली की प्रवाशांनी प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या किनाऱ्यापासून दूर राहावे तिथून एक जलद गाडी पास होत आहे.

अनिताने वळून पाहिलं तर दोन नंबर ट्रॅक वरून जलद गाडी येत होती. एक नंबर वर पण गाडी होती. ती गेल्याशिवाय तिला क्रॉस करता येत नव्हतं पुन्हा दोन नंबर प्लॅटफॉर्मवर चढता येत नव्हतं. मुख्य म्हणजे तितका वेळही नव्हता आणि ट्रेन अतिशय वेगाने येत होती. तिला काही सुचेच ना आता काय करायचं ती खूप घाबरीघुबरी झाली. ते दृश्य पाहत असलेले प्रवासी पण तिथल्या तिथे थबकून डोळ्यात प्राण आणून पाहत होते. काहीजण ओरडत होते 'ट्रॅक मध्ये झोप', 'पटरी के अंदर सो जाओ'. अशा सगळ्या आवाजांनी ती आणखीनच भयभीत झाली. शेवटी ती जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅक वर मधोमध झोपून राहिली. त्यावेळी तिला वाटत होते की हा आपल्या आयुष्याचा शेवटचा क्षण आला आहे. जीव मुठीत धरून देवाचा धावा करण्याशिवाय तिच्याकडे काही पर्याय नव्हता. तिला जाणवत होतं तिच्या अंगावरून धाडधाड नऊ डबे जात होते. तिला हेही जाणवत होतं की गाडी अंगावरून जात आहे तरीसुद्धा आपण जिवंत आहोत. या कल्पनेनेच तिला खूपच धीर मिळत होता. गाडी निघून गेली तरी पटकन उठण्याचे धैर्य तिच्यात नव्हते. तिला लोकांचं बोलणं ऐकू येत होतं. कोणी म्हणत होते, 'ही बहुदा गेलीच असावी', 'मर गई लगता है'. तर कोण म्हणत होतं अति भीतीनेच तिचे प्राण गेले असावेत.

मी आणि इतर दोन-तीन प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवून ट्रॅक मध्ये उडी घेतली आणि तिच्या जवळ गेलो. तिला उठवायचा प्रयत्न केला. ती उठून बसली पण भीतीने तिला चक्कर आली. कोणीतरी स्टाॅल वरून पाणी आणून तिला प्यायला पाणी दिलं. दोघा तिघांनी धरून तिला आधी प्लॅटफॉर्मवर ठेवलं. लोकांची गर्दी आणि त्यांच्या नजरा पाहून तिला असं झालं होतं की आता जमीन दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं. तिला धीर द्यायचा सोडून काहीजण बोलत होते 'इतकी काय घाई एवढा काय प्राण वरती आला आहे का'. तोंडाला येईल ते लोक बोलत होते. मी सुद्धा खूप घाबरून गेले होते. तरी पण उसनं अवसान आणून तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. दोन-तीन महिलांनी सर्वांना जायला सांगितलं. तिचा चेहरा लाल झाला होता आणि ती घामाने डबडबली होती. आम्ही तिला आधी शांत केलं नंतर मी तिला घरी सोडलं. ती मला म्हणाली,

" तू आता इथूनच जा नाहीतर घरात सर्वांना संशय येईल की काहीतरी विपरीत घडलं आहे. मी जाते एकटीच. " घरी गेल्यावर हात पाय धुऊन तिने आधी देवाला नमस्कार केला. नवऱ्याने विचारलं,

"तुझा चेहरा असा का दिसतो आहे. तू आज लवकर येणार होतीस ना." हे शब्द ऐकून ती मोठ्याने रडायलाच लागली. नवऱ्याने तिला शांत केलं आणि तिला सांगितलं जे काही घडले ते उद्या सांग आता काही बोलू नकोस. त्यामुळे तिला खूप घीर आला.

आज त्या घटनेला इतकी वर्ष उलटून सुद्धा अनिता हा प्रसंग विसरू शकली नाही. इतकंच काय रेल्वेच्या एखाद्या अपघाताबद्दल ऐकलं तरी माझ्या डोळ्यांसमोर सुद्धा सारा घटनाक्रम जसाच्या तसा तरळतो. तिचं दैव बलवत्तर होतं म्हणूनच, 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' याची प्रचिती आली.