Login

अनुभव.... एक थरारक पण माणुसकीचे दर्शन घडवणारा.

अनुभव
अनुभव...
एक थरारक पण माणुसकीचे दर्शन घडवणारा.

जीवन जगत असताना अनेक अनुभवांनी मनुष्य समृद्ध होत जातो. पण काही अनुभव एवढे अविस्मरणीय, थरारक असतात की ते आठवताचं अंगावर शहारे येतात. असाच एक अनुभव मला अलीकडे आला. दि.२६ जून २०२४ ची घटना. छत्रपती संभाजीनगरला मला "राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कारासाठी" जायचे होते. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांची मालिका वारंवार ऐकून होते. त्यामुळे थोडी धाकधूक होतीच. ऐतिहासिक वारसा असलेलं हे शहर फक्त मी ऐकून होते. मनात नेहमी वाटायचं आपल्याला कधी जायला मिळेल छ. संभाजीनगरला. पण जाण्याचा योग आलाच.

ऐनवेळी पतीदेवांची तब्येत बिघडल्यामुळे ते येऊ शकले नाही. मुलांचेही सोबत येणे जमत नव्हते. पण जायचं तर होतचं. शेवटी हिंमत करून घरच्या गाडीने जायचे ठरवले. ड्रायव्हर व सोबत म्हणून माझी लहान बहीण होती. कार्यक्रम दुपारी एक ते सहा या वेळेत होणार होता. तसं कार्यक्रम पत्रिकेत नमूद केलेलं होतं. छ.संभाजीनगरला जाण्याची, समृद्धी महामार्गावरून जाण्याची ही पहिलीच वेळ. थोडी धाकधुक होतीच. म्हणून लवकर निघालेलं बरं म्हणून आम्ही २६ तारखेला पहाटे पाच वाजताच ड्रायव्हरला बोलावले. ते ही बरोबर पाच वाजता आले. बहिणीला आदल्या दिवशीच बोलावून घेतले होते.

अशारितीने पहाटे सव्वा पाच वाजता आम्ही अमरावती वरून निघालो. मध्ये मध्ये थोडा ब्रेक घेत आम्ही बारा वाजता संभाजीनगर ला पोहोचलो. तरी स्थळ शोधताना साडेबारा झाले होतेचं. कार्यक्रम स्थळी पोहोचलो. कार्यक्रम नियोजित वेळेस सुरू झाला. मात्र संध्याकाळी सहा वाजले तरी अजून बराचसा कार्यक्रम बाकी होता. आम्हाला सहा वाजता कसंही करून निघावं लागणार होतं. कारण अमरावतीला पोहोचेपर्यंत बरीच रात्र होणार होती. शिवाय कारंजा लाड पासून समृद्धी मार्गावर चढेपर्यंत जवळपास पंधरा किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब होता.

येताना दिवसाची वेळ असल्यामुळे ठीक होतं. परंतु परत अमरावतीला जाताना काय माहिती कसं होणार असं वाटलं. तेवढ्या रस्त्याचे बांधकाम चालू असल्यामुळे साईडने वाहनांची ये जा चालू होती. अतिशय वाहता रोड शिवाय थोडा पाऊस सुरू असल्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली दिसत होती. रस्त्याचे बांधकाम चालू असल्यामुळे एकाच साईडने वाहनांची येता चालू होती. मी पुरस्कार तर घेतला. पण आयोजकांनी, कुणीही कार्यक्रम संपल्याशिवाय जायचे नाही असे सांगितले. प्रत्येकाने आपापला पुरस्कार घेऊन परत जायचे ठरवले तर शेवटच्या पुरस्कार्थ्याना काय वाटेल. हो. अर्थात तेही बरोबर होते.

पण दुरून दुरून आलेली मंडळी असल्यामुळे एक एक करून बरेच जण निघून गेले. मी कार्यक्रमात कविता सादर केली असल्यामुळे कवितेचे सन्मानचिन्ह घ्यायचे होते. पण इलाज नव्हता. शेवटी निघायला साडेसहा,पावणेसात झालेच.. कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था होती. जेवण केले तर आणखी उशीर होईल म्हणून आम्ही गाडी रोडवर लागण्यापूर्वी हॉटेलमध्ये नाश्ता घेतला. चहा घेतला. व निघालो. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. अंधार पडू लागला होता. मी ड्रायव्हरला म्हटलं, तुम्ही इथेच पेट्रोल टाकून घ्या. तर ड्रायव्हर म्हणाले, सध्या टाकायची गरज नाही. पुढे पेट्रोल पंप आहे. तेथे टाकू. ठीक आहे असं म्हणून आम्ही निघालो.

समृद्धी महामार्गाला लागून एक, सव्वा तास झाला होता. गाडी स्लो चाललेली पाहून मी म्हटलं काय हो गाडी कां स्लो केली. तर ड्रायव्हर म्हणतात पेट्रोल संपत आलं आहे. काय?????? मी तर जवळजवळ ओरडलेच. ही गोष्ट तुम्हाला आधी कशी नाही समजली. तुम्हीच तर म्हणालात की पुढे पेट्रोल पंप आहे. तिथे टाकू. आता तर इथे कुठेच जवळपास पेट्रोल पंप दिसत नाही. आता काय करायचं? समृद्धी महामार्गावर ठिकठिकाणी लिहिले आहे "थांबू नका" आता कसं? एकतर गाडीत ड्रायव्हर व आम्ही दोघी. देवाचा धावा सुरू केला. आता तर ड्रायव्हर बोलतही नव्हते. फक्त ते एवढेच म्हणाले "गाडी केव्हाही बंद पडू शकते." मी त्यांना म्हटले गाडी साईडला घ्या. आपण कोणाला रिक्वेस्ट करू. कुणीतरी थांबेलच. पण तसं करणं ही धोक्याचं होतं.

परमेश्वराचे नामस्मरण सुरू होते. घशाला कोरड पडू लागली होती. नवऱ्याचे, मुलांचे फोन सुरू. कुठपर्यंत आहे? किती वेळ लागेल? पण सांगायची सोय नव्हती. कारण सांगून उपयोग नव्हता.ते तेथे थोडेच येऊ शकणार होते.. म्हणून निघालो आहे. पोहोचत आहे. असं म्हणून वेळ मारून नेणे सुरू होते. कशीबशी गाडी पाच किलोमीटर पर्यंत आली. तोच समोर आम्हाला लाईट दिसले. टोल नाका होता तो.

आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. चला "तिमिरातून तेजाकडे" आलो. गाडी कशीबशी त्या टोल नाक्या च्या थोडी अलीकडे आली.व बंद पडली. ड्रायव्हरला म्हटले, जा काही उपाय करा. तिथल्या कर्मचाऱ्यांना काही उपाय विचारा. तोपर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते. ड्रायव्हरने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना सर्व परिस्थिती सांगितली. व पेट्रोल आणायला बॉटल किंवा कॅन आहे कां विचारले. टोल नाक्यापासून पेट्रोल पंप सहा किलोमीटर अंतरावर होता. ड्रायव्हरने त्यांना सांगितले, की मी एखाद्या ट्रकमध्ये वगैरे जाऊन पेट्रोल पंपावरून कॅनमध्ये किंवा बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन येतो. तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले या टोलनाक्यावरील एक कर्मचारी जो रात्र पाळीला असतो. त्याचे वडील पेट्रोल पंपावर काम करतात. ते आता डबा घेऊन येणारच आहेत. आम्ही त्यांना फोन करून येताना पेट्रोल घेऊन येण्यास सांगतो. आणि म्हटल्याप्रमाणे त्यांनी त्यांना फोन केला व पेट्रोल घेऊन येण्याविषयी सांगितले. हेही एक प्रकारचे माणुसकीचे दर्शन होते. आम्ही वाट पाहत बसलो.

एक तास झाला. दीड तास झाला. रात्रीचे साडेदहा वाजले होते. आता मात्र माझा संयम सुटत चालला. मी गाडीतून उतरून पायी चालत गेले व तेथील कर्मचाऱ्यांना विचारले, नक्की येणार नां दादा तो पेट्रोल घेऊन? हो ताई. तो निघालाच आहे. मनात जाम घाबरले होते पण दाखवता येत नव्हतं. ड्रायव्हरला बोलूनही काही उपयोग नव्हता. पुन्हा गाडी येऊन बसले. मी माझ्या बहिणीला व माझी बहीण मला धीर देत होती. एवढ्यात तो व्यक्ती पेट्रोल घेऊन आला. त्याला वेळ होण्याचे कारण असे होते, की तो आधी घरी गेला. मुलाचा डबा घेतला व टोल नाक्यावर आला. त्याला पाहताच मी दीर्घ श्वास घेतला. सर्वांनीच ड्रायव्हरला गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी मदत केली.

यावेळी मला सर्वजण एखाद्या देवदूताप्रमाणे भासले. कारण पेट्रोल आणलेच नसते तर.... कारण पेट्रोल बॉटलमध्ये सहसा कोणाला देत नाहीत. ते नियमात बसत नाही. तो पेट्रोल पंपावरील कर्मचारी असल्यामुळे त्याने त्याच्या जबाबदारीवर ते आणले होते. त्याही पेक्षा भयंकर म्हणजे टोल नाक्यापासून बऱ्याच आधी निर्मनुष्य रस्त्यावर गाडीतील पेट्रोल संपले असते तर.... कल्पनाच न केलेली बरी.

अशा प्रकारे गाडीत पेट्रोल टाकून गाडी सुरू झाली. आणि आम्ही मार्गस्थ झालो.

पेट्रोल पंपावर आम्ही पुन्हा पेट्रोल भरले व रात्री दोन वाजता सुखरुप अमरावतीला येऊन पोहोचलो. परत परत मी देवाचे आभार मानत होते. एवढे होऊनही मी हिंमत हारले नाही. ना कोणाला ही गोष्ट सांगितली. कारण पुन्हा मला दोनदा संभाजीनगरला जायचं होतं. पुरस्कारासाठी निवडपत्र मिळाली होती. ही गोष्ट जर सांगितली असती तर पुन्हा जायला मिळेल की नाही याची शक्यता नव्हती. म्हणतात नां "अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु आहे"म्हणून सर्व खबरदारी घेऊन मी पुढे दोनदा आणि ते ही घरच्या कारनेच पुरस्कारासाठी संभाजीनगरला जाऊन आले व मीच माझी पाठ थोपटून घेतली.
सौ. रेखा देशमुख