अनुभवाची पोटली -कथा 1

Different experiences in different stories.

गुरु शिष्य

मला आज माझ्या एका विद्यार्थ्याची आठवण शेअर कराविशी वाटते, माझा एक विद्यार्थी होता,मी त्याची वर्गशिक्षिका होती. आम्हांला एक महिन्याने अनुपस्थित मुलांची यादी तयार करावी लागायची, सेमिस्टर संपत आले की ,ज्यांना परीक्षेत बसता येणार नाही त्यांची यादी तयार करायचो,त्यांच्या पालकांना बोलवायचो.

मी इथे नाव लिहू इच्छित नाही , पण त्या मुलाच्या पालकांना मी बोलवले, तो त्याच्या आईला भेटायला घेऊन आला,त्याच्या आईशी बोलल्यानंतर कळाले की त्याची आई एकटीच त्याला सांभाळते आणि ते दोघेही त्याच्या मामाकडे राहतात. आईशी बोलल्यानंतर हेही कळले की ,तो रोज कॉलेजला येण्यासाठी डबा घेवून वेळेत बाहेर पडतो . मग आता प्रश्न पडला की जातो नक्की कुठे, थोडसं त्याला विश्वासात घेतल्यावर कळाल की तो स्टेशन वर बसून रहायचा आणि कॉलेज सुटल्यानंतरची जी ट्रेन आहे ती पकडून घरी जायचा,असं का करतो विचारल्यावर काहीही उत्तर दिले नाही .

परंतु एक संधी मागितली, मी त्याचे आधीचे परीक्षेचे मार्क बघितले होते,सगळ्या विषयात त्याला चांगले मार्क होते, इंटरनल मार्क कमी होते कारण त्याची हजेरी कमी होती,वेळेवर सबमिशन केले नव्हते, त्याच्या आईसमोर ह्या सगळ्या गोष्टी त्याला समजावून सांगितल्या.

त्याने स्वत: हून संधी मागितल्यामुळे आम्ही त्याला संधी दिली ,त्यानंतर त्याने व्यवस्थित अभ्यास केला आणि आता परदेशात नोकरी करतो, कुटुंबासहित तेथेच रहातो. त्याने त्याला मिळालेल्या संधीचे सोने केले आणि आम्ही त्याला संधी दिली हा आमचा निर्णय योग्यच होता असे मला वाटते . प्रत्येक जण आयुष्यात चुका करतो पण त्या मागची कारणे शोधून त्यातून मार्ग काढता येतो अशी कोणतीही गोष्ट नाही की , ज्यातून मार्ग काढता येत नाही . मला नेहमीच माझ्या त्या विद्यार्थ्याचे कौतुक वाटते.

तसेच प्रत्येकाला आपल्या आयुष्यात संधी येतात ,त्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे आणि त्यांचे सोनं केलं पाहिजे.

मला त्याच्या कडून ही गोष्ट शिकायला मिळाली .

गरजेच नाही की नेहमी मोठ्यांनीच लहानांना सल्ला दिला पाहिजे ,छोट्यांच्या वागणूकीतूनही बरच्ं काही शिकायला मिळत, तिथे गुरु हा गुरु असतो आणि ते मान्य करायला कोणत्याही प्रकारचा कमीपणा मला वाटत नाही ,अश्या माझ्या सा-या लहान थोर गुरुंना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

रुपाली थोरात