चॅम्पियन ट्रॉफी २०२५
जलद कथालेखन स्पर्धा
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक: अनुत्तरित भाग-१
शमा आणि नीलचे नुकतेच लग्न झालेले होते. शमाही गावी राहणारी मुलगी होती, तसेच नील हा नोकरी निमित्त मुंबईमध्ये राहायचा.
लग्न झाल्यानंतर एका आठवड्यातच नील सोबत शमा गावावरून शहरात राहण्यासाठी आली होती. त्याकाळी मोबाईलची सुविधा नसल्याने टेलिफोन सुद्धा मोजक्याच लोकांकडे होते. त्यामुळे गरज पडेल तेव्हाच अगदी महत्त्वाचा काही संदेश असेल तर त्यासाठीच फोन केला जायचा.
नीलचे आई-वडील एका अपघातात त्याला सोडून गेलेले होते आणि तो त्याच्या मावशीकडे मुंबईच्या छोट्या चाळीमध्ये राहत होता. मावशीचे लग्न झाले होते, परंतु दीर्घ आजाराने मावशीच्या नवऱ्याचे निधन झाले होते. म्हणून लवकरच ती विधवा झाली होती, त्यानंतर तिने पुन्हा कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला होता, तसेच तिला मूलबाळ सुद्धा नव्हते आणि त्यामुळे नीलचा सांभाळ तिनेच केलेला होता.
" शमा, या रविवारी आपण मुंबई दर्शनला जाऊया. तुला सुद्धा इथल्या गोष्टींची माहिती होईल. तू दिवसभर घरीच असते. त्यामुळे तुला सुद्धा थोडसं बरे वाटेल." नीलला रविवारी सुट्टी होती, म्हणून त्याने शमाकडे बघत सांगितले.
त्यावर शमा काहीच बोलली नव्हती.
छोटेसे घर असल्यामुळे मावशी समोरच होती आणि त्यामुळे ती सर्व बघत होती.
शमा ही खूप कमी बोलणारी होती. ती १९ वर्षाची झाली आणि तिच्या आई-वडिलांनी तिचं लग्न लावलं. नील हा त्यांच्या नात्यातलाच होता, म्हणून त्याला मुंबईला नोकरी असल्यामुळे आपली मुलगी सुखात राहील, हाच त्यांनी विचार करूनच तिचे लग्न लावलेले होते.
तीन मुलींच्या पाठीवर मुलगा व्हावा, अशी इच्छा असताना तिच्या आई-वडिलांना शमा झालेली होती आणि त्यामुळेच लवकरात लवकर प्रत्येक मुलीचे लग्न व्हावे, असा तिच्या आई-वडिलांचा मानस होता. त्यामुळेच त्यांनी शमाचे लग्न नात्यांमध्येच लावलेले होते. कारण नीलबद्दल त्यांना पहिल्यापासूनच माहिती असल्यामुळे तो आपल्या मुलीला चांगला सांभाळेल हाच त्यांनी विचार केला होता.
लग्न ठरल्यापासून शमा खूपच शांत झाली होती. सगळ्यांशी ती मोजकेच बोलायची. कदाचित तिचा स्वभाव शांत आहे, असे समजून नीलने त्याकडे दुर्लक्ष केलेले होते. तो नेहमी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, परंतु ती फार काही बोलत नव्हती.
" शमा, मी जवळच्या नातेवाईकांकडे जाऊन येते. तू माझ्यासोबत येतेस का?" मावशीने एक आजारी नातेवाईक होते त्यांना बघून यायचे होते म्हणून विचारले.
" नाय मावशी. तुम्ही जावा." एवढेच शमा म्हणाली.
खरंतर मावशींना तिला आपल्यासोबत घेऊन जायचे होते, त्यामुळे नातेवाईक आणि तिला आजूबाजूचे रस्ते किंवा अजून लोकांशी ओळख होईल, असे वाटत होते; परंतु नवीनच लग्न झाल्यामुळे थोडे दडपण आणि घाबरत असेल म्हणून ती येत नसेल, असा विचार करून मावशीने सुद्धा तिला सोबत येण्यासाठी जबरदस्ती केली नव्हती.
" बरं, मग तू जेवून घे. माझी काही वाट बघू नकोस आणि आराम कर. " असे म्हणून मावशीने तिच्या डोक्यावरून हात फिरवून त्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघाल्या.
त्या गेल्यानंतर शमाने घराचा दरवाजा बंद केला.
नील सुद्धा सकाळीच आपल्या कामावर निघून गेलेला होता. त्याला डब्बा व नाष्टा, शमा आणि मावशी या दोघींनी मिळून दिला होता. कारण शमाला इथले फारसे माहीत नव्हते आणि नवीनच लग्न झालंय तर हळूहळू सर्व तिला समजेल असा विचार त्यावेळी मावशीने केलेला होता.
" काय वहिनी, येताना तरी तुम्ही सुनेला घेऊन यायचे होते, म्हणजे आम्हाला सुद्धा नव्या नवरीला बघता आले असते. आम्हाला काय लग्नाला येता आले नाही." तिथल्या नातेवाईकांनी सुनेला का आणले नाही, म्हणून मावशीला प्रश्न विचारला.
" ती जरा लाजरी आहे आणि तिच्यासाठी सगळं इथे नवीन आहे ना, त्यामुळेच ती स्वतःच नाही म्हणाली; पण पुढच्या वेळेस मी नक्कीच घेऊन येईल. आता मला निघायला हवे ती एकटीच घरी आहे." मावशी म्हणाली.
मावशीला वाटले की, आपली सून आज घरी एकटीच आहे. त्यात ती जास्त कोणाशी बोलत नाही, त्यामुळे तिला एकटं सोडायला नको, म्हणून मोजकच बोलून ती तिथून निघाली. कारण नीलसुद्धा घरी नव्हता आणि आपल्या भरोवशावर तिच्या आई-वडिलांनी इकडे शहरात पाठवलेले आहे, असा विचार करून मावशी सुद्धा तिथून लगेच निघाली. पुढच्या वेळी आपल्या सुनेला घेऊन येईन, असे सुद्धा तिथल्या नातेवाईकांना तिने सांगितले.
शमा मात्र स्वयंपाक घरात गेली आणि तिथे असणाऱ्या रॉकेलवर तिची नजर गेली.
क्रमशः
© विद्या कुंभार
कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा