चॅम्पियन ट्रॉफी २०२५
जलद कथालेखन स्पर्धा
शीर्षक: अनुत्तरित भाग-३(अंतिम)
" तुम्ही दोघांनी माझ्या मुलीच्या अंत्यविधीमध्ये सामील व्हायचे नाही. " शमाच्या वडिलांनी त्यांना थांबवले, परंतु लग्न ठरवताना मध्यस्थी केलेली होती त्या शमाच्या मामांनी चिडून त्यांना आपल्या भाचीच्या मृतदेहापासून दूर केले.
" तुम्ही हे काय बोलताय ?" मावशीला मात्र काही समजलेच नव्हते की, ते असे का वागत होते म्हणून ती म्हणाली.
" काय करतोय म्हणजे ? आमच्या मुलीचा जीव घेतला तरीसुद्धा तुमचे आता समाधान झालेले नाहीये का ?" शमाचे मामा त्वेषाने म्हणाले.
" अहो, पण ती माझी बायको होती आणि तुम्ही असं कसं मला तिच्या अंत्यविधीमध्ये न येण्यासाठी सांगत आहात? " नीलला मात्र अजूनही ते काय बोलतात ते समजत नव्हते, कारण तो त्या भानातच नव्हता म्हणून म्हणाला.
" हे तुम्हाला आता कळत आहे का? " शमाचे दुसरे नातेवाईक नीलला उद्देशून म्हणाले.
त्यांनी नीलला आणि मावशीला कोणत्याही अंत्यविधीमध्ये येण्यास मज्जाव केला होता आणि शमावरती अंत्यसंस्कार केले.
थोड्याच वेळात पोलीस येऊन नील आणि मावशीला शमाच्या मृत्यूला जबाबदार म्हणून शमाच्या माहेरच्यांनी केलेल्या तक्रारीमुळे त्यांना अटक करण्यात आली होती.
नील आणि मावशी ओरडून सांगत होते की, त्यांनी असे काही केलेलेच नाही, परंतु पोलीस आणि शमाचे घरचे यांना मात्र हे सर्व खोटे वाटत होते.
पोलिसांनी चौकशीसाठी ते जिथे राहत होते, तिथल्या आजूबाजूच्या लोकांची विचारपूस करायला सुरुवात केली होती.
" नील आणि शमाचे नाते कसे होते ? तुम्ही त्याबद्दल काही सांगू शकता का ?" पोलिसांनी एका शेजारच्या काकूंना विचारले.
" खरंतर दोघांना येऊन जास्त वेळ झालेला नव्हता. कारण त्यांचे नवीनच लग्न झालेले होते, परंतु नीलला आम्ही ओळखतो. खरे सांगायचे तर तो असा मुलगा नाहीये आणि तसेच तो नेहमी समजून घेत होता. शमा जास्त बोलायची नाही, त्यामुळे तिच्याबद्दल आम्हाला एवढे काही माहीत नाहीये, कारण ती घरातच असायची." त्यांनी सांगितले.
" मग मला सांगा, ज्यावेळेस मावशीने ओरडून तुम्हाला बोलावले होते, तेव्हा तुम्हाला असे वाटले का, मावशीने शमाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला आहे?" दुसरा प्रश्न त्यांनी त्यादिवशी प्रत्यक्षदर्शी असलेल्या शेजाऱ्यांना विचारला.
" नाही, कारण जेव्हा शमाच्या शरीराला आग लागली होती, तेव्हा दरवाजाला आतून कडी लावलेली होती आणि त्याच्या आधीच मावशी या बाहेरच्या नातेवाईकांकडे गेलेल्या होत्या. त्यांनी मला तिच्याकडे लक्ष ठेवायला सुद्धा सांगितलेले होते, त्यामुळे त्या अशा काही करतील असं वाटत नाही. अगदी मुलीप्रमाणे त्या तिच्याशी वागत होत्या. कारण अधून मधून मी त्यांच्या घरी जात होती, त्यामुळे मला माहीत आहे." त्यांनी सांगितले.
" मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का, शमाने स्वतःहूनच पेटवून घेतलेले आहे?" पोलिसांनी त्यांना पुन्हा प्रश्न विचारला.
" शमाबद्दल आम्हाला एवढे काही माहीत नाही, पण मला वाटते नील आणि नीलची मावशी असे काही करेल असे मला वाटत नाही, कारण ते कधीच कोणामध्ये पडणारी लोकं नाहीत. दुसरी गोष्ट अशी की, त्यांनी स्वतः माणसं गमावलेली आहेत, त्यामुळे ते प्रत्येकाशी आपुलकीनेच वागायचे. एक तर मला असे वाटते की, चुकून शमाला आग लागली असू शकते किंवा काहीतरी कारण असू शकतं; ज्यामुळे शमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल, कारण जेव्हा शमा इथे राहायला आली तेव्हापासून ते कालपर्यंत आम्ही कोणतेही भांडण त्या घरातून ऐकले नव्हते." त्यांच्या बाजूलाच राहणाऱ्या एका काकींनी सांगितले.
" ठीक आहे. " असे म्हणून पोलीस तिथून निघून गेले.
" ही केस खूपच गुंतागुंतीची आहे. कारण नील आणि मावशीबद्दल सर्व चांगलेच म्हणत आहेत, परंतु याच्यामध्ये कुठेही त्यांनी तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केले असे दिसत नाहीये. कारण कडीसुद्धा आतूनच लावलेली होती, मग ही आत्महत्या म्हणायची की, चुकून घडलेला अपघात हे समजत नाहीये." पोलिस स्टेशनमध्ये पोलिस बोलत होते.
मावशीची सुद्धा विचारपूस करण्यात आली आणि त्याच्यामध्ये तिने शमाला एकटीला का सोडले, हाच विचार करून त्या खूप वेळ रडत होत्या.
पोलिसांना कोणतेच पुरावे सापडले नव्हते, त्यामुळे त्यांना नील आणि मावशीला सोडून द्यावे लागले होते. मात्र शमाच्या घरच्यांना आपल्या मुलीचा बळी हा नील आणि मावशीनेच घेतलेला आहे, असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी नील आणि मावशीला कडक शिक्षा करावी, अशीच ते मागणी करत होते.
" हे बघा, तुम्ही तुमच्या मुलीला गमावले आहे, हे आम्ही समजू शकतो; परंतु आम्हाला कुठलेच पुरावे मिळाले नाहीयेत की, नील आणि मावशी यांनी तुमच्या मुलीला जाळून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे असे वाटावे. कारण तुमच्या मुलीने स्वतःहूनच आतमधून कडी लावलेली होती. कुठेही तिने वाचवा, हा शब्द सुद्धा जळत असताना काढलेला नव्हता, त्यामुळे आम्हाला ही आत्महत्याही वाटत आहे, तसेच तो अपघात सुद्धा असू शकतो, कारण दोन खोलीचेच घर होते आणि त्याच्यामध्ये जर चुकून रॉकेल तिच्यावर पडून जर जेवण बनवत असताना अचानक पेट घेतला असेल तर ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. कारण स्वयंपाकघर सुद्धा ते झोपण्यासाठी वापरत होते, हे आम्हाला चौकशी दरम्यान समजले होते. त्यामुळे जर त्या दोघांनी गुन्हा केलेलाच नाहीये, तर त्यांना शिक्षा होऊ शकत नाही.
मी तुमच्या भावना समजू शकतो, परंतु तुम्ही सुद्धा उगाच मनामध्ये काही ठेवू नका. तुमच्या मुलीने जर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल तर तो का केला हेही आम्हाला माहीत नाही. कारण कुठेही आम्हाला चिठ्ठी किंवा असं काही सापडलेच नाहीये आणि आम्ही आजूबाजूच्या लोकांकडून सुद्धा चौकशी केली तर त्याच्यामध्ये नील आणि मावशी हे निर्दोष आहेत, हेच दिसून येत आहे. " पोलिस शमाच्या नातेवाईकांना म्हणाले.
शमा तर या जगातून निघून गेलेली होती, परंतु मागे खूप सारे प्रश्न ती सोडून गेलेली होती आणि तिच्या मृत्यू बाबत उभारलेला प्रश्न हा अनुत्तरितच राहिला होता.
जर सुनेचा मृत्यू झाला असेल तर त्याला प्रत्येकवेळी सासरचेच लोकं जबाबदार असतात असे नाही. कारण नील आणि मावशीच्या बाबतीत अशी कोणतीच गोष्ट दिसून आली नव्हती. त्यामुळे उगाचच शमाच्या माहेरच्यांनी कायद्याचा दुरुपयोग करू नये, असे सुद्धा पोलिसांनी शेवटी त्यांना खडसावून सांगितलेले होते. कारण नीलने स्वतःची बायको गमावलेली होती आणि तिने तसे का केले या प्रश्नाचे उत्तर कोणालाच माहीत नव्हते आणि ते अनुत्तरितच राहिले !
समाप्त.
© विद्या कुंभार
कथा कशी वाटली हे लाईक आणि कमेंट नक्की करून सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा