अन्वयार्थ

This story is about mrudul and manswini

      मृदुलला समोर बसलेल्या अर्णवच्या डोळ्यातील भाबडेपणा फार जवळचा वाटत होता. तीच चमक,तोच भाबडेपणा आणि तेच पिंगट डोळे....! ती फार अस्वस्थ झाली. पण त्या नजरेचा अन्वयार्थ मृदुलला नव्हता कळत.
ती आणि अर्णव आज पहिल्यांदा भेटले होते. पेशाने C.A. असलेला अर्णव परांजपे आणि मृदुलची भेट एका विवाह मंडळातून झाली होती. तसा ही मृदुलला लग्न करण्यात रस नव्हता पण आईची लग्नसाठीची सततची भुणभुण ऐकून ती कंटाळली होती म्हणून आईच्या आग्रहासाठी आज ती अर्णवला भेटली.
अर्णव बोलत होता पण मृदुलच मन भूतकाळच्या हिंदोळ्यावर हरवलं होतं. तिला आठवत होती ती तिची कॉलेजची वर्गमैत्रिण मनस्विनी. त्या दोघी खूप जिवलग मैत्रिणी होत्या..मनस्विनी खूप खोडकर,बालिश,आणि दंगेखोर पण डोळ्यांतला भाबडेपणा सगळ्यावर मात करायचा. मृदुलला तिचे ते पिंगट भाबडे डोळे फार आवडायचे. मृदुल तिला खूपदा म्हणायची ,"मनू तुला एक मोठा भाऊ हवा होता असेच डोळे असलेला...खरंच मी पटवला असता त्याला..!! हम मरते है इस आँखोंपे..!" मनू खूप खळखळून हसायची मृदुलच बोलण ऐकून.
खूप छान मजेत चाललं होतं पण आजकाल मनस्विनीच्या पोटात फार दुखायचे. ती दुर्लक्ष करत राहिली. प्रॅक्टिकल ,परीक्षा यात लक्ष केंद्रित झाले आणि पोटाचा वाढत्या दुखण्याकडे तिने अजून दुर्लक्ष केलं .एक दिवस ती चक्कर येऊन पडली डॉक्टरच्या औषधांनी काही फरक पडेना. सर्व टेस्ट झाल्यावर जे सत्य समोर आलं ते फार हादरवून टाकणार होतं. मनस्विनीच्या किडनी निकामी झाल्या होत्या. त्या धक्कातून ती स्वतः खूप लवकर सावरली पण तीच या जगात असण आता काही काळापुरता होतं. खोडकर बालिश मनस्वीनी अचानक खूप मॅच्युर झाली. सततचे डायलिसिस,पथ्य यांना ती कंटाळली होती पण कधीच चेहऱयावर ते दिसलं नाही....शेवटी मनू गेली आठवणी मागे ठेऊन..!
वेटर कॉफी घेऊन आला आणि अर्णवच्या हाकेने मृदुल भानावर आली. तिने अर्णवच्या नकळत आपले डोळे पुसले. शेवटी न राहून मृदुल अर्णवला म्हणाली तुझे डोळे फार छान आहेत अर्णव..खूप भाबडे निरागस...!!
अर्णव हसला पण त्या हसण्याला एक दुखरी नस होती अस मृदुलला जाणवलं. अर्णव बोलू लागला आज काही बोलावं म्हणूनच तुला बोलावलं. आपलं लग्न झालं तर हे माहीत असावं तुला. काही वर्षांपूर्वी मी अपघातात माझे डोळे गमावले. हे माझे डोळे नाहीत. पण आज मी तुझ्या समोर उभा आहे ते त्या वक्तीमुळे जिचे हे भाबडे पिंगट डोळे मला पुनर्जन्म देऊन गेले..!
आता मृदुलच्या डोळयांत पाणी होत...पण अर्णवला त्या अश्रूंचा अन्वयार्थ कधीच उमगलं नसता......!कारण मनूने नेत्रदान करण्याची इच्छा वक्त केली होती आणि तिच्या आई बाबांनी ती इच्छा पूर्ण ही केली होती. मृदुलला ते डोळे कुणाला मिळाले हे माहित नव्हतं पण मृदुलला मनुचा आभास जाणवत होता. तशीच गोड,खट्याळ,बालिश, हसत डोळे मिचकावत मृदुलला चिडवणारी मनस्विनी...! आणि मृदुलला अर्णव च्या नजरेचा अन्वयार्थ कळला ...........!!