Login

अपप्रचार भाग-१

अपप्रचार केल्याने होणारा त्रास!
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: अपप्रचार भाग-१

"आपल्या कंपनीला यावर्षी नफा झालेला आहे आणि त्याचे श्रेय मिळते रीमाला ! " असे म्हणून कंपनीच्या सीईओने घोषणा करून तिचे कौतुक केले.

तसेच तिला प्रमोशन सुद्धा देण्यात आले.

रिमा ही एक सिंगल मदर होती. सिंगल मदर असल्याने कंपनी सोबतच तिला घर सुद्धा व्यवस्थित सांभाळावे लागायचं.

मुलाला सांभाळण्यासाठी एक केयरटेकर सुद्धा तिने ठेवलेली होती, तसेच तिचे आई-वडील सुद्धा अधून मधून गावावरून तिच्याकडे राहण्यासाठी येत होते.

" काही लोकांचं नशीब किती चांगलं असतं ना !  लगेच त्यांना प्रमोशन सुद्धा मिळतं आणि आता तर काय श्रेय सुद्धा लगेच मिळायला लागले आहे." रीमाच्या ऑफिसमधली एक सहकर्मचारी दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याशी बोलत असताना तिच्या कानावर पडले होते.

मत्सर आणि द्वेष ही भावना माणसाला शांत बसू देत नसते, मग कधी कृतीतून किंवा बोलण्यातून सुद्धा ते दिसून येते, असेच काहीसे रीमाच्या कंपनीतल्या महिला वर्गाकडून समजत होते.

दरवर्षी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी एक कार्यक्रम आयोजित करायचे, त्यामध्ये त्यांचे मुलं जोडीदार हे सर्व यायचे. मात्र रीमा फक्त एकटीच यायची आणि थोडावेळ थांबून लगेच मुलाचे कारण पुढे सांगून ती तिथून निघून जायची, त्यामुळे ती सिंगल मदर आहे, सर्वांना माहीत होते.

ऑफिसचे सीईओ यांचा तिच्यावर जास्त विश्वास होता. कारण कणखर परिस्थितीतूनवर आलेली रीमा आणि तिची कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे नेहमीच तिच्यावर प्रभावित झालेले असायचे, त्यामुळे महिला वर्गामध्ये रीमाबद्दल नाराजीचा सूर निघायचा.

घरी येत असताना तिने आधीच पेढे आणलेले होते, आपल्या मुलासाठी तिने त्याची आवडती खाण्याची वस्तू सुद्धा घेऊन जायला ती विसरली नव्हती.

" मम्मा, आज खूप लेट झाला तुला." आल्या आल्या आपल्या आईला बघून रीमाचा मुलगा वीर म्हणाला.

" बाळा, कंपनीत आज थोडे जास्त काम होतं ना, म्हणून वेळ झाला होता."  ती म्हणाली.

आधी देवा समोर तिने आपल्या यशाबद्दल पेढे ठेवले होते, तसेच आपल्या मुलाच्या आवडीचा खाण्याचा पदार्थ त्याला देऊन ती थोडावेळ शांत हॉलमध्ये बसली होती.

असे नव्हते की, तिला लोकं काय बोलत होते त्याचा फरक पडत नव्हता, परंतु प्रत्येकाशी वाद घालण्यामध्ये वेळ वाया जाईल;  तसेच त्यामुळे कामाकडे दुर्लक्ष होईल असा विचार करून ती कामाकडे जास्त लक्ष द्यायची. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तिने कोणाला काही सांगायचं नाही,  असा निर्णय घेतला होता.  कारण तिच्या आधीच्या कंपनीमध्ये काम करत होती. तिथे सुद्धा तिने एका विश्वासू व्यक्तीला सर्व सांगितल्यावर त्यांनी तिची चूक आहे, असे सांगून तिच्यावर नको ते आरोप केले होते आणि त्यामुळे तिला मनाविरुद्ध ती कंपनी सोडावी लागली होती.

दोन दिवसांनी तिचे आई-वडील आपल्या नातवाला बघायला येणार होते, त्यामुळे तिने  वेळ मिळेल तसे बाजूची खोली त्यांच्यासाठी तयार करून ठेवली होती.

" मम्मा, उद्या पेरेंट्स डे आहे आणि तू येणार आहेस ना?"  तिच्या मुलाने रात्री झोपताना विचारले.

" हो, मी येणार आहे. तू काळजी करू नकोस."  असे म्हणून तिने त्याच्या कपाळावर ओठ टेकवून त्याला जवळ घेऊन विचार करत ती झोपून गेली.

दुसऱ्या दिवशी तिने जसे नेट चालू केले तसे भराभर मेसेज असायला सुरुवात झाली आणि ऑफिसचा काही महत्त्वाचं काम आहे का म्हणून तिने बघितले, तर जो कंपनीचा फक्त गप्पांसाठी महिलांचा ग्रुप  त्यांनी बनवलेला होता, त्यामधून तिला न सांगता काढून टाकण्यात आले होते.

पहिले तर तिला वाईट वाटले, परंतु ती जास्त बोलत नसल्यामुळे तिला काही फरक पडला नव्हता.

तशीच ती तयार होऊन आज हाल्फ डे घेऊन तिच्या मुलासोबत त्याच्या शाळेमध्ये गेली होती.

काही ऍक्टिव्हिटीज होत्या, त्यामध्ये आई-वडील दोघांनी सहभाग घ्यायचा होता, परंतु त्या ऍक्टिव्हिटीजमध्ये  वीरचे वडील नसल्यामुळे त्याला भाग घेता येत नव्हता.

त्यामुळे तो त्याच्या आई सोबत बाजूला बसला होता.

त्याचे मित्र त्याला चिडवत होते आणि त्यामुळे त्याला राग सुद्धा येत होता. नंतर कोणत्याही एका पालकाने येऊन त्याच्या पाल्यासोबत खेळण्याची एक ऍक्टिव्हिटी होती त्यामध्ये मात्र वीरने पहिला क्रमांक प्राप्त केला, तेव्हा मात्र मगासपासून नाराज आणि रागात असणारा वीर जिंकल्यामुळे खूप आनंदात होता.

थोड्याच वेळामध्ये वीरच्या क्लास टीचरने रीमाला बोलावले होते.

क्रमशः

रीमाला क्लासटीचरने का बोलावले असेल ?

© विद्या कुंभार.

कथेचा भाग वाचून झाल्यावर लाईक आणि कमेंट करा.
0

🎭 Series Post

View all