अपराध तत्व आणि कर्माचा हिशोब भाग ११

तिला रंगेहाथ पकडव म्हणून तो आज लवकरच घरी आला होता. घरी आल्यावर आईला लादी पुसताना आणि अनामिकेला मोबाईलवर काहीतरी करताना बघून तो अजूनच चिडला. त्याने रागातच तिच्यासमोर येऊन तिचा मोबाईल तिच्या हातातुन हिसकावून घेतला आणि जोरात लादीवर आपटला.
मागील भागात.

राजनलाही चार्जशीट रद्द झाल्याचं समजलं होत. त्यांनी सरलांजवळ पोलिसांबद्दल बरीच चौकशी केली. पण ते अजून हॉस्पीटलमध्ये आले नव्हते. तो ड्युटीवर असणारा एकच हवालदार तिथे उभा होता.

आपल्या मुलाबद्दल एवढी काळजी बघून सरलांना आपल्या भावावर जास्तच प्रेम भरून आलं होत. सोनीया ही अगदी समजदार झाल्यासारखी वागत होती. नाही ती तिच्या भावाबरोबर भांडत होती आणी नाही कोणत्या कामाला नकार देत होती. आज सकाळचा नाश्ता ही तिनेच बनवुन आणलेला होता.

आजोबा ही सकाळीच प्रसादला भेटून गेले होते. ऋतुजा ही थोडावेळ थांबून तिच्या जॉबवर निघून गेली. राजन सोनीया, सरला तिथेच थांबलेल्या होत्या. तर मायकल वॉर्डच्या बाहेर थांबलेला होता. त्याच आत येणारे आणि जाणारे या सर्वांवर बारीक लक्ष होत. तशी त्याची ६ फुटाच्या आसपासची उंची आणि पिळदार शरीरयष्टी बघून समोरचा ही जरा विचारच करत होता. तर विद्या आज काही तिथे आली नव्हती.

दुपारच जेवण घेऊन येणा-या विमला सोबत रिया आली होती. सोनीया तिच्यासोबतच लगबगीने घरी गेली होती. राजन ही थोडावेळ थांबून हवालदाराकडे थोडीफार चौकशी करून ते देखील चालले गेले.

यानंतर हॉस्पिटलमधलं वातावरण बदलताना दिसायला लागलं. नेहमीचे वॉर्ड बॉय बदलून तिथे नवीन वॉर्ड बॉय दिसायला लागले. नर्स ही बदलल्या गेल्या होत्या. प्रसादाच्या वॉर्डबाहेर जास्तीचे वॉर्डबॉय दिसायला लागले. ड्यूटीवर असणारा हवालदार ही बदलला गेला.

अस तणावपूर्ण वातावरण बघून सरला आणि विमला एकमेकींकडे टेन्शनमध्ये बघायला लागल्या.

आता पुढे.

आता दोघींच लक्ष प्रसादकडे गेल जो अजूनही गप्प डोळे मिटून होता.

“ताई.” विमला सरलाजवळ जात बोलल्या. “ही शांतता जरा जास्तच टेन्शन देऊ राहीली आहे.”

“हो ना.” सरला “कोणी काहीच सांगत नाहीये. नक्कीच काहीतरी आपल्यामागे घडत आहे.” दोघीही अजूनच टेन्शनमध्ये आल्या.

“सोनीया आणि रिया ही घाईघाईतच गेल्या.” विमला

याचाच विचार करत दोघ बसलेल्या होत्या. थोड्या वेळाने परी तिथे येऊन पोहोचली. दोघींचे चेहरे अजुनही टेन्शनमध्ये बघून परी बोलली.

“बोलली ना मी.” परी कडक आवाजात बोलली. “काहीच होऊ देणार नाही त्याला.”

“आता मला त्याची काळजी वाटतचं नाहीये.” विमला तिच्याकडे रोखून बघत बोलल्या. “तुम्ही काही उपद्व्याप नाही करणार ना? याची काळजी वाटते.”

तशी परी हलकेच हसली. “आत्या मी दिलेला शब्द कधीच मोडत नाही माहीती आहे ना?”

तस दोघींच्या ही कानात तिच चार वर्षापूर्वीच वाक्य घुमायला लागलं होत. त्या डोळे विस्फारुन परीकडे बघायला लागल्या.

“आता तर त्याचे अश्रुही सुकले आहेत.” परीने प्रसादवर नजर टाकली. जो अजूनही डोळे झाकून होता. “ठिणगी त्यांनी टाकली आहे. आता आग तर लागणारच.”

तिच्या चेहर्‍यावरचं आता झळकलेलं ते क्रुर हास्य किती जणांना आगीत होरपळून टाकणार होत. हे फक्त येणारी वेळचं सांगणार होती.

“आजोबांचे तत्व विसरलीस का?” विमला जरा कडक शब्दात बोलून बघत होत्या.

“ज्या तत्वांमुळे आजोबांसोबत भांडण झाले.” परी “आज त्याच तत्त्वांच्या जोरावर मला बोलत आहेस.” परीचा आवाज बोलता बोलता कडक झाला.

मग दोघीही गप्प झाल्या होत्या. परी प्रसादजवळ गेली. त्याचा हात हातात घेतला. तशी त्याला जाग आली. तिला बघून प्रसादच्या चेहऱ्यावरची कळी खुलली होती.

“लवकर बरा हो.” परी “बरचं काही बाकी आहे.”

तसा प्रसाद हलकेच हसला. “तुम्ही आहात की.”

मग परीने ही हलकेच स्मित केल. “येते मी.” एवढं बोलून ती तिथून निघूनही गेली.

“एवढ्यावरचं संपल बोलणं?” सरलांना प्रश्न पडला.

“दोनच वाक्यात बोलणं.” विमला “नाही.... नाही... नाही... या दोन वाक्यात पण बरचं काही बोलून गेलेत दोघे.”

दोघीजणी पटकन प्रसादजवळ गेल्या. तो सांगणार तर काहीच नव्हता. पण आईच मन कुठे ऐकतंय.

“प्रसाद.” सरदांनी आवाज दिला. “माहीती आहे तु फक्त डोळे मिटून आहेस. काय चाललं आहे तुमच?”

प्रसादने हलकेच डोळे उघडले. “कुठे काय? मी काय करणार आता या अशा अवस्थेत.”

एवढ्या दिवसातून प्रसाद आज पहील्यांदाच बोलला. त्याचा आवाज ऐकुन सरलांना भरून आलं होत. मग बाकीच्या शंका तिथेच गळून गेल्या.

ऋतुजा दुपारचं जेवण घेऊन आली. तिने तिच्या कामावर अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली होती. सोनीयाने जेवण बनवुन ठेवलं होत. तेच घेऊन ती हॉस्पिटलला आली. तिघांना जेवण देऊन ती ही पटकन हॉस्पिटलमधून बाहेर पडली.

आज सगळेच घाईगडबडीत का आहेत? हा प्रश्न सरला आणि विमला दोघींच्या डोळ्यासमोर निचू लागला.

बऱ्याच वर्षांनी ते दार उघडलं गेलं होत. सोनीया आणि रिया दोघींनी मिळून ती खोली साफ करून घेतली होती. ती अजूनही तशीच होती, जशी काही वर्षापुर्वी बंद करण्यात आलेली होती. ज्यांनी बंद करायला सांगीतली होती. आज त्यांनीच ती उघडायला लावली होती.

थोड्याचवेळात साई, विद्या, मायकल आणि परी तिथे जाऊन पोहोचले. सोनीया आणि रिया तर तिथेच होत्या. ती खोली बघून त्या चौघांच्या डोळ्यात आपसूक अश्रु तरळले. याच खोलीत तर कितीतरी खलबत त्यांनी केली होती. त्या वेळेस प्रसाद ही होता. पण आज त्याचाच विषय होता. सगळेच तिथे बसले. रियाने त्यांना पाणी आणून दिल. सध्यातरी सगळेच शांत होते. त्यांचा एक सवंगडी अजून आलेला नव्हता. तेवढ्यातच परीचा फोन वाजला. परीने पाहील तर तिच्या वडीलांचा होता. तिने तो उचलला.

“हा बाबा बोला.” परी

“काय ऐकत आहे मी?” परीचे वडील “तु आत्याच्या ठिकाणी बदली करून घेतलीस?”

“मी कुठे केली?” परी नेहमीप्रमाणेच मी काही नाही केल. या आविर्भावात बोलली. “ती वरुन झाली.”

“ते तु नको मला सांगू.” परीचे वडील जरा कडक आवाजात बोलले. “होम मिनिस्टरच्या पिएला हाताशी धरून तु करून घेतली आहेस.”

‘अधीका-या, एक गोष्ट पोटात राहत नाही तुझ्या.’ परी मनातच अधीकारीला भांडून मोकळी झाली. “तस काही नाही बाबा.”

“का?” परीचे वडील “या एकाच प्रश्नाच उत्तर दे.”

परीने दीर्घ श्वास घेतला. “तुम्हाला माहीती आहे बाबा. तरी विचारता?”

“पण गरज काय आहे?” परीचे वडील “एकतर त्या केसमध्ये मोठी कंपनी आहे. तुला काही झालं म्हणजे.”

“मला काय होणार?” परी “आता त्या कंपनीलाच बरचं काही होणार आहे.”

“तु तर काही ऐकणार नाहीस.” परीचे वडील “काळजी घे.”

“हो बाबा.” परी “आई?”

“आहे ना.” परीचे वडील “तु न सांगता तिकडे गेलीस तर रुसून बसली आहे.”

“तिला म्हणा फक्त आत्याकडे आली आहे.” परी हलकेच हसत बोलली. “सासरी नाही.”

“हो का?” परीची आई तिच्याकडे फोन घेत बोलल्या. “तु कोणासाठी तिकडे गेली आहे मला माहीत नाही का?” त्या परीवर जरा चिडल्या होत्या. “त्याच्यामुळेच तु लांब शिकायला गेलीस आणि आज त्याच्यामुळेच परत तिकडे गेलीस. वाटलं होत बदली करून आपल्या शहरात येशील.” बोलता बोलता त्या जरा हळव्या झाल्या.

“काहीच दिवस आई.” परी तिच्या डोळ्यातला एक अश्रु पुसत बोलली. “नंतर तुलाच त्रास द्यायला येणार आहे.”

“लवकर ये आणि काळजी घे.” परीची आईंनी नंतर प्रसादचीही विचारपूस केली आणि फोन ठेवून दिला.

यानंतर सर्वांची नजर सोन्यावर खिळली. मग सोनीयाने बोलायला सुरवात केली.

“तु तर त्याला मुक्त करून गेलीस.” सोनीया परीकडे बघत बोलली. “पण दादाला यातुन बाहेर पडायला महीना गेला होता. तो वरवर दाखवत तर होता की तो बरा आहे. पण आतुन तो तितकाच दुखी होता.”

बोलता बोलता सोनीया भुतकाळात हरवली.

(भुतकाळ)

“तु मनापासुन तयार आहेस ना?” सरला प्रसादला विचारत होत्या.

तसा बेडवर शून्यात हरवलेली प्रसाद जाणिवेत आला. “हो गं आई.” तो हलकेच हसत बोलला. “तुझ्या शब्दाबाहेर नाही मी. तु खुश तर मी खुश.”

प्रसादच्या बोलण्यावर सरलांना जरा समाधान वाटलं होत. परी नावाच्या प्रकरणाला प्रसादने ह्रदयाच्या एका कप्प्यात कुलूपबंद करून टाकलं. मग त्याच्य लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती.

प्रसादला येणाऱ्या परदेशातल्या पॅकेजबद्दल अनामिका आणि राजनला आधीच समजलेल होत. म्हणून तर त्यांना लग्नाची घाई झाली होती. तिच प्रसादच्या घरी आता नियमीत येण जाण सुरू झालं होत. जेवढं जमेल तेवढं ती प्रसादच्या अवतीभोवती रहायच्या प्रयत्न करत होती. आता होणारा नवरा आहे. म्हणून तिच वागणं प्रसादने स्विकारायला घेतलं होत. तिच्यासोबत त्याने बोलण देखील वाढवलेलं होत.

नंतर नंतर तर अनामिका प्रसादच्या घरी हक्काने वावरू लागली होती. सोनीया, ऋतुजा आणि रिया या तिघींसमोर ती खूपच तोऱ्यात वागू लागली. तिला परीबाबत शंका होती. पण आता प्रसाद तिचाच होणार म्हणून तिचा आनंद असा बाहेर पडत होता. बाकी ग्रुप तर शहराबाहेर होता. त्यामुळे या तिघींचा खूपच नाईलाज झाला होता.

यथावकाश लग्न झाल. आई आणि प्रसादकडे बघून सोनीयाने ही लग्नात खुशीत असल्याचं भासवलं होतं. लग्न झाल्यावर दहा दिवसांसाठी ते दोघेही महाबळेश्वरला गेले होते. माझा प्रसाद आणि माझा संसार म्हणत अनामिका आता तिच्या स्वप्नांचे बंगले बांधुन लागली होती. प्रसादला कोणत्या देशातलं पॅकेज मिळेल? याच स्वप्नात ती तिचे सुरवातीचे गुलाबी दिवस जगत होती. प्रसाद ही अनामिकाला तिचा पुर्ण हक्क देत होता.

जवळपास चार ते पाच महीने झाले. पण प्रसादने असा कोणत्याही पॅकेजचा अथवा परदेशातल्या नोकरीचा विषय ही काढला नव्हता. मग अनामिकेला ते जरा खटकू लागलं. सुरवातीला समजून घेणारी अनामिका आता जरा चिडचिड करायला लागली. घरात सरलांच आणि सोनीयाच आवरता आवरता तिला नाकीनऊ यायला लागलं. आधीच तिला कामाची सवय नव्हती. लग्नानंतर परदेशी गेल्यावर कामासाठी मोलकरीण ठेवायची आणि आपण मजा करायची एवढचं काय ते तिला माहीत होत.

काहीच दिवसांनी प्रसाद त्याची आहे ती नोकरी ही सोडायच्या मार्गावर आहे. अस अनामिकाला समजलं. मग तिचा रागाने तिळपापड झाला होता. सुरवातीला आपल्या आत्यासोबत प्रेमाने बोलणारी अनामिका आता त्याच आत्यासोबत विनाकारण भांडु लागली. सोनीयाबाबात आधीच तिच्या मनात तिरस्कार होता. तो आता उघड उघड दिसायला लागला होता. प्रसाद कामासाठी बाहेर पडल्यावर घरातली सगळीच काम सरला करू लागल्या. तिच्या कलेन घ्यावेत म्हणून त्या करत राहील्या. सोनीयाला हे आज्जीबातच आवडत नव्हतं. मग ती देखील तिच्या आईला मदत करू लागली.

प्रसादने स्वतःची छोटीशी कंपनी सुरू केली होती. तो दिवसरात्र त्यातच बुडालेला होता. परिणामी अनामिकाकडे त्याच दुर्लक्ष व्हायला लागलं. मग ती अजुनच चिडचीड करायला लागली.

‘एकदा का कंपनी तिच्या मार्गावर लागली की मग तिच्यासाठी बराच वेळ देता येईल.’असा विचार करुन प्रसाद त्याच्या कामात गढला होता. त्यामुळे घराली परिस्थीती त्याला माहीतच नव्हती.

अशातच अनामिकेचे शशांकसोबत सुत जुळलं. तो दिसायला ही सुंदर होता आणि वडीलांच्या देशी-विदेशी कंपन्या असल्याने अनामिका त्याच्याजवळ ओढली गेली होती. असही प्रसाद पुर्ण दिवस कामात व्यस्त रहात होता. त्याला कस समजणार? या भरोशावरच ती शशांकसोबत फिरू लागली. एक दिवस ऋतुजाने या दोघांना पाहील. तिने ताबडतोब त्यांचा फोटो काढून प्रसादजवळ गेली. ते बघून प्रसादला धक्काच बसला होता. यानंतर घरातली परिस्थिती ही ऋतुजाकडून समजल्यावर त्याचा राग अनावर झाला.

तिला रंगेहाथ पकडव म्हणून तो आज लवकरच घरी आला होता. घरी आल्यावर आईला लादी पुसताना आणि अनामिकेला मोबाईलवर काहीतरी करताना बघून तो अजूनच चिडला. त्याने रागातच तिच्यासमोर येऊन तिचा मोबाईल तिच्या हातातुन हिसकावून घेतला आणि जोरात लादीवर आपटला.

तशी ती पण रागाला येत तोंडाला येईल ते बडबडायला लागली होती. शब्दाला शब्द वाढत गेला. एकवेळ तर तिने मध्ये मध्ये आवरणा-या सोनियाच्या चारित्र्यावर ही चिखल उडवला. तसा त्याच्या रागाच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि त्याने सणसणीत अनामिकाच्या कानाखाली वाजवली. तशी ती धडपडून खाली पडली. तिच्या ओठांतून रक्त यायला लागलं.

तिला लागलेल बघून सरला तिला उठवायला गेल्या. तर तिने सरळ त्यांना झिडकारलं होत. याच क्षणाची जशी ती वाट बघत होती. तिने तशीच तिची बॅग आवरली आणि तिच्या घरी न जाता शशांककडे निघून गेली. दुसर्‍याच दिवशी प्रसादला पोलीसस्टेशन मधून चौकशीसाठी बोलावण्याचा फोन आला.

प्रसाद, सरला आणि सोनीया विरुध्द अनामिकेने हिंसाचाराखाली तक्रार नोदवली होती. त्यातले न केलेले हिंसाचार वाचून ‘या जगात अशा ही मुली आहेत?’ हा प्रश्न तिघांना पडला होता. त्यावेळेस ऋतुजाच्या वडीलांनी कसतरी करून त्या चौकशीतून या तिघांची सुटका करुन घेतली. पण ती केस मात्र कोर्टात उभी राहीली होती.

ती केस चालू असताना प्रसाद त्यावर कसातरी मात करून परत उभा राहीला आणि त्याच संशोधन पुर्ण करुन लोकांना तो देणारचं होता की आगीची घटना घडली होती. त्याच्या संशोधनावर, चारित्र्यावर असे शिंतोडे उडताना बघून हमसरलांना खुपच अपराधी वाटायला लागलं होत. पण त्या प्रसादला काही बोलणार तोच त्याला मारहाण होऊन तो हॉस्पीटलला ॲडमीट झाला होता.

त्या संशोधनाबद्दल घरच्यांना काहीच माहीत नव्हतं. ती कंपनी कसा त्यावर दावा करत आहे? हे देखील त्यांना माहीत नव्हतं. त्या कंपनीचा आणि अनामिकेचा काय संबंध होता? ते देखील कोणाला समजत नव्हतं. कारण त्या कंपनीच्या साक्षीदारांमध्ये अनामिकेच ही नाव होत.

(वर्तमानकाळ)

बोलता बोलता सोनीया परत रडायला लागली होती. तस परीने तिला तिच्या कवेत घेतलं.

“खूप त्रास दिला गं तिने आईला.” सोनीया हुंदके देत बोलत होती.

आता ऋतुजा ही येऊन पोहोचली होती. तिला ही ते सर्व आठवून गलबलून आलेल होत. कधी एक अश्रुही न गाळणा-या साईच्या डोळ्यात ही अश्रुंनी गर्दी केली होती. आपल्या अपरोक्ष एवढं सगळंच घडलेल बघून त्यांचा राग तर अनावर होणारचं होता. पण सध्या तरी त्याला सगळ्यांनीच आवर घातला होता.

थोडावेळ असाच शांततेत गेला. ऋतुजाने सोनीयाला प्यायला पाणी दिलं.

“आपला वासुदेव नाही आला?” मायकल घड्याळ बघत बोलला.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all